जनता परिवारात फूट

mulayam-singh
बिहारमधील जनता परिवार आधी कधी एकजीव नव्हताच. काही नेते स्वार्थी हेतूने एकत्र आले होते पण त्यांच्या कार्यकत्याची मने काही एकत्र आलेली नाहीत. त्यांचे जागा वाटप ठीक ठाक झाले असले तरीही त्यात मुलायसिंग यादव यांनी खोडा घातला होता. त्यांना ५० टक्के जागा हव्या होत्या. म्हणजे राज्यात स्थान असलेल्या जदयु आणि राजद यांनी मिळून १०० जागा लढवाव्यात आणि तीळभरही स्थान नसलेल्या मुलायम यांच्या सपानेही १०० जागा लढवाव्यात. एखादा पक्ष युती मोडण्यास टपलेला असला म्हणजे अशी भाषा बोलायला लागतो. ५० टक्के जागा द्या म्हणणे काय की युतीत राहणार नाही म्हणणे काय, दोन्ही सारखेच. असा हा परिवार निवडणुकीचे वेध लागताच एकवटला खरा पण सारे काही आलबेल नव्हते. ते आता उघड झाले आहे. मुलायमसिंग यांच्या सपाने जनता परिवाराच्या या प्रयत्नातून अंग काढून घेतले आहे. आपला पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल असेही या पक्षाच्या प्रवक्त्याने जाहीर केले आहे. अशा रितीने निवडणुकीच्या तोंडावर जमा झालेला हा परिवार तीन घटकांचा ठरून निवडणूक जाहीर होण्याच्या आतच कोसळला आहे.

परिवाराचा प्रयत्न यशस्वी होऊन परिवाराने मोदींना धक्का दिला असता तर हाच प्रयोग राष्ट्रीय पातळीवर करता आला असता आणि त्यातून भारतीय जनता पार्टीला राष्ट्रीय पर्याय तयार झाला असता. देशाच्या राजकारणाविषयी सजग असणार्‍या लोकांच्याही नजरा या परिवाराकडे लागल्या होत्या. गेली २० वर्षे एकमेकांची तोंडेही न पाहणारे लालू प्रसाद यादव आणि नितीशकुमार यांनी नाईलाजाने का होईना पण हातात हात घातले होते. त्यातून काही तरी चांगले घडेल असे वाटायला लागले होते पण सारेच मुसळ केरात गेले. तसा झाले नसते तर राजकारणात काही नवे घडले असते. कारण एकेकाळी या पक्षाने देशाच्या राजकारणात आपला चांगला प्रभाव निर्माण केला होता. व्ही. पी. सिंग, चंद्रशेखर, देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल असे चार पंतप्रधान दिले होते पण लालूंनी याही आघाडीला सुरूंग लावला. परिणामी हा तिसरा पर्याय विस्कळीत झाला. तो पुन्हा एकदा एकत्र येईल अशी अपेक्षा बळावत चालली होती. पण जनता परिवारातल्या नितीश आणि लालू यांच्याशी समाजवादी पार्टीचे जागावाटपात बिनसले आणि परिवार मोडला. खरे तर समाजवादी पार्टी हा केवळ उत्तर प्रदेशा पुरताच मर्यादित पक्ष आहे. तरीही परिवारात येत असल्या बद्दल स्वागत म्हणून परिवाराने त्यांना पाच जागा देऊ केल्या होत्या. पाच जागाही त्यांना देण्याचे काही औचित्य नाही. कारण त्यांना कितीही जागा दिल्या तरी त्यातल्या एकाही जागेवर त्यांना आपली अनामत रक्कमही वाचवण्याची त्यांची क्षमता नाही. पण या पक्षाने परिवारातून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले.

समाजवादी पार्टीला बिहारमध्ये काहीच स्थान नसल्याने केवळ उपचार म्हणून त्यांना पाच जागा देण्यात आल्या होत्या. त्यात त्यांच्याशी चर्चा करायला काही वावच नव्हता पण जनता दलाचे हे सारे घटक नेहमीच अहंकारापायी स्वत:च्या आणि देशाच्याही राजकारणाचे वाटोळे करीत आले आहेत. त्याच्या या निर्णयाचा परिवाराच्या भवितव्यावर काहीही परिणाम होणार नाही पण अशा घटनांनी कार्यकर्त्यांचे मनोबल खचू शकते. त्या खचलेल्या मनाचे कार्यकर्ते म्हणावे तेवढ्या ताकदीने प्रचारात सहभागी होऊ शकत नाहीत. म्हणजे समाजवादी पार्टीला बिहारात काहीही स्थान नसले तरीही तिथल्या परिवाराच्या भवितव्यावर परिणाम होईल एवढे उपद्रवमूल्य त्यांच्याकडे आहे. तिसर्‍या आघाडीचे हेच वैशिष्ट्य आहे. त्यांच्यात स्वत: निवडून येण्याची क्षमता नाही पण दुसर्‍यांना पाडण्याची ताकद आहे. खरे तर मुलायसिंग यांनाही हे माहीत आहे की, बिहारातल्या जागावाटपांत आपल्या अहंकाराला काहीही किंमत नाही. पण तरीही त्यांनी तो उपस्थित करून परिवाराला अपशकून केलाच.

या मागे अनेक कारणे आहेत. जनता परिवारातल्या घटक पक्षांना आपण एकत्र येत आहोत असे दाखवायचे असते पण ते दाखवतानाच प्रस्तावित पक्षांत कोणाचा प्रभाव राहणार यावरून त्यांच्या परस्पर अविश्‍वासाचे वातावरण असते. जनता परिवारात खरे तर अविश्‍वासाचे वातावरण असण्याची गरज नाही कारण ते सहजतेने होऊ शकते. मुलामय, लालूप्रसाद, नितीशकुमार, अजितसिंग, देवेगौडा, नवीन पटनायक, चौताला, या जनता परिवाराच्या विभिन्न गटांचे प्रभावक्षेत्र निरनिराळे आहे. कोणाच्याही प्रभावक्षेत्रात अन्य कोणाचाही वट्ट नाही. त्यांनी भाजपा आणि कॉंग्रेसपासून दूर राहून केवळ एक होण्याचा मनोदय जाहीर करायचा आहेे. पण तो करतानाही ते आपले प्रभावक्षेत्र सोडून दुसर्‍याच्या क्षेत्रात घुसण्याचा प्रयत्न करीत असतात. आपल्या राज्यातही नीट स्थैर्य न मिळालेले हे छोटे छोटे पक्ष एकमेकांशी हातमिळवणी करत असतात पण हातात हात घालतानाच ते आपल्या या मित्राला त्याच्या राज्यात घुसून बाहेर काढण्याच्या योजना आखत असतात. म्हणूनच मुलायम सिंग यांना बिहारात जादा जागा हव्या असतात तर नितीशकुमार यांना उत्तर प्रदेशात घुसखोरी करायची असते. ते हातात हात घेताना हसत असतीलही पण त्यांच्या मनात काही तरी वेगळे चाललेले असते. ते त्यांंचे अंतरंग जागा वाटपात प्रकट होते आणि सारे काही बिनसते. अशा बिनसा बिनशीला भाजपाची फूस असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Comment