बंगळुरात कमळ

bangalore
मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यातल्या नगरपालिकांच्या निवडणुकांत भारतीय जनता पार्टीने चांगले यश मिळवले आहे. या दोन राज्यानंतर भाजपाच्या लोकप्रियतेची परीक्षा कर्नाटकात होणार होती. कारण त्या राज्याच्या राजधानीत बंगळूर शहरात महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातली होती. राजस्थान आणि म. प्र. मध्ये भाजपाचीच सरकारे आहेत त्यामुळे तिथे भाजपाला मिळणार्‍या यशापयशात तिथल्या राज्य सरकारांच्या लोकप्रियतेची कसोटी लागणार होती. पण कर्नाटकातली गोष्ट वेगळी होती. तिथे कॉंग्रेसचे सरकार आहे आणि बंगळूर मनपाची सत्ता भाजपाच्या हातात होती. ती आता कॉंग्रेसकडे जाईल अशी अपेक्षा होती. कारण या महानगर पालिकेत सत्ताधारी वर्गाला निवडून देण्याची परंपरा आहे. म्हणजे ही मनपा कॉंग्रेस भाजपाकडून हिसकावून घेणार असा अनेकांचा अंदाज होता.

मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांनी या निवडणुकीत कॉंग्रेसच्या प्रचाराची सूत्रे सांभाळली होती. सध्या कॉंग्रेसमध्ये आणि माध्यमांतल्या एका गोटात नरेन्द्र मोदी यांची लोकप्रियता घसरली असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. त्यामुळे बंगळूर मध्ये भाजपाचे पानपत होणार अशी सर्वांचीच खात्री होती. मतदारांच्या चाचण्याही तसेच दाखवत होत्या. या चाचण्या नेहमीप्रमाणेच चुकीच्या ठरून भाजपाने गड राखला. १९८ सदस्यांच्या या मनपात भाजपाला १०० जागा मिळाल्या. कॉंग्रेसला ७६ जागा मिळाल्या. खरे तर भाजपाच्या जागा १११ वरून १०० वर घसरल्या आहेत आणि कॉंग्रेसच्या जागा ५८ वरून ७६ वर गेल्या आहेत. भाजपाचा विजय फार काही देदिप्यमान नाही पण मतदार चाचण्यांच्या तुलनेत तो चांगला असल्याने भाजपाचे कौतुक होत आहे.

कॉंग्रेसच्या परंपरेनुसार आता तिथे मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांच्या राजीनाम्याची मागणी पक्षातूनच व्हायला लागली आहे. अर्थात ते एकटेच या पराभवाला कारणीभूत नाहीत. पण कॉंग्रेस सरकारने केलेली बंगळूर शहराच्या त्रिभाजनाची घोषणा या निवडणुकीत वादग्रस्त ठरली आणि तिचा परिणाम निकालावर झाला असे काही लोकांचे म्हणणे आहे. बंगळूर हे आता ६५ लाख लोकसंख्येचे मोठे शहर झाले आहे. त्याच्या महानगरपालिकेचे तीन भागांत विभाजन केले तरच शहरातल्या जनतेला प्रभावीपणे सेवा देता येईल असे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे. त्यांनी त्रिभाजनाची घोषणा केली पण ती अंमलात आणण्याबाबत बरीच दिरंगाई केली. मुळात निर्णय वादग्रस्त आणि दिरंगाई या दोन्हींचाही परिणाम निकालावर झाला. असे मनपाची विभागणी काही नवी नाही. दिल्ली मनपाचे असे विभाजन झालेले आहे.

Leave a Comment