मुलायमसिंह यांचा इशारा

mulyam-singh
पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचा आर्थिक कार्यक्रम आपला प्रभाव दाखवायला लागला आहे. त्यामुळे धास्तावलेल्या कॉंग्रेस पक्षाने संसदेच्या कामावरचा आपला विरोध अधिक तीव्र केला आहे पण या विरोधात आणि बहिष्कारात काहीही तथ्य नाही हे आता वरचेवर स्पष्ट होत आहे. कॉंग्रेसचे नेते आपला हा विरोध लोकशाहीच्या बचावासाठी असल्याचे भासवत असले तरीही त्यामागे त्यांचा खरा हेतू मोदी सरकारला काहीही चांगले करू द्यायचे नाही हाच असल्याचे आता दिसायला लागले आहे. म्हणून आजवर त्यांना पाठींबा देणार्‍या मुलायमसिंग यादव यांनी कॉंग्रेसला आपला हा विरोध मागे घेण्याचा सल्ला दिला आहे. हा विनाकारण सुरू असलेला तमाशा न थांबल्यास कॉंग्रेसने आपला पाठींबा गृहित धरू नये असेही यादव यांनी म्हटले आहे. यादव यांच्या या आवाहनाचा काही परिणाम होतो की नाही हे येत्या एकदोन दिवसांत दिसेलच पण आता मोदी सरकार आपल्या विरोधातला हा गोंधळ विरोधकांत फूट पाडून कमी करण्याच्या कामाला लागले असल्याचे दिसत आहे. कॉंग्रेसचे सारे वैषम्य मोदीं इफेक्ट दिसायला लागल्याने प्रकट होत आहे हे आता दिसायला लागले आहे.

कॉंग्रेसने सध्याच्या स्थितीत विरोधी पक्ष म्हणून काही वेगळ्या प्रकाराने काम करता येईल का याचा विचार करण्याची गरज आहे पण परिस्थितीला नवी दिशा देण्यासाठी जो वकुब लागतो तो कोणत्याही कॉंग्रेस नेत्यात नाही. त्यांनी पदोपदी सत्ताधार्‍यांना विरोध करणे म्हणजे विरोधी पक्ष या पलीकडे मजल मारलेली नाही. त्यांच्याकडून काही अपेक्षाही करता येत नाहीत. लोक मात्र मोदी यांची धडपड पहात आहेत. त्यांनी परदेशात केलेले दौरे काही व्यर्थ गेलेले नाहीत. नुकतीच लोकसभेत या संबंधात सांगण्यात आलेली माहिती उत्साहजनक आहे. मोदी यांच्या परदेश दौर्‍यातून आजपर्यंत २० अब्ज डॉलर्स इतकी परदेशी गुंतवणूक प्रत्यक्षात झाली आहे. २० अब्ज डॉलर्सचा अर्थ होतो एक लाख २८ हजार कोटी रुपये. मोदी यांनी भरपूर परदेश दौरे केले आहेत ते काही मौजमजा करण्यासाठी केलेले नाहीत. त्याचा लाभ प्रत्यक्षात गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती यासाठी होत आहे. आज लोकांना आपल्या शिकलेल्या मुलांना नोकर्‍या मिळायला हव्या आहेत. किंबहुना लोकांनी मोदी यांना याच कामासाठी मते दिलेली आहेत. मोदी यांनी परदेशी आणि स्वदेशी गुंतवणुकीला अनुकूल वातावरण तयार करावे अशी लोकांची अपेक्षा आहे. त्यांनी तसे प्रयत्न सुरू केले आहेत आणि त्याची फळेही मिळत आहेत.

भारतातल्या भांडवलदारांनी परदेशांत मोठी गुंतवणूक केली आहे. ती सहा अब्ज डॉलर्सची आहे. तिच्यातून अनेक भारतीय मुलांना परदेशांत नोकर्‍या मिळू शकतील. याशिवाय भारतीय गुंतवणूकदारांनी भारतात केलेली वर्षाभरातली गुंतवणूक ४५ अब्ज डॉलर्सची आहे. तिच्यातूनही लाखो रोजगार निर्माण होणार आहेत. अशा रितीने मोदी सरकारने वर्षाभरात रोजगार निर्मितीचे चित्र बदलून टाकले आहे. ते हळुहळू बदलत आहे पण लोकशाहीत अशी प्रक्रिया झटकन होत नसते. कारखाना काही रात्रीतून उभा रहात नसतो. त्याची मंजुरी, जागा देणे, परवाने वगैरे बाबींना काही दिवस लागतात. सरकारला त्यासाठी काही वेळ दिला पाहिजे. सरकारची पावले नेमकी त्या दिशेने पडत आहेत की नाही याची मात्र खातरजमा करून घेतली पाहिजे. मोदी यांचे परदेश दौरे लोक पहात होते. तिथे जाऊन ते गुंतवणूकदारांशी चर्चा करीत होते. तिथल्या सरकारशी बोलत होते. त्यांची प्रत्येक कृती देशातली गुंतवणूक वाढवण्यासाठीच होती. हेही लोकांना दिसत होते. राहुल गांधी मात्र यावरून मोदींना टोमणे मारत होते आणि आपण सरकारला फार छान टोकत आहोत असे खोटे समाधान मानत होते. त्यांचे चेले चमचेही राहुल गांधी आता आक्रमक होत आहेत म्हणून टाळ्या वाजवत होते.

लोकांना मात्र खात्री वाटत होती की मोदी नक्कीच काहीतरी सकारात्मक करीत आहेत. महाराष्ट्राच्या सरकारनेही हीच बाब दाखवून दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी चीनचा दौरा करून प्रचंड मोठी गुंतवणूक आणली आहे. ५० हजारापेक्षाही अधिक लोकांना नोकर्‍या देणार्‍या या गुंतवणुकीवर आता शेवटचा हात फिरवला जात आहे. असे सारे घडत असतानाही कॉंग्रेसचे नेते मोदी सरकार फसवे असल्याचा प्रचार करून आपली स्वत:ची विश्‍वासार्हता गमावत आहे. आज देश काही कायदे करून अर्थव्यवस्थेला प्रचंड गती देण्याच्या तयारीत आहे. जीएसटी सारखे विधेयक मंजूर केले तर कर संकलनाच्या क्षेत्राला क्रांतिकारक वळण लागून केवळ या एका कायद्याने जीडीपी मध्ये दोन टक्क्यांची थेट वाढ होणार आहे. ही काही लहान सहान गोष्ट नाही. देशाच्या विकासासाठी या सोप्या पण निर्णायक बाबी आहेत पण कर्मदरिद्री कॉंग्रेस नेते संसदेच्या कारभारात अडथळे आणून आपल्या मनातली भाजपा विषयीची द्वेषभावना शमवून घेण्यात समाधान मानत आहेत. अशाही स्थितीत मोदी सरकारची पावले निश्‍चित दिशेने पडत आहेत. व्यापारी महासंघ या देशातल्या सर्वोच्च संघटनेनेही सरकारच्या या कामाची प्रशंसा केली आहे. मंदगतीने का होईना पण औद्योगिक प्रगती होत असल्याचे या संघटनेने म्हटले आहे.

Leave a Comment