आता राहुलची लिपी

rahul
कॉंग्रेस हा तळागाळातला पक्ष जनतेपासून दूर का गेला ? कारण या पक्षाचे नेते जनतेपासून दूर गेले. नेते जनतेपासून दूर का गेले? कारण त्यांना जनतेशी बोलता येत नाही. आधी असे मानले जात होते की कॉंग्रेसचे नेते विशेषत: सोनिया गांधी सामान्य माणसाशीच काय पण पक्षाच्या खासदाराशीही बोलत नाहीत या मागे त्यांची प्रतिष्ठा आडवी येत असावी. गांधी नेहरू कुटुंबाचे हे मानकरी सामान्य माणसाशी बोलण्याइतके खाली कशाला येतील? पण नंतर असे स्पष्ट होत आहे की, त्यामागे प्रतिष्ठेचा प्रश्‍न नाही तर भाषेचा प्रश्‍न आहे. सामान्यांशी बोलायचे तर त्यांची भाषा आली पाहिजे पण सोनिया गांधी यांना भारतातली सर्वाधिक बोलली जाणारी हिंदी भाषाच बोलता येत नाही. सोनिया गांधी आणि कॉंग्रेसचे उपाध्यक्ष असलेले त्यांचे पुत्र राहुल गांधी यांना त्यामुळेच पक्षाला नवी दिशा देत येत नाही. भारताच्या आणि कॉंगे्रसच्याही इतिहासात असे पहिल्यांदाच घडले असेल की या लोकप्रिय पक्षाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोघांनाही या देशातली सर्वाधिक बोलली जाणारी लोकप्रिय भाषाच येत नाही.

सोनिया गांधी यांना हिंदी येत नाही हे सर्वांना माहीत होतेच. त्यांना भाषणे करावी लागत असत आणि ती लोकांना कळावीत म्हणून हिंदीत करणे भाग होते. त्यांनी त्यावर एक युक्ती शोधून काढली. भाषा हिंदी पण लिपी मात्र रोमन अशी भाषणे लिहून त्या वाचायला लागल्या. ही सारी त्यांची कहाणी सर्वांना माहीत झाली आहे पण गांधी घराण्याच्या पुढच्या पिढीला म्हणजे राहुल गांधी यांनाही हिंदी लिपी येत नाही हे काल संसदेत दिसून आले. राहुल गांधी यांनी नरेन्द्र मोदी यांच्यावर हमला बोल केला पण त्यासाठी वापरलेली हिंदी भाषा इंग्रजी लिपीत लिहिलेली होती आणि ही गोष्ट एका वृत्तवाहिनीच्या कॅमेर्‍यात बंद झाली. आता हिंदी न येता हिंदुस्थानवर राज्य करण्याची मनिषा हे वैशिष्ट्य गांधी घराण्याच्या या पिढीनेही मनात बाळगली असल्याचे उघड झाले आहे. ही परकीय मनोवृत्ती दाखवणारी राहुल गांधी यांच्या हातातली इंग्रजीतली चिठ्ठी व्हायरल झाली आहे. एकुण कॉंग्रेस पक्षाविषयी चिंता वाटावी असाच हा प्रकार आहे. सोनिया गांधी या पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच काय पण मोठया नेत्यांनाही भेटत नसत. यामागचे कारण बरेच दिवस लपून राहिले होते पण असा भेटलेला कार्यकर्ता काही बोलायला लागला आणि तो हिंदीतून काही विचारायला लागला तर त्याला लगेच हिंदीतून उत्तर देणे सोनिया गांधी यांना शक्य होत नाही. म्हणून त्या कोणाशी बोलायच्या भानगडीत पडत नाहीत.

त्यांना केवळ हिंदी भाषाच येत नाही असे नाही तर त्यांच्यात कोणाशीही दहापाच मिनिटे बोलण्याची किंवा संवाद साधण्याचीही क्षमता नाही म्हणून कॉंग्रेसचा असा एकही कार्यकर्ता किंवा नेता सापडत नाही की जो सोनिया गांधी यांच्यासोबत दहा पाच मिनिटे बोलून किंवा विचार विनिमय करून आला आहे. संसदेत तर त्या काही बोलल्या आहेत आणि त्यावरून त्यांच्या जाणकारीचे दर्शन घडले आहे असा एकही प्रसंग नाही. संसदेत भाषणे करणारे नेते किती तरी छान बोलतात. त्यांच्या भाषणात उत्स्फूर्तता असते. किती तरी संदर्भ असतात. त्यांचा अभ्यास दिसून येतो पण तसे सोनिया गांधी यांच्या बाबतीत संसदेतही घडलेले नाही आणि बाहेरही कोठे तसे दिसून आलेेले नाही. केवळ गांधी घराण्याची स्नुषा या एका गोष्टीवरून किती रेटून नेणार आणि लोकांना प्रभावित करीत राहणार ? आता तशीच वेळ राहुल गांधी यांच्यावरही आली आहे. त्यांच्याही अशा अनेक कमतरता वारंवार दिसून आल्या आहेत. आता आता देशातले मतदार सुशिक्षित होत आहेत. ते अशा अल्पबुद्धीच्या नेत्याला किती दिवस थारा देणार आहेत ? तरीही कॉंग्रेसचे नेते त्यांच्या बाबात आशावादी आहेत यात त्या नेत्यांचा निरुपायच दिसतो. कारण या गांधी घराण्याच्या कथित करिष्म्याशिवाय त्यांच्याही जवळ काहीच नाही.

एखादा नेता त्या जनतेची भाषा न येता जनतेला प्रभावी नेतृत्व कसे देऊ शकेल ? कॉंग्रेस सरकारला हीच गोष्ट गेल्या वेळी भोवली. गेली दहा वर्षे भारतावर प्रणव मुखर्जी, पी. चिदंबरम, ए. के, अँटनी, सोनिया गांधी आणि मनमोहनसिंग हे पाच लोक राज्य करीत होते. यातल्या कोणालाही हिंदी भाषा येत नाही. त्यांना राहुल आणि सोनिया यांच्याप्रमाणेच निरनिराळ्या लिप्यांतून हिंदी भाषण लिहून द्यावे लागते. असे हे अज्ञानी लोक आता मोदी सरकारला फार मोठे आव्हान देत असल्याचा आव आणून संसदेत शरण आणण्याच्या मागे लागले आहेत पण त्यांचा एकुण वकुबच एवढा कमी आहे की त्यांना ते शक्य होईल असे वाटत नाही. लिहून आणलेल्या चिठ्ठ्यातली घणाघाती वाक्ये ते उच्चारतात पण त्याला भाजपाकडून खमंग उत्तर मिळाले की गप्प बसतात कारण त्यांना उत्त देता येत नाही. ते लिहून देणारा कोणी तरी गाठावा लागतो. नंतर ते उत्तर देतात पण ते फार केविलवाणे ठरलेले असते कारण तो पर्यंत वेळ निघून गेलेली असते.

Leave a Comment