फिल्म इन्स्टिट्यूटमधील फियास्को

film
फिल्म अँड टीव्ही इनिस्टटयूटमध्ये सुरू असलेल्या नाटकाने तिथल्या विद्यार्थ्यांना नाट्य शास्त्रातले दोन धडे प्रात्यक्षिका सह शिकायला मिळाले आहेत. शोकांतिका म्हणजे काय आणि फियास्को (फज्जा) कशाला म्हणतात याचा धडा त्यांना मिळाला आहे. या संस्थेच्या अध्यक्षपदी झालेली गजेन्द्र चौहान यांची निवड त्यांना मान्य नाही. ती रद्द व्हावी म्हणून तिथल्या विद्यार्थ्यांनी ८९ दिवसांपासून संप सुरू केला आहे. पण सरकारने एक शिष्टमंडळ पाठवून त्यांच्याशी चर्चा केली. या पलीकडे त्यांना हिंग लावूनही विचारले नाही. हा संप आणखी एक वषर्र् चालला तरीही समाजावर काही परिणाम होणार नाही. त्यामुळे त्यांचा संप हा परिणामकारक ठरूच शकत नाही. संप कोणी करावा आणि कोणत्या कारणासाठी करून किती लांबवावा याचेही एक शास्त्र असते. ते न जाणताच संप केला तर संपाची शेवटी शोकांतिका होते.

या विद्यार्थ्यांनी संपाला अनेकांचा पाठींबा मिळवला. केन्द्रात मोदी सरकार आल्यामुळे ज्यांना ज्यांना ठसका लागला आहे त्यांनी गजेन्द्र चौहान यांची नियुक्ती हा किती मोठा अनर्थ आहे हे भासवून चौहान यांची नियुक्ती रद्द करावी अशी मागणी केली पण शेवटी हा प्रश्‍न नेमका केवढा आहे याचा अंदाज आला की असा पाठींबा देणारेही थंड पडतात. आता या संपात काही अर्थ नाही याची जाणीव या विद्यार्थ्यांनाच होत आहे. चौहान यांची नियुक्ती हे एकूण कलेच्या क्षेत्रावर झालेले प्रचंड मोठे आक्रमण आहे असे ते कितीही सांगत असले तरीही त्यात काही तथ्य नाही. भारतीय जनता पार्टी सत्तेवर आल्यापासून सगळ्या क्षेत्रांचे भगवेकरण सुरू आहे असा आरडा ओरडा करण्यात ज्यांचे कथित हितसंबंध गुंतले आहेत त्यांनीच या आंदोलनाला आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. गजेन्द्र चौहान हे तर एक निमित्त आहे.

आता आपले आंदोलन पारच ढेपाळणार असे लक्षात येताच या कथित डाव्या आणि संघ द्वेष्ट्यांनी चित्रपट क्षेत्रातल्या २०० दिग्गज (स्वयंघोषित) कलाकारांनी शेवटचा आकांत म्हणून राष्ट्रपतींकडे धाव घेतली आहे. कला क्षेत्राचा हा र्‍हास (?) थांबवावा असे आवाहन राष्ट्रपतींना केले आहे. हे २०० दिग्गज चित्रपट क्षेत्रात कितीही मोठे असले तरी त्यांचा अशा प्रकरणातला अधिकार किती मोठा आहे ? त्यांना समाजात नेमका मान किती आहे हे सर्वांना माहीत आहे तेव्हा राष्ट्रपतीही त्यांंना पुसणार नाहीत. शेवटी कोणी तरी आपल्याला आंदोलन मागे घेण्याचे आवाहन करावे असा प्रयत्न याच विद्यार्थ्यांना करावा लागणार आहे.

Leave a Comment