बिहारला पॅकेजची भेट

modi
बिहारमध्ये नितीशकुमार यांनी आपल्या राजकारणाला प्रादेशिक वळण दिले होते आणि बिहारला मागास राज्य घोषित करून विशेष दर्जा द्यावा आणि विकासाचे मोठे पॅकेज द्यावे अशी मागणी केली होती. २०१३ साली हे सारे घडत असताना भाजपा आणि नितीश यांच्या काडीमोडाची चर्चा सुरू झाली होती आणि कॉंग्रेसच्या नेत्यांनी नितीशकुमार यांना आपल्या गोटात ओढण्याची कोशीश सुरू केली होती. नितीशकुमारही त्यांना भाळले होते आणि कॉंग्रेसने बिहारच्या दोन मागण्या मान्य केल्या तर आपण कॉंग्रेसच्या गोटात शिरकाव करू असे संकेत दिले होते. असेच राजकारण मायावती यांनीही केले होते आणि उत्तर प्रदेशासाठी तब्बल ५० हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज मागितले होते. नितीश कुमार यांची बिहाराबाबतही अशीच ५० हजार कोटीच्या आसपास अपेक्षा होती. त्यातून बिहारात आपले स्थान कायम करण्याचा त्यांचा इरादा होता. या सार्‍या राजकारणा मुळे विशेष दर्जा आणि पॅकेज या दोन मागण्या मोठ्या जिव्हाळ्याच्या होऊन बसल्या होत्या. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने तसे १२ हजार कोटी रुपयांचे एक पॅकेज जाहीर केले होते पण आता पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी बिहारसाठी एक लाख ६५ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे.

काल ही घोषणा त्यांनी आरा येथील जाहीर सभेत केली. ही सभा बिहारातल्या काही रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. या दहा कामांवर केन्द्र सरकारने सहा हजार ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या सार्‍या घोषणांनी मोदी यांनी बिहारच्या आगामी विधानसभा निवडणुकीत आपला विजय निश्‍चित केला आहे. भाजपा आणि नितीशकुमार यांची युती लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तुटली पण ती राहिली असती तर आज या पॅकेजचे बरेचसे श्रेय नितीशकुमार यांना मिळाले असते. पण नितीशकुमार हे मोदींच्या विषयीचा आपल्या मनातला द्वेश लपवू शकले नाहीत आणि त्यांनी युती मोडून आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला. नाहीतर बिहारमध्ये नितीशकुमार यांचेच राज्य होते. लालूप्रसाद यादव यांचा प्रभाव त्यांनी संपवला होता. भाजपासारखा राष्ट्रीय पक्ष तिथे त्यांच्या सरकारमध्ये दुय्यम भूमिका घेऊन रहात होता. २०११ च्या विधानसभा निवडणुकीत तर नितीशकुमार आणि भाजपा यांच्या युतीला ८० टक्के जागा मिळाल्या होत्या. त्यातल्या ११५ जागा नितीशकुमार यांच्या तर ९० जागा भाजपाच्या होत्या पण त्यांना अवदसा आठवली आणि त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला.

येणार्‍या निवडणुकीत त्यांच्या युतीने कॉंग्रेसला ५० जागा सोडल्या आहेत. विद्यमान विधानसभेत ११५ जागा असणारे नितीशकुमार १०० जागा लढवत आहेत आणि आताच्या विधानसभेत केवळ पाच जागा असणारा कॉंग्रेस पक्ष नितीशकुमार यांच्याशी युती करून ५० जागा लढवणार आहे. लालूप्रसादांनी नितीश यांच्या गळ्यात गळा घालून युती केली खरी पण युती करतानाच त्यांनी नितीशकुमार यांचा गळा आवळला आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतरच्या पोटनिवडणुकांत लालू आणि नितीश यांनी कॉंग्रेसच्या मदतीने भाजपाला वाईट रितीने पराभूत केले होते आणि अशीच युती विधानसभा निवडणुकीत झाली तर नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचा रथ बिहारात सहज अडवता येईल असा विश्‍वास निर्माण केला होता.पण हे भाजपाचे विरोधक कितीही एकत्र आले तरीही ते आपल्या अंगवळणी पडलेल्या सवयीनुसार भाजपाला पराभूत करण्यावर लक्ष केन्द्रित करण्याऐवजी परस्परांनाच परास्त करत आहेत. लालूंनी जागावाटपात नितीश यांना चांगलेच पराभूत केले आहे. आता भाजपाच्या विरोधातल्या या युतीचा नितीश आणि लालू यांचे एकत्रीकरण हा मुख्य आधार मानला जात असला तरी या एकत्रीकरणालाच सुरूंग लागला आहे त्यामुळे या युतीची अन्यही शक्तीस्थाने डळमळीत होताना दिसत आहेत.

राज्यातली यादव मते हा तर लालूंचा आधारस्तंभ. जातीचे राजकारण करीत संघटित केलेल्या या यादव मतांत मुस्लिम मते मिसळली की, ती राज्यातल्या एकुण मतांच्या ३१ टक्के होतात. त्यांच्याच जोरावर लालू गमजा करीत होते पण आता हे दोन्ही आधार निखळताना दिसत आहेत. यादव समाजातले अनेक नेते भाजपाच्या वळचणीला गेले आहेत. भाजपाने त्यांना विधानसभेची तिकिटे देण्यावर भर दिला असल्याने लालूंची पंचाईत झाली आहे. अनेक तरुण कार्यकर्ते जातीने यादव असले तरी भाजपात आहेत आणि या समाजातली तरुण पिढी लालूंना आपला नेता मानायला तयार नाही. लालूंचा अर्थात युतीचा मुस्लिम मते हा दुसरा आधार कमकुवत करण्याचे काम एमआयएम हा पक्ष करणार आहे. या पक्षाने बिहारातल्या मुस्लिमबहुल २४ मतदारसंघात आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. या पक्षाचा परिणाम कॉंग्रेसलाही भोगावा लागणार आहे. दुसर्‍या बाजूला जीतराम मांझी यांच्या रूपाने या युतीला भगदाड पडले आहेच. त्यात आता या मुस्लिम मतांच्या दूर जाण्याची भर पडली आहे. एकंदरीत अशी चिन्हे दिसत असतानाच भाजपाने आपला प्रचार जोराने सुरू केला आहे. निवडणुकीच्या आधीच दणके बसत असलेले मोदी विरोधक लालूंना कालच मिळालेल्या सर्वाच्च न्यायालयाच्या नोटीसीने हादरले आहेत आणि भाजपाचा रणगाडा विकासाच्या सोबतीने वेगाने चालला आहे.

Leave a Comment