कुर्ता पायजमा आणि सुटबुट

rahul
राहुल गांधी यांनी केन्द्र सरकारची संभावना सुटबुटवाली सरकार अशा शब्दात करून नवी चर्चा सुरू करून दिली आहे. आपण सरकारला या मुद्यावर फार चांगला टोला मारला असून हा टोला त्याच्या वर्मी बसणार आहे आणि त्यामुळे सुटबुटाचा वेष न आवडणारे देशातले लाखो शेतकरी आपल्या पाठीशी उभे राहणार आहेत अशा भ्रमात ते वावरत आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशातही गेल्या दोन दिवसांपूर्वी आपल्या मतदारसंघात लोकांच्या भेटी घेतल्या आणि सभा घेतल्या. त्यात त्यांनी पुन्हा एकदा सुटबुटवाल्या सरकारची गोष्ट काढली आणि आपण उत्तर प्रदेशात पायजमा शर्ट वाले सरकार आणू असे आश्‍वासन दिले. त्याला केन्द्रीय मंत्री धर्मेेश प्रधान यांनी चोख उत्तर दिले आहे. राज्यात पायजमा शर्ट वाले सरकार आणण्याआधी राहुल गांधी यांनी आपल्या मेव्हण्याला म्हणजे रॉबर्ट वड्रा याला पायजमा शर्ट घालायला लावावे असा टोला प्रधान यांनी लगावला. राहुल गांधी यांचे एक वैशिष्ट्य असे की ते काहीतरी बोलायला जातात. त्यांना तसेच तिखट उत्तर मिळते पण राहुल गांधी त्याला उत्तर देत नाहीत. देऊ शकत नाहीत.

आताही या सुटबुटवाल्या सरकारच्या मामल्यात ते काहीही बोलणार नाहीत कारण त्यांची या प्रश्‍नाने पुरती पंचाईत करून टाकली आहे. आपण आपल्या राजकारणात अशीच जुगलबंदी ऐकत राहणार आहोत का ? हा सारा पोरखेळ वाटत नाही का असे प्रश्‍न अनेकांच्या मनात येत असतील पण त्याला आता नाईलाज आहे कारण आपले नेते याच पातळीचे आहेत. आता राहुल गांधी यांनी ही सुटबुटवाली सरकारचा शोध कोठून लावला हे काही माहीत नाही पण त्यांना त्यातून ग्रामीण जनतेची सहानुभूती मिळवता येईल असे वाटत असेल तर त्यातून त्यांचा पोरकटपणाच दिसून येतो कारण त्यांनी पायजमा कुर्ता घातलाय एवढ्या गोष्टीवरून देशातले मतदार त्यांना वाटते तसे त्यांच्याकडे आकृष्ट होणार नाहीत. एक गोष्ट खरी की आपल्या देशातल्या नेत्यांनी हा भावनेचा खेळ आजवर अनेकदा केला आहे आणि त्यांना त्याचा फायदाही झालेला आहे. लालूप्रसाद यादव यांचे केस आणि वेष हे बिहारातल्या मतदारांना आकृष्ट करण्यासाठी हेतुत: तसेच ठेवलेले असतात. आपल्या देशातले काही नेते पोषाखी आहेत. ते दिल्लीत फिरताना सुटाबुटात आणि कडक मचिंग मध्ये फिरत असतात पण आपल्या मतदारसंघात फिरताना आणि विशेषत: निवडणुकीत हे लोक देशी वेष परिधान करून फिरतात. हा लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न असतो. अर्थात त्याचा एक मर्यादित फायदाही होत असतो पण त्यालाही मर्यादा असते.

असे असले तरीही वेष हा नैसर्गिक असावा. एखादा नेता परदेशात शिकलाय, त्याला भारताची भाषाही येत नाही, त्याला भारताचे प्रश्‍न कधी समजत नाहीत पण केवळ तो पायजमा कुर्ता घालतो एवढ्यावरून त्याला लोक नेता मानणार नाहीत. राहुल गांधी यांची स्थिती अशीच आहे. त्यांनी परदेशात शिक्षण घेतले आहे. त्यांची मैत्रिणही परदेशातली आहे. याउलट नरेन्द्र मोदी यांनी एकदा अमेरिकेच्या अध्यक्षांना भेटताना सुट घातला म्हणून ते सुटाबुटातले होत नाहीत. ते राहुल गांधी यांच्यापेक्षा अधिक देशी आहेत. त्यांचे शिक्षण देशात झाले आहे. राहुल गांधी यांना सुषमा स्वराज यांनी आपल्या घराण्याचा इतिहास अभ्यासावा असा सल्ला दिला आहे पण आम्ही त्यांना त्यांच्या फार मागच्या पिढ्यांचा अभ्यास करायला सांगणार नाही. त्यांनी आपल्या वडलांचा केवळ कपड्यांपर्यंतच अभ्यास करावा. त्यांना असे आढळेल की, आपले वडील राजीव गांधी हे मोदी यांच्यापेक्षा अधिक कडक सुटाबुटातले होते. मग त्यांनी असे परदेशी कपडे घातले म्हणून त्यांनी देशाचे कमी कल्याण केले असे त्यांना म्हणायचे आहे का ?

कोण कसे कपडे घालतो यावरून त्याची क्षमता ओळखायची तर फार मोठी पंचाईत होईल. त्यावर असे म्हणावे लागेल की जो नेता अधिक आधुनिक कपडे घालतो तो देशासाठी धोकादायक असतो आणि जो जितके पुरातन कपडे घालतो तेवढा तो देशासाठी हिताचा असतो. असे असल्यास आपल्या पायजमा कुर्ता घालणार्‍यांपेक्षा धोतर नेसणारे नेते अधिक चालायला हवेत. राहुल गांधी यांचा पायजमा कुर्ताही त्या धोतरापेक्षा आधुनिक नाही का ? मग धोतर नेसणार्‍या नेत्यांनी राहुल गांधी यांना पायजमा कुर्ता वाला नेता म्हणून हिणवले तर चालेल का ? अर्थात हे सारे असे लिहिण्याचीही गरज नाही पण काय करणार? राहुल गांधी असे काहीतरी पोरकटपणाची विधाने करतात. ते कॉंग्रेसचे उपाध्यक्ष असल्याने त्यांची विधाने पोरकट असली तरी त्यांना महत्त्व येते. त्यांच्या अशा विधानातून कॉंग्रेसच्या नेत्यांच्या आणि राहुल गांधी यांच्याही विचार करण्याच्या पातळीवर प्रकाश पडतो. आपण अशी विधाने करून मोदी सरकारला नामोहरम करू असे त्यांना वाटते. ते असाच विचार करीत असतील तर ती बाब कॉंग्रेससाठी चिंतेची आहे. कारण अशा विधानांनी आपण पराभवाच्या छायेतून बाहेर पडून पुन्हा एकदा देशातली सत्ता प्राप्त करू असे त्यांचे चिंतन आहे. हातातून गेलेली सत्ता प्राप्त करण्याचा यापेक्षा कसलाही परिपक्व मार्ग त्यांना सुचत नाही ही या पक्षाच्या भवितव्यावर मोठे प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे.

Leave a Comment