अशोकरावांचा शोक

ashok-chava
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका कार्यक्रमांत बोलताना पुन्हा एकदा शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचा विषय उपस्थित करून आणि त्यावर बेजबाबदारपणाचे विधान करून त्याचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला. गेल्या सात महिन्यांत महाराष्ट्रात झालेल्या शेतकरी आत्महत्यांची संख्या सर्वात जास्त आहे अशी आकडेवारी त्यांनी सांगितली. याचा अर्थ भाजपा सरकारची काही तरी चूक होत आहे असे त्यांना म्हणायचे आहे. शेवटी काय तर भाजपापेक्षा आमचे शासन चांगले होते कारण काय तर यांच्या काळात हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत आणि आमच्या काळात नऊशे नव्वद शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या होत्या. त्यांच्या काळात आमच्यापेक्षा दहा आत्महत्या जास्त झाल्या म्हणजे आम्ही शहाणे आणि आमचे राहुल गांधी महान. शेतकरी वर्गाची यापेक्षा अधिक कुचेष्टा काय असेल? पण आता शेतकरीही या लोकांना ओळखायला लागले आहेत. अशोक चव्हाण एवढे शहाणे होते तर त्यांच्या काळात नऊशे नव्वद आत्महत्या तरी कशा झाल्या असा प्रश्‍न ते विचारणार आहेत.

याबाबत युक्तिवादच करायचा झाला तर असे म्हणता येईल की आता आत्महत्या जास्त झाल्या असल्या तरीही त्यांना अशोकराव चव्हाण यांच्या पक्षाचेच सरकार जबाबदार होते. आज एखादा शेतकरी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करतो तेव्हा त्याचा कर्जबाजारीपणा हा काही आज निर्माण झालेला नसतो. तो त्याच्या गेल्या चार दोन वर्षातल्या व्यवहाराचा परिपाक असतो. म्हणजेच गेल्या सात महिन्यांत आत्महत्या वाढल्या असतील तर तो चव्हाणांच्याच कारभाराचा परिपाक आहे. अर्थात अशी चढाओढीची भाषा बोलत राहणे हे काही प्रगतीचे लक्षण नाही. चव्हाणांचा हा आकड्यांचा खेळ तर मुळातच चुकीचा आहे आणि त्यातला फोलपणा लहान मुलालाही कळतो. मुख्य प्रश्‍न वेगळाच आहे. तो थोडा गांभीर्याने विचारात घेतला पाहिजे. चव्हाणांनी आपल्या काळात आत्महत्या होताच आपण शेतकर्‍यांना कशी कर्जमाफी जाहीर केली हे रंगवून सांगितले आहे. त्यातून त्यांना कर्जमाफी हा आत्महत्यांवरचा उपाय वाटतो हे दिसून येत आहे. त्यांचे म्हणणे खरे मानायचे तर त्यांच्या सरकारने दरवर्षी कायमच कर्जमाफी करायला हवी होती. अशोकराव चव्हाण यांच्या नंतर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्याही मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत आत्महत्या झाल्याच पण त्या चव्हाणांनी या चव्हाणांचे अनुकरण करीत कर्जमाफी जाहीर केली नाही.

अशोकराव चव्हाण यांनी आता भाजपा सरकारने कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी केली आहे आणि हे सरकार माफी जाहीर करीत नाही याबद्दल फडणवीस सरकारला दोष दिला आहे. हा जर दोष आहे तर पृथ्वीराज चव्हाण यांनी कर्जमाफी जाहीर केली नाही हा पृथ्वीराज चव्हाण यांचा दोष आहे असे अशोक चव्हाण यांना वाटते का ? त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे तशी मागणी कधीच केली नव्हती. कॉंग्रेसच्या हातात गेल्या पंधरा वर्षांपासून सत्ता आहे आणि त्या १५ वर्षात चढत्या वाढत्या संख्येने आत्महत्या होत आहेत. पण कॉंग्रेस सरकारने केवळ एकदाच कर्जमाफी दिली होती. बाकीची चौदा वर्षे अशोक चव्हाण गप्प का बसले होते ? कर्जमाफी हा आत्महत्यां वरचा कायमचा उपाय नाही हे आता आता स्पष्ट झाले आहे कारण कॉंग्रेसने एकदा केलेली कर्जमाफी मते मिळवण्या कामी उपयोगी पडली असेल पण ती शेतकर्‍यांना काहीही उपयोगी पडलेली नाही. शेतकरी कर्ज बाजारी असतो आणि आत्महत्या करतो अशा वेळी त्याला कर्ज माफ करणे म्हणजे त्याची एकवेळ कर्जातून सुटका करणे होय आणि ती वरवरची मलमपट्टी ठरते.

एकदा कर्जमाफी मिळाली की शेतकरी सध्याच्या कर्जातून मुक्त होतो आणि दुसरे कर्ज घ्यायला पात्र ठरतो. कर्जमाफीने त्याची एका कर्जाकडून दुसर्‍या कर्जाकडे वाटचाल सुरू होते. त्याची कर्जातून सुटका होते पण कर्जबाजारीपणातून सुटका होत नाही. माफ केलेले कर्ज त्याला स्वावलंबी करत नाही. नव्याने मिळालेले कर्ज फिटले नाही की तो पुन्हा सरकारच्या तोंडाकडे पहायला लागतो. त्याला कायम सरकारच्या कृपेवर अवलंबून रहावे लागते. सरकारने शेतकर्‍यांच्या मदतीला धाऊन गेले पाहिजेच पण शेतकर्‍यांना आपल्या तोंडाकडे वारंवार पहावे लागू नये असे काही उपायही योजावे लागतील. त्यासाठी त्याला स्वावलंबी करावे लागेल. कॉंग्रेसने आजवर शेतकर्‍यांची दुष्काळातून कायमची सुटका करण्यासाठी काहीही केले नाही त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. अशोक चव्हाण यांनी आपल्या कार्यकाळात कसे कायमचे काही उपाय योजिले नाहीत. आता फडणवीस सरकार कायमचे असे उपाय करीत आहे की महाराष्ट्रातून दुष्काळ हा शब्दच कायमचा परांगदा व्हावा. अशा उपायांचे परिणाम दिसायला काही दिवस जावे लागतील. वाट पहावी लागेल पण त्या मार्गाने एकदा शेतकरी स्वावलंबी झाला तर त्याला सरकारच्या हाताकडे वारंवार पहावे लागणार नाही. चव्हाण यांची मलमपट्टी आणि फडणवीस यांचे कायमस्वरूपी उपाय यातला फरक जनतेला कळतो. अशोकरावांनाही कळतो पण कायमच्या उपायांचा परिणाम प्रत्यक्षात दिसायला लागेपर्यंत काही वेदना होतील. त्या वेदनांचा अशोकराव राजकीय लाभ घेणार आहेत. तोही केवळ काही दिवसच.

Leave a Comment