संथारा आणि आत्महत्या

santhara
जैन धर्मातील संथारा व्रतावरून देशभरात मोठा वाद निर्माण झाला आहे. या संबधात राजस्थान उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त करण्यासाठी दोन दिवसांत देशाच्या विविध भागांत जैन समुदायाच्या नागरिकांनी मोर्चे काढले आणि उच्च न्यायालयाच्या निकालाचा निषेध केला. जैन धर्माच्या प्रसाराला आपले आयुष्य अर्पण करणारे मुनी आपल्या जीवनाचा अंत जवळ आला असल्याची चाहूल लागली की अन्न, पाणी, बोलणे असे सारे व्यवहार बंद करून आपला देह मृत्यूच्या स्वाधीन करतात. ते त्यासाठी संथारा व्रत धारण केल्याची घोषणा करतात. मग त्यांचे अनुयायी त्यांच्या समीप मोठ्या संख्येने जमतात. अनेक धार्मिक कार्यक्रम होतात. अशा प्रकारे हे मुनी अनेकांच्या साक्षीने आपले इहलोकातील वास्तव्य संपवतात. राजस्थान उच्च न्यायालयाला मात्र हे मान्य नाही.

आपल्या हातून कोणत्याही प्रकाराने आपले आयुष्य संपवणे ही आत्महत्याच आहे असे या उच्च न्यायालयाने एका खटल्यात दिलेल्या निकालात म्हटले आहे. पण या निकालाने जैन समाजात नाराजी पसरली आहे. आपल्या धर्मातल्या एका परंपरेला आत्महत्येच्या गुन्ह्याच्या बरोबरीने तोलणे हा त्या परंपरेचा अवमानही आहे आणि आपल्या धार्मिक अधिकारात हस्तक्षेपही आहे असे या समाजाचे म्हणणे आहे. या निकालात दोन नाजुक मुद्दे गुंतले आहेत. एक धर्माचा आणि धार्मिक स्वातंत्र्याचा आहे तर दुसरा मुद्दा मरण्याच्या अधिकाराचा आहे. गेल्या काही वर्षांपासून स्वेच्छामरण हा विषय चर्चेला आला आहे. काही लोकांना आपले जीवन नकोसे झालेले असते पण त्यांना ते संपवण्याचा अधिकार आपल्या कायद्याने दिलेला नाही. जैन मुनींना आपले जीवन असे संपवण्याचा अधिकार याच कायद्यानुसार नाकारण्यात आला आहे. यापुढे संथारा व्रत हा आत्महत्येचा प्रयत्न समजावा असे न्यायालयाने म्हटले आहे.

धार्मिक स्वातंत्र्य आणि मरणाचा अधिकार हे दोन मुद्दे या निर्णयात गुंतले आहेत. यापूर्वी कायदा आणि धार्मिक परंपरा यांच्यात संघर्ष निर्माण होणारे अनेक प्रसंग घडले आहेत. अशा वेळी फार जपून निर्णय द्यावा लागतो. भारतात तरी धर्माच्या संदर्भात निर्णय देताना ब्रिटीश किंवा अमेरिकन नियमांच्या आधारे देता येत नाहीत कारण भारतातले लोक आपल्या धर्माला आणि धार्मिक परंपरांना फार प्राधान्य देत असतात. संथारा व्रताला आत्महत्या संंबोधणे हा प्रकार लोकांच्या धार्मिक परंपरांवरील प्रेमाशी पूर्ण विसंगत आहे. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. तिथे तरी निदान जैन समाजाच्या भावनांना ठेच पोचणार नाही अशी अपेक्षा आहे.

Leave a Comment