
रक्षाबंधनाचा सण आता अगदी तोंडावर आला असताना विविध प्रकारच्या राख्यांनी बाजार फुलले आहेत. बनारस म्हणजे पंतप्रधानांच्या मतदारसंघात यंदा मोदी राखीला प्रचंड मागणी असल्याचे राख्यांचे व्यापारी अशोक गोगिया यांनी सांगितले. मोदींचा फोटो असलेली ही राखी ३० रूपयांना मिळते आहे.
रक्षाबंधनासाठी सजला बाजार- मोदी राख्यांना प्रचंड मागणी
यंदा २९ ऑगस्टला रक्षाबंधन आहे. या दिवशी भाऊरायाच्या हातात राखी बांधून बहीण त्याच्याकडून रक्षणाचे एक प्रकारे वचनच घेत असते. पूर्वी केवळ रेशमी दोरा बांधून हा सण साजरा होत असे. आता मात्र त्यात विविधता आली असून दरवर्षी नवनवीन प्रकारचा कलात्मक राख्या बाजारात येतात. सोने चांदीच्या राख्याही बनविल्या जातात. गेली कांही वर्षे लहान मुलांमध्ये कार्टून व लाईट वाल्या राख्या विशेष लोकप्रिय आहेत. यंदाही छोटा भीम, बाल हनुमान यांना मागणी आहे तसेच बेन टेन या कार्टूनच्या राखीलाही मोठी मागणी आहे. या राख्या चीनमधून आयात होतात. त्यांच्या बरोबरीने यंदा मोदी राखीलाही मागणी असल्याचे व्यावसायिक सांगतात.
भाऊबहीणींनी स्वतःचे फोटो लावून देता येतील अशा राख्या यंदा बाजारात आल्या आहेत त्याचप्रमाणे भेट देण्यासाठी आपलाच फोटो असलेले मगही बाजारात आले आहेत. या राख्या १०० रूपयांपासून आहेत तर मगसाठी २२५ रू. मोजावे लागत आहेत.एलईडी वाली राखीही बाजारात दाखल झाली आहे आणि तिलाही ग्राहकांकडून चांगली पसंती मिळाली आहे.
