भाजपाला दिलासा

bjp
सध्या कॉंग्रेस पक्षाने भारतीय जनता पार्टीला आपल्या प्रमाणेच भ्रष्ट ठरवण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यासाठी मध्य प्रदेशातल्या व्यापम घोटाळ्याचा आधार घेतला आहे. या घोटाळ्यात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा हात असल्याचा कसलाही पुरावा नसतानाही तसा आरोप करून कॉंग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पण भारतीय जनता पार्टीने ती धुडकावली. कॉंगे्रसने या मुद्यावरून लोकसभेचे एक पूर्ण अधिवेशन उधळून लावले आणि मध्य प्रदेशात तर चौहान सरकारच्या विरोधात रान उठवले. पण त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. मध्य प्रदेशात भाजपा आणि शिवराजसिंह चौहान यांची लोकप्रियता कायम आहे. कारण राज्यातल्या १० महानगर पालिकांच्या निवडणुकांत भाजपाने चांगलेच यश मिळवले आहे. १० पैकी आठ पालिकांत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले असून एका पालिकेत भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार महापौर झाला आहे. कॉंग्रेसला केवळ एकाच पालिकेत बहुमत मिळवता आले असल्याने पक्षाचे हसे झाले आहे.

भाजपाचा हा विजय अनेक अर्थांनी सूचक आहे कारण त्यामुळे चौहान यांची लोकप्रियता कायम असल्याचे दिसलेच आहे पण व्यापक घोटाळ्यावर भरपूर चर्चा करून चौहान यांचा राजीनामा मागणार्‍यांत मध्य प्रदेशातलेच दोन नेते अग्रभागी होते. संसदेत हे काम ज्योतिरादित्य शिंदे हे या कामात आघाडीवर होते तर संसदेबाहेर पक्षाची या बाबतची रणनीती ठरवण्यात माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह हे आघाडीवर होते. या दोेघांना गेल्या १५ वर्षांपासून आपल्या राज्यात आपल्या पक्षाचा प्रभाव वाढवता आलेला नाही. १९९८ सालच्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे सरकार पराभूत होऊन तिथे भाजपाचे सरकार आले पण नंतर कॉंग्रेसला कधीच संधी मिळाली नाही.

या उलट शिवराजसिेंह चौहान यांनी मात्र राज्याला योग्य नेतृत्व दिले असून विकासाचा गाडा वेगाने पुढे न्यायला सुरूवात केली आहे. भारतात बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या चार हिंदी भाषिक राज्यांना बिमारू स्टेटस् असे म्हटले जाते पण आता असे म्हटले जायला लागले आहे की, या नावातले मध्य प्रदेशाचे नाव काढून टाकावे लागेल कारण आपण बिमारू नाही हे या राज्याने सिद्ध केले आहे. अन्य राज्यांचा विकास वेग पाच ते सात टक्क्यांच्या मध्ये रेंगाळत असताना शिवराजसिंह चौहान यांनी ११ टक्के विकास दर नोंदविला आहे. भाजपाला त्यांनी तिथे विधानसभा निवडणुकीत हॅट्ट्रिक मिळवून दिली आहे. त्यामुळेच भाजपाला हा विजय नोंदवता आला आहे.

Leave a Comment