दिल्ली कटरा देशातील सर्वाधिक लांबीचा एक्स्प्रेस वे होणार

express-way
दिल्ली – देशातील सर्वाधिक लांबीचा एक्स्प्रेस वे दिल्ली व कटरा दरम्यान बांधला जाणार असून १००० किमीच्या या प्रस्तावित रस्त्यासाठी १६६८० कोटी रूपयांचे बजेट पास केले गेले असल्याचे समजते. रस्ते बांधकाम मंत्री नितिन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार या द्रुतगती महामार्गाच्या बांधकामाबाबतच्या कामाला सुरवात केली गेली असल्याचे सांगितले. ते म्हणाले या द्रुतगती मार्गामुळे या प्रवासासाठी लागणारा १२ ते १४ तासांचा वेळ ५ ते ६ तासांवर येणार आहे. या रस्त्यामुळे दिल्लीहन थेट वैष्णोदेवी पर्यंत भाविकांना जाता येणार आहे.

परिवहन व हायवे मंत्रालयतून मिळालेल्या माहितीनुसार हा मार्ग हरियाना, पंजाब व जम्मू काश्मीर या राज्यातून जाईल. त्यासाठीची सल्लागार समिती नियुक्त केली गेली आहे. जम्मू काश्मीर हायवे पूर्वीपासून आहेच त्यामुळे नवीन मार्गाचा उपयोग या महामार्गावरील सर्व समस्या सोडविण्यासाठी होऊ शकणार आहे. जमिन अधिग्रहणाच्या कामाला सुरवात झाली असल्याचेही सांगितले जात आहे.