हार्दिक आणि ठाकरे

combo1
गुजरातेत पटेल समाजाच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे पटेल नेते हार्दिक पटेल यांनी बाळासाहेब ठाकरे हा आपला आदर्श असल्याचे म्हटले आहे. या आधी त्याने सरदार वल्लभभाई पटेल हे आपले स्फूर्तिस्थान असल्याचे म्हटले होते. त्याने आता ठाकरे यांचे नाव घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. हार्दिक पटेल हा कोणी विचारवंत नाही. त्याने पटेल समाजाचे जे आंदोलन उभे केले आहे त्यातही तर्कशुद्धता फार कमी असते. तेव्हा त्याने बाळासाहेब हे आपला आदर्श असल्याचे म्हटल्याने ठाकरे यांचा फार मोठा सन्मान झाला असेही मानण्याचे काही कारण नाही. या दोघांची कोठे भेट झाली असण्याचीही काही शक्यता नाही. म्हणून त्याने बाळासाहेबांना आपला आदर्श का मानले आणि त्याला बाळासाहेबांचे नेमके कोणते विचार आवडले, कोणत्या विचारांचा प्रभाव पडला याचा कसलाही खुलासा त्याने केला नाही.

सध्या हार्दिक पटेल याने पटेल समाजाच्या आरक्षणाचा विषय लावून धरला आहे. तो त्याने धरावा की नाही आणि त्यामागे असलेला विचार चुकीचा की बरोबर याची चर्चा येथे अपेक्षित नाही पण ठाकरे हाच त्याचा आदर्श असेल तर त्याने हे आंदोलन असे लावून धरलेच नसते. कारण बाळासाहेबांनी आपल्या आयुष्यात कधी कोणत्याही जातीच्या आरक्षणाचा आग्रहही धरला नव्हता आणि त्यासाठी आंदोेलनही केले नव्हते. राजकारणात प्रवेश केल्याच्या पहिल्या कही वर्षात तर त्यांनी आरक्षणाला उघड विरोधही केला होता आणि ंनंतर त्यांना राजकारणातल्या जातकारणाची अपरिहार्यता कळली तेव्हाही त्यांनी आरक्षणाचा असा उघड विरोध करणे बंद केले असले तरी त्यांनी आरक्षणाबाबत मौन पाळणेच पत्करले होते. ते हिंदुत्ववादी होते पण त्यांनी हिंदू समाजातल्या जातींचे राजकारण कधीच केले नाही.

हार्दिक पटेल याने सुरू केलेल्या पटेल आंदोेलनामुळे त्याच्या राज्यातल्या ओबीसी वर्गाचे हितसंबंध दुखावले जाणार असल्याने हा वर्ग त्यांच्या विरोधात उभा राहण्याचा संभव आहे. पण बाळासाहेब ठाकरे हे या बाबतीत त्याच्या नेमक्या विरोधी भूमिकेत होते. त्यांनी राजकारणात बाजूला पडून दुर्लक्षित झालेल्या ओबीसी वर्गाला नेमकी मदत केली होती आणि त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणले होते. राजकारणाच्या बाबतीत या दोघांत कसलेही साम्य नाही आणि हार्दिक पटेल याने आपल्या या छोठ्याशा कारकीर्दीत बाळासाहेबांप्रमाणे हिंदुत्वाचा जागर केल्याचे कधी ऐकलेले नाही. उगाच आपण थोरामोठ्यांना आपला आदर्श मानतो असे म्हटल्याने कोणी मोठा होत नसतो.

Leave a Comment