महाराष्ट्रात वाढती गुंतवणूक

investment
गेल्या काही वर्षात देशातले काही मुख्यमंत्री फार गाजले. त्यातल्या त्यात आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री असलेले चंद्राबाबू नायडू हे फार कौतुकाचा विषय ठरले होते. ते स्वत:ला मुख्यमंत्री न म्हणवता राज्याचा सीईओ म्हणवत असत. सीईओ म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी. अशा प्रकारची भूमिका फार वेगळी असते. अशा मुख्यमंत्र्यांचे व्यक्तिमत्त्वही वेगळे असते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आपल्या कामातून आपला असाच काहीसा ठसा उमटवण्याचे ठरवले आहे असे दिसते. त्यांनी परदेशांच्या दौर्‍यावर जाऊन महाराष्ट्रात अनेक गुंतवणूक प्रस्ताव आणले आहेत. गेल्या एका आठवड्यात असे चार प्रस्ताव मंजूर होऊन त्यांवर स्वाक्षर्‍या झाल्या आहेत. पॉस्को या कोरियन कंपनीचा पोलाद प्रकल्पाचा प्रस्ताव त्यातल्या त्यात अधिक महत्त्वाचा आहे. खरे तर हा प्रकल्प ओरिसात होणार होता पण अनेक मंजुर्‍यांच्या कचाट्यात सापडल्याने तो अखेर रद्द झाला.

तो त्यावेळी झाला असता तर त्याच्या रूपाने ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक एका दमात झाली असती. ती भारतातली सर्वात मोठी परदेशी गुंतवणूक ठरली असती. आता हीच कंपनी कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९ हजार कोटी रुपये गुंतवून नवा पोलाद प्रकल्प उभारणार आहे. आर्सेलार मित्तल याही कंपनीने महाराष्ट्रात एक पोलाद प्रकल्प उभारण्याचे जाहीर केले आहे. पॉस्कोचा यापूर्वी आणखी एक प्रकल्प जाहीर झाला आहेच. अमेरिकेतल्या जनरल मोटार्स या कंपनीने एक कारखाना महाराष्ट्रात काढण्याच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. याच बरोबर अनिल अंबानी यांच्या कंपनीने नागपूर जवळ १०० कोटी डॉलर्स गुंतवणुकीचा डिफेन्स सिटी नावाचा प्रकल्प जाहीर करण्याची योजना जाहीर केली आहे.

कालच तैवानमधील फॉक्सकॉन या कंपनीच्या पाच अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या उद्योगाच्या करारावर सह्या झाल्या आहेत. ही तर फार मोठी गुंतवणूक आहे. म्हणजे फडणवीस यांनी गेल्या चार दिवसांत जवळ जवळ १० अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीच्या करारांना अंतिम रूप दिले आहे. यातून हजारो तरुणांना नोकर्‍या मिळणार आहेत. कॉंगे्रेसचे नेते अशा गुंतवणुकीवर नाराज आहेत कारण तिच्याने मेक इन महाराष्ट्राच्या संकल्पाला गती येत आहे. ते आपले बिचारे हे सरकार भांडवलदारांचे सरकार असल्याच्या आरोपाचा पुन्हा पुन्हा उच्चार करीत आहेत आणि त्या आरोपाने आपण देशातल्या गरीब मतदारांना आपल्याकडे वळवून घेण्यात यशस्वी होणार असल्याच्या स्वप्नात तरंगत आहेत.

Leave a Comment