बंपर गुंतवणूक

modi
पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांंनी संयुुक्त अरब अमिरातीच्या दौर्‍यात एक हजार अब्ज डॉलर्स गुंतवणुकीचे प्रस्ताव होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. अरब अमिराती हा भारतातला आताचा दहाव्या क्रमांकाचा गुंतवणूकदार देश आहे पण त्याच्या गुंतवणूक क्षमतेकडे आपले फार लक्ष नव्हते. खरे तर भारतातून या देशाला शेती उत्पादने निर्यात करणे आणि तिथून अशी मोठी गुंतवणूक आणणे याला खूप वाव होता पण त्याकडे भारताचे लक्ष नव्हते. ही गोष्ट मोदी यांनी मान्य केली. गेल्या ३५ वर्षात भारताचे पंतप्रधान या देशाला कधी गेलेच नाहीत. ३५ वर्षांपूर्वी तिकडे गेलेल्या शेवटच्या पंतप्रधान म्हणजे इंदिरा गांधी. अरबस्तानातल्या देशांकडे आता पेट्रोल आणि डिझेलचा मोठा पैसा आहे आणि त्यांना तो कोठेतरी गुंतवायचा आहे पण त्यासाठी भारताने प्रयत्न केले नव्हते. आता एकदम एवढी प्रचंड मोठी गुंतवणूक येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या गुंतवणुकीतून भारतात मोठ्या प्रमाणावर घरे बांधण्याचा विचार मोदी यांनी बोलून दाखवला आहे. कारण या क्षेत्रात मोठी गरजही आहे. २०२२ सालपर्यंत भारतातल्या प्रत्येक कुटुंबाकडे आपले स्वत:चे घर असेल अशी सरकारची योजना आहे. घरे स्वस्त झाली तरच हे स्वप्न पुरे होणार आहे. या क्षेत्रातल्या प्रवाहांनुसार भरपूर घरे बांधली गेली तरच घरांच्या किंमती कमी होणार आहेत. तेवढी भरपूर घरे बांधणे आताया आपल्या स्थितीत शक्य नाही. म्हणून अशा एखाद्या परकीय गुंतवणुकीवरच अवलंबून रहावे लागत आहे. त्या दृष्टीने ही मोठी गुंतवणूक फारच योग्य आहे. एक हजार अब्ज डॉलर्स म्हणजे ६४ हजार अब्ज रुपये म्हणजेच ६४ लाख कोटी रुपये. खरेच एवढी गुंतवणूक झाली आणि ती स्वस्त घरांत झाली तर भारताच्या इतिहासातली ती क्रांतिकारक गुंतवणूक ठरणार आहे.

नरेन्द्र मोदी यांनी आणलेली ही मोठी गुंतवणूक नक्कीच सराहणीय आहे. यापूर्वीही अशा गुंतवणुकीची शक्यता होती पण मनमोहन सिंग सरकारच्या नाकर्तेपणामुळे ती प्रत्यक्षात झाली नाही. आता मोदी यांनी या बाबत सक्रियता दाखवली आहेच पण या गुंतवणुकीत कसलीही अडचण येऊ नये याबाबत आपण दक्ष असल्याचेही म्हटले आहे. काही अडचणी आल्यास आपण व्यापार मंत्र्यांना केवळ याच एका कामासाठी अरबस्तानात पाठवू आणि अडचणी दूर करण्यावर एका ज्येष्ठ मंत्र्याचे वैयक्तिक लक्ष असेल असे म्हटले आहे. मोदी यांच्या नावाने काही लोक बोटे मोडत आहेत पण त्यांचा हा परदेशी गुंतवणूक आणण्यातला झपाटा कोणालाही हेवा वाटावा असा आहे.

Leave a Comment