चीनची मंदी

china
चीनमध्ये सध्या मंदीचे वारे आहे. साम्यवादी चीनने १९८० च्या सुमारास साम्यवादाचा त्याग करून मुक्त अर्थव्यवस्था निवडली आणि ती मोठ्या प्रमाणावर राबवली. या अर्थव्यवस्थेत उत्पादनाला फार महत्त्व असते आणि ते कृत्रिमपणे वाढवून लोकांचे उत्पन्न वाढवण्याचा खटाटोप करावा लागतो. कोणत्याही उत्पादन वाढीला काही मर्यादा असतात. भरपूर ग्राहक असेल आणि वाढलेले उत्पादन विकले गेले तरच उत्पादनाचा काही परिणाम होतो पण ग्राहक नसताना उत्पादन वाढवणे आणि ते स्वस्तात विकून कृत्रिमपणे ग्राहक तयार करण्याचा प्रयत्न केला तर तो प्रयत्न कधी ना कधी फसतो. वाढवलेल्या उत्पादनाचा बुडबुडा कधी तरी फुटतोच. चीनमध्ये हेच घडले आहे. अमेरिकेत २००८ साली असेच झाले. बँकांकडे पैसा पडून होता तो कोणी तरी वापरला पाहिजे म्हणून लोकांना नको इतक्या सैलपणे घरांसाठी कर्जे देण्यात आली. ती वसूल झाली नाहीत आणि घरबांधणीत आलेल्या तेजीचा फुगा फुटून सगळा बँका अडचणीत आल्या. या अशा घटनांतून मुक्त अर्थव्यवस्थेचे काही दोष दिसायला लागले आहेत.

समाजवादा विषयी असे म्हटले जाते की, समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनवाढीपेक्षा आहे त्या उत्पादनाच्या समान वितरणाला जादा महत्त्व दिले जाते. म्हणजेच गरिबीचे समान वितरण होत असते. पण मुक्त अर्थव्यवस्थेत याच्या नेमकी उलटी व्यवस्था असते. तिच्यात वितरणाला नव्हे तर जादा जादा उत्पादनाला प्राधान्य दिले जाते. यातली कोणती व्यवस्था चांगली आणि कोणती वाईट याची चर्चा येथे अप्रस्तुत आहे. पण मुक्त अर्थव्यवस्थेत सतत उत्पादन वाढ अपेक्षित असते. सतत उत्पादन वाढत राहिले पाहिजे, ते जगभरात विकले पाहिजे आणि त्यातून अधिकात अधिक पैसा कमावून आपल्या देशवासियांचे राहणीमाग वाढवले पाहिजे याच प्रेरणा सरकारला कामाला लावत असतात. तसे न केल्यास सरकारचा पराभव होण्याची शक्यता असते. म्हणजे ती लोकशाहीतली एक अपरिहार्यताही आहे. पण हे उत्पादन, त्याची विक्री आणि कमाई यात कोठे तरी कृत्रिमता आली की, घोटाळे होतात. चीनने असाच प्रकार केला. जगभरात चिनी बनावटीच्या वस्तूंची विक्री वाढवून त्यांनी पैसा कमवायचा प्रयत्न केला. विक्री वाढवायची तर माल स्वस्त असला पाहिजे. चीनने माल स्वस्त केला पण तो स्वस्त व्हावा म्हणूून अतिरेकी सबसिडी दिली. तिचा लाभ होऊन चिनी माल जगभरात खपला पण सबसिडीचा भार सरकारला असह्य झाला. सरकारची अर्थव्यवस्था अडचणीत आली.

अलीकडे या चिनी बनावटीलाही काही मर्यादा आहेत हे लक्षात यायला लागले म्हणून सरकारने विक्री वाढवण्यासाठी या वस्तू आपल्या चलनाचे अवमूल्यन केले. त्यामुळे वस्तू स्वस्त झाल्याही असतील पण या अवमूल्यनाने डॉलर वधारला. डॉलर वधारला की भारताचा रुपयाही घसरायला सुरूवात झाली. भारताच्या अर्थव्यवस्थेला असे काही छोटे धक्के बसत आहेत. पण चीनमध्ये त्सुनामी आहे. या सगळ्या गुंतागुंतीमुळे व्यापारी गडबडले आहेत आणि या गडबडीतून शेअर बाजार कोसळला आहे. शेअर बाजारात काही चढ उतार झाले की वृत्तपत्रांत मोठ मोठे मथळे झळकतात पण शेअर बाजार कोसळला म्हणजे नेमके काय झाले आणि तो वधारला म्हणजे नेमके काय झाले हे काही सामान्य माणसाला समजत नाही. शेअर बाजार कोसळला याचा अर्थ त्याचा निर्देशांक कोसळत असतो. शेअर बाजारात समभागांची खरेदी आणि विक्री यांचा जोर असतो म्हणजे भरपूर व्यवहार होतात तेव्हा निर्देशांक वाढलेला असतो तर हे व्यवहार कमी होतात तेव्हा निर्देशांक कोसळलेला असतो. वेगळ्या शब्दात सांगायचे तर निर्देशांक हा शेअर बाजारात भागांची म्हणजे शेअर्सची खरेदी आणि विक्री करणार्‍या दलालांच्या उत्साहाचा निर्देशांक असतो.

एकंदरीत अर्थव्यवस्थेत तेजीची चलती असते तेव्हा समभागांची किंमत वाढण्याची आशा असते. मग खरेदी विक्री होत राहते. पण बाजारात तेजी नसेल तर खरेदी विक्रीत उदासीनता जाणवते. मग शेअर बाजार कोसळतो. आपण सामान्य माणसांनी लक्षात ठेवायची गोष्ट अशी की, कोणत्याही कारणाने अर्थव्यवस्थेविषयी या दलालांंना काही शंका यायला लागतात, किंवा त्यांच्या मनात जगाच्या अर्थव्यवस्थेविषयी काही संभ्रम निर्माण होतो तेव्हा ते समभागांच्या खरेदी विक्रीबाबत सावध भूमिका घ्यायला लागतात. समभागांची खरेदी विक्री करीत नाहीत तेव्हा निर्देशांक घसरतो. याचा अर्थ असा की, ही घसरण किंवा चढण ही अर्थव्यवस्थेच्या तेजी मंदीशी संबंधित असतेच असे नाही. ती त्या तेजी मंदी विषयी या दलालांना काय वाटते याच्याशी संबंधित असते. भारतातल्या बाजारातील दलालांच्या मनात संभ्रमाचे वारे निर्माण झाले. सरकार बरेच खुलासे करीत आहे पण स्थिती येते काही दिवस सुधारेल असे काही वाटत नाही. या संभ्रमाला कारण आहे चीन. चीनने आपल्या चलनाचे अवमूल्यन केल्याने हा प्रकार घडला. त्यापूर्वी चीनचाही शेअर बाजार विक्रमी अंकांनी घसरला होता. या दोन घटनांतून चीनच्या अर्थव्यवस्थेत फार काही चांगले चाललेले नाही असे िदसायला लागले. चीन आज महाशक्ती झाला आहेे. तिथे काही तरी गडबड होते याचा अर्थ काहीतरी घडणार असा होतो असे मानून शेअर बाजार घसरायला लागले आहेत.

Leave a Comment