ऐसे कैसे झाले भोंदू

baba
आसाराम बापूची मालमत्ता किती याचा काही हिशेब लागत नव्हता पण आता इंडिया टुडे या साप्ताहिकाने तिचे तपशीलच जाहीर केले आहेत. त्यात किती तरी कंपन्यांत पैसे गुंतवलेले दाखवले आहेत. शिवाय काही खाजगी व्यक्तीना कर्ज दिले आहे त्याचे आकडे आहेत. अनेक ठेवी आहेत. साधू हा निष्कांचन असावा. किंबहुना जो निष्कांचन असतो तोच साधू म्हणवून घेण्यास पात्र असतो. पण आसाराम बापूने तर धर्माच्या नावावर आणि आपल्या साधूपणाच्या आडून एवढी माया कमावली आहे की त्याला साधू म्हणायचीही लाज वाटते. एखादा साधू आपल्या शिष्यांकडून पैसा कमावतो पण तो पैसा आपल्या हातातून कोणत्या तरी चांगल्या कामाला देतो. त्याचे पैसा कमावणे हे काही आक्षेपार्ह ठरत नाही कारण त्याच्या हाताला संपत्तीचा मोह सुटलेला नसतो. कमलपत्रावर पाण्याचा थेंब थांबत नाही तसा हा पैसा अशा साधूच्या हातात थांबत नाही.

पण आसारामची सारी संपत्ती एखाद्या व्यापार्‍याने कमवावी अशी कमावलेली आहे आणि तिचा विनियोग तो आपल्या कुटुंबाच्या चैनीसाठी तसेच भविष्यातल्या गुजराणीसाठी करीत आहे. म्हणजे ही कमायी धार्मिक नाही. ती पूर्णपणे वैयक्तिक आहे आहे. त्यांनी एखादा धंदा करून हा पैसा कमावला असता तर काही हरकत नव्हती. किंबहुना त्याला पैशाचा एवढाच मोह असेल तर त्याने तसा पैसा कमवायलाही काही हरकत नव्हती पण त्याने तो पैसा कमावताना आपण या पैशाचे काय करणार आहोत हे ते पैसे देणारांना सांगितलेले नाही. तो पैसा धर्माच्या नावावर कमावलेला आहे. म्हणजे ही आपल्या भक्तांची फसवणूक आहे. अशा धनाचारावर गाडगे महाराजांनी सांगितलेला तोडगा मोठा मार्मिक वाटतो.

महाराज म्हणाले होते, ‘हेच साधू वारंवार सांगत असतात की देव केवळ भावाचा भुकेला आहे. पैशाचा नाही. असे जर आहे तर सर्व भक्तांनी देवाला भक्तिभावाने नमस्कार करावा. देवासमोर पैसा टाकू नये. देवासमोर पैसा न टाकल्याने देव नाराज होत नाही. त्याला पैशाची काही गरजच नाही. असे झाले तर ही सारी देवस्थाने एका आठवड्याच्या आत ओस पडतील.’ गाडगे बाबांच्या या म्हणण्यात काय चूक होते ? आसाराम बापू काय की सत्य साईबाबा असो हे लोक श्रीमंत का होतात ? त्यांना त्यांचे भक्त भरभरून दाने देतात म्हणून ते श्रीमंत होतात. या भक्तांनी त्यांना दान द्यायचेच नाही असे ठरवले तर ते भिकेला लागतील. तेव्हा आसाराम बापूच्या श्रीमंतीचे कारण त्यांच्या भक्तांचा मूर्खपणा हेच आहे.