बियाणांना आंधळा विरोध

seeds
आपला देश हरित क्रांती मुळे धान्याच्या बाबतीत स्वावलंबी झाला आहे पण अजूनही आपण डाळींच्या आणि तेलाच्या बाबतीत परावलंबी आहोत. आता डाळीचा भाव दीडशे रुपये किलो असा झाला आहे. आणि पाम तेल आयात केल्याशिवाय आपल्याला चालत नाही. कारण तेलबिया आणि डाळींच्या बियाणांत आपण काहीच बदल केलेला नाही. वर्षानुवर्षे आपण तेच ते बियाणे वापरत असल्याने त्याचा जोम कमी होऊन उत्पादन घटत आहे. आता त्यांच्या जी एम बियाणांना म्हणजे जनुकीय बदल केलेल्या बियाणांना परवानगी दिली नाही तर या दोन वस्तूंच्या किंमती घटण्याची सुतराम शक्यता नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या जनुकीय बदल केलेल्या बियाणांना विरोध करायला सुरूवात केली आहे. त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत.

जगात जे काही नवे चालले असेल त्याला अज्ञानाने विरोध करणे आणि आपल्या विरोधाचे समर्थन करण्यासाठी त्या नव्या शोधाच्या केवळ नकारार्थी बाबींची जाहीरात करीत राहणे हे संघाचे वैशिष्ट्य राहिलेले आहे. त्यांनी संकरित बियाणांना विरोध केला. खरे तर संकरित बियाणांच्या वापराने आपल्या देशाचे भिक्षापात्र अवलंबिणे संपले आहे आणि आता आपण चीनसह २२ देशांना धान्य निर्यात करीत आहोत. याच काळात रासायनिक खतांचा वापर वाढला आणि त्यामुळेही धान्यांचे उत्पादन वाढले. त्याही खतांना संघाने विरोध केला होता. असा विरोध करणारे नेते संघाचे वरिष्ठ नेते असतात आणि त्यांना त्यांच्या संघटनेत मोठा मान असतो. एवढ्या मोठ्या पदावर आहेत याचा अर्थ त्यांना सारे काही समजते असा होतो असे मानले जाते. पण त्यांचे हे स्थान जेवढे मोठे असते तेवढे ते या क्षेत्रांबाबत अनभिज्ञ असतात. अज्ञानी असतात. ते आपल्याला यातले काही समजत नाही म्हणून गप्प बसत नाहीत.

आपल्या अर्धवट ज्ञानाच्या आधारावर अधिकार गाजवत राहतात. याच लोकांनी काही दिवसांपूर्वी संकरित गायींनाही विरोध केला होता. पण देशी गायी सरासरी दोन लीटर दूध देतात आणि संकरित गायी सरासरी २० लीटर दूध देतात. म्हणजे संकरित गायीमुळे आहे त्याच्या आठ ते दहापट जादा दूध मिळून मुलांचे कुपोषण टळते याचे त्यांना काही भान नाही. याच लोकांनी मुक्त अर्थव्यवस्थेलाही जोरदार विरोध केला होता. देशात समाजवादी अर्थव्यवस्था राबविली जात होती तेव्हा तिलाही याच लोकांनी विरोध केला होता. नंतर सरकारने समाजवादी अर्थव्यवस्थेचा त्याग करून मुक्त धोरण स्वीकारले तेव्हाही या लोकांनी तिलाही विरोधच केला. भाजपाने सत्तेवर आल्यानंतर मात्र तीच अर्थव्यवस्था जोरदारपणे राबवली.

देशात संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाची क्रांती झाली. तिला संघाने विरोध केला. त्यांनी विरोध केला तरीही संगणक आले आणि संघाच्याच लोकांनी त्यांचा वापर केला. आता हाच प्रकार जनुकीय बदल केलेल्या बियाणांबाबत घडत आहे. जगातल्या ६५ देशांत जनुकीय बदल केलेले बियाणे वापरले जात आहे. पण संघ परिवारातल्या लोकांनी आणि त्यांच्या भाईबंदांनी या बियाणांना विरोध सुरू केला आहे. देशभक्तीचा ठेका घेतल्याचा आव आणणारे हेच लोक आता आपले अज्ञान आणि कथित वैचारिक अहंगंड यातून देशाचे प्रचंड मोठे नुकसान करीत आहेत.

Leave a Comment