सुट्यांचा देश

holiday
भारत हा कशाकशाचा देश आहे हे नक्की सांगता येत नाही. पण त्याला सुट्यांचा देश असेही म्हटले जाते. कारण या देशात अनेक सण आहेत आणि त्या निमित्ताने शाळा, महाविद्यालये तसेच सरकारी निमसरकारी कार्यालये यांना सुट्या दिल्या जात असतात. हा देश मोठा निवांत असल्याने एवढ्या सुट्यांना कामकाज बंद पडते याची कोणाला खंत नाही. तरी आता शाळांच्या काही सुट्या कमी झाल्या आहेत. पूर्वी एप्रिलमध्ये शाळांच्या वार्षिक परीक्षा संपत असत आणि तिथून मुला मुलींच्या सुट्या सुरू होत असत. शिक्षक निकाला लावण्याच्या कामाला लागत असत. तो एक मे रोजी जाहीर केला जात असे आणि तिथून विद्यार्थी तसेच शिक्षक अशा दोघांच्याही दीड महिन्याच्या सुट्या सुरू होत असत. एकंदरीत मुलांना साधारण दोन ते अडीच महिने आणि शिक्षकांना दीड महिना अशा या उन्हाळ्याच्या सुट्या असत.

शिक्षकांसारखी अशी प्रदी़र्घ सुटी अन्य कोणत्याही व्यवसायात मिळत नाही. हेही अनेकांच्या शिक्षक होण्यामागचे एक आकर्षण असायचे. ही सुटी आताही आहे पण पूर्वीच्या शिक्षकांच्या काही सुट्या आता कमी झाल्या आहेत. पूर्वी नाताळची सुटी दहा दिवसांची आणि दिवाळीची सुटी २१ दिवसांची असे. आता या दोन सुट्या कमी झाल्या आहेत. असे असले तरीही अजून शाळांच्या काही सुट्यांवर वाद जारी आहे. काही सणांच्या सुट्या अनावश्यक मानल्या जात आहेत. मुस्लिमांच्या काही सणांना राष्ट्रीय सुटी असते पण या सुटीच्या दिवशी मुस्लिमेतर लोकांना घरात बसून काय करावे असा प्रश्‍न विचारला जात आहे.

गुरू नानक जयंती, नाग पंचमी, पार शी नववर्ष दिन अशा सुट्यांना आता सुटी द्यावी असा विचार पुढे आला आहे. सरकारने अशा काही वादग्रस्त सुट्यांवर पालकांनी आणि शिक्षण संस्थांच्या चालकांनी बसून निर्णय घ्यावा असा आदेेेेश काढला आहे. ही गोष्ट योग्य आहे कारण वर्षातल्या काही सुट्या या स्थानिक स्वरूपाच्या असतात. गावागावातल्या यात्रा आणि ग्रामदैवतांचे उत्सव निरनिराळ्या तारखांना असतात. तेव्हा त्या त्या गावातल्या लोकांनी या उत्सवाला सुटी देण्याबाबत विचार करावा तसेच ही सुटी एरवी अनावश्यक सुटी रद्द करून भरून काढावी असे सरकारने सूचित केले आहे. सरकारचा हा विचार योग्य आहे कारण आपण काही गरज नसताना सुटीचा बहाणा करून घरात बसतो आणि दिवस वाया घालवतो. गावातली आवश्यक सुटी सरकारने जाहीर केली नसली तरीही त्या दिवशी शाळेत कोणीही येत नाही. मग तो दिवस जाहीर करून सुटीचा करायला काय हरकत आहे ?

Leave a Comment