खरा धोका आतूनच

modi
भारताला कोणापासून धोका आहे अशी चर्चा होते तेव्हा लोक चीन आणि पाकिस्तान यांची नावे घेतात पण काही जाणकार नेहमीच सांगत असतात की भारताला बरबाद करायला बाहेरून कोणी आक्रमण करण्याची काही गरज नाही. देशाच्या आतच असलेले अनेक उल्लू या देशाचे चमन उजाड करायला पुरेसे आहेत. हीच बाब केन्द्रातल्या नरेन्द्र मोदी सरकारला लागू आहे. भारतीय जनतेने मोठ्या बहुमताने निवडून दिलेल्या मोदी सरकारला खराच कोणापासून धोका आहे ? कॉंग्रेस आणि अन्य कोणत्याही पक्षात आता तरी या सरकारला धोका पोचवावा एवढी ताकद नाही. याचा अर्थ मोदी सरकार निर्धोक आहे असा नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघाच्या छायेतल्या काही संघटनांचे अहंकारी अर्धवट शहाणे नेते हाच या सरकारला असलेला सर्वात मोठा धोका आहे. त्याला बाहेरून कोणीही काहीही धोका निर्माण करू शकणार नाही. देशात १९९८ साली वाजपेयी सरकार सत्तेवर आले तेव्हा त्यांना अनेकांनी ममता, समता (म्हणजे जॉर्ज फर्नांडिस यांचा समता पार्टी हा पक्ष) आणि जयललिता यांच्यापासून सावध राहण्याचा इशारा दिला होता. तो खराच होता. कारण जयललिता यांनी ते सरकार पाडले आणि ममतांनी या सरकारची साथ लवकरच सोडली. समता पार्टी मात्र शेवटपर्यंत सोबत राहिली. आता हीच गोष्ट मोदींना सांगावी लागणार आहे.

अज्ञानी संघ नेते, अर्धवट अर्थशास्त्री कामगार नेते आणि सर्वांगाने अनभिज्ञ असलेले पण स्वत:ला सर्वज्ञ समजणारे गोविंदाचार्य यांच्यासारखे अहंकारी नेते यांच्यापासून म्हणजेच अनर्थशास्त्र, अहंकार आणि अज्ञान या तीन विकारांपासून मोदी सरकारला धोका आहे. मोदींना लोकांना विकासाचा अजेंडा समोर ठेवला म्हणून निवडून दिले आहे पण संघ नेत्यांना तो आपला आणि हिंदू राष्ट्राच्या विचाराचा विजय वाटत आहे. संघाने लोकांना हा विचार कितीही पटवण्याचा प्रयत्न केला असला तरीही या जनतेला अजून तरी सेक्युलॅरिझमचाच विचार आपला वाटत आला आहे. ही जनता मोदींना विकासाचे प्रतिक मानत आहे. काल औरंगाबादेत संघाने राज्याच्या आणि केन्द्रातल्या मंत्र्यांना पाचारण केले आणि त्यांना झापले. या मागे हे सरकार आपल्या शिस्तशीर प्रचाराने निवडून आले असल्याचा अहंगंड आहे. संघ ही स्वयंसेवी संघटना आहे ही गोष्ट खरी पण तिच्यात कोणाला निवडून आणण्याची ताकद नाही. एखादा चित्रपट का चालतो याचे नेमके कारण जसे सांगता येत नाही तसेच निवडणुकीत कोणीतरी नेमके कशामुळे निवडून येते याचाही नेमका अंदाज येत नाही. त्यामुळे मोदी केवळ संघाच्या प्रचारामुळेच निवडून आले आहेत असा भास निर्माण केला जातो.

याच अहंकारातून हे सरकार जनतेने निवडून दिले असले तरी ते आपल्या इशार्‍यावर कसे नाचत असते याचा देखावा केला जातो आणि त्यातून आपला अहंकार शांत करण्याचा प्रयत्न होत असतो. या बैठकीत उपस्थित मंत्र्यांना, संघाच्या लोकांची कामे होत नाहीत आणि ऐनवेळी पक्षात आलेल्यांचीच कामे होत आहेत याची जाणीव करून देण्यात आली. याचा अर्थ काय होतो ? संघाच्या नेत्यांची कोणती कामे असतात आणि कामे होणे याचा अर्थ काय ? याचा उलगडा काही होत नाही कारण न झालेली कामे कोणती याचा नेमका खुलासा होत नसतो. केवळ काहीतरी संदिग्ध आरोप करून सरकार आपल्या तालावर नाचत असते असे दाखवण्याचा हा प्रयन्त असतो. भारतीय जनता पार्टीशी संलग्न असलेल्या भारतीय मजदूर संघाच्या नेत्यांनी नरेन्द्र मोदी यांना एक निवेदन पाठवले असून त्यात सरकारने अती खुली धोरणे राबवू नयेत असा इशारा दिला आहे. भारतीय मजदूर संघ आणि स्वदेशी जागरण मंच या संघटना अर्थव्यवस्थेबाबत सदोदित चाचपडत असतात. देशात समाजवादी अर्थव्यवस्था राबवण्याचा प्रयोग सुरू होता तेव्हा याच लोकांनी खुल्या धोरणांचा तगादा लावला. १९९१ साली सरकारने खरोखरच खुली धोरणे राबवायला सुरूवात केली तेव्हा याच लोकांनी आता पुन्हा एकदा इस्ट इंडिया कंपनीचे राज्य येणार अशी हाकाटी सुरू केली आणि स्वदेशीचा नारा लावला.

वाजपेयी सरकारनेही मनमोहनसिग यांच्याच पावलावर पाऊल टाकून चालायला सुरूवात केली तेव्हा त्यांचे स्वदेशीचे नारे थंड झाले. आता मोदीही योग्य धोरणे अवलंबून देेशातला रोजगार वाढवण्याचा प्रयत्न करीत आहेत पण आता पुन्हा या संघटनांना मुक्त धोरणे नकोशी वाटायला लागली आहेत. आता त्यांनी दीनदयाळ उपाध्याय आणि महात्मा गांधी यांची आठवण व्हायला लागली असून सरकारने या दोन महापुरुषांनी दाखवलेल्या मार्गावर जाण्याचा सल्ला दिला आहे. आताच्या गुंतागुंतीच्या अर्थव्यवहारात हे दोन महापुरुष कसे मार्ग दाखवत आहेत याचे कसलेली तपशील या संघटनांनी दिलेले नाहीत. सारा संदिग्ध मामला आहे. सरकार आपल्या कलाने आणि आपल्याला किंमत देऊन चालत नाही म्हणून सरकारला अधुन मधुन टोकायचे या पलीकडे या लोकांचा काहीही हेतू नाही. ना त्यांच्याकडे अर्थसास्त्राचे ज्ञान आहे ना त्यांना जागतिक र्थव्यवहारातल्या गुंतागुंती कळतात. याच माळेतले एक मणी म्हणजे गोविंदाचार्य. ते तर स्वत:ला फार मोठे आचार्य समजतात पण त्यांच्याकडील माहिती नेहमीच अर्धवट असते. मोदी यांना खरा याच लोकांचा धोका आहे.

Leave a Comment