बंगालची वस्तुस्थिती

bengal
आपल्या देशातल्या हिंदी भाषिक पट्टयाची फार बदनामी केली जाते. बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेश ही चार राज्ये फार अप्रगत असल्याचा प्रचार केला जातो. त्यांना बिमारू स्टेटस् असेही म्हटले जाते. जगातले सर्वात जास्त दरिद्री लोक उत्तर प्रदेशात राहतात आणि बिहारला तर आपण जंगल राज म्हणत असतो. राजस्थानात अनेक मध्ययुगीन प्रथा आहेत तशा पाळल्या जातात तर मध्य प्रदेशात वेश्या व्यवसाय हा आपला खानदानी धंदा आहे असे मानणार्‍या काही जाती आहेत. अशी या राज्यांची ख्याती असली तरी आपल्या देशातले खरेच सर्वात दरिद्री राज्य कोणते याचा शोध घेतला तर ओरिसा आणि प. बंगाल या दोन राज्यात स्पर्धा होईल इतकी या दोन राज्यांची अवस्था आहे. ओरिसात ५५ टक्के लोक दारिद्य्र रेषेखालील जीवन जगत असतात. आपल्या गावात पोट भरत नाही म्हणून अन्य राज्यांत जाणार्‍या लोकांत युपी आणि बिहारची नावे घेतली जात असली तरी प्रत्यक्षात अनेक शहरांत बंगाली लोक स्थलांतर करून आले असल्याचे दिसते.

या गोष्टीची खरीच पाहणी करायला हवी आहे. प. बंगालात मोठ्या प्रमाणावर गरिबी आहे. गरिबीतून अनेक प्रश्‍न निर्माण होत असतात. केवळ स्थलांतर हाच काही गरिबीचा परिणाम नसतो. मुलींची मोठ्या प्रमाणावर होत असलेली विक्री हाही गरिबीचाच परिणाम असतो. बंगाल मध्ये मुलींना फसवून आणि आमिषे दाखवून मोठ्या शहरांत नेले जाते आणि तिथे त्यांची वेश्या व्यवसायासाठी विक्री केली जाते. बंगालात असे प्रकार मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे राष्ट्रीय महिला आयोगाच्या नजरेस आले आहे. अशी ही विक्री झाली की मग त्याच्या मागोमाग एच आय व्ही चाही प्रसार होत असतोच. ही सगळी लक्षणे प. बंगालमध्ये दिसत आहेत. गंगा आणि यमुनेच्या पाण्याचे वरदान लाभलेला हा प्रदेश गरिबीच्या गर्तेत का सापडला आहे असा प्रश्‍न पडतो.

कम्युनिष्ट पक्ष स्वत:ला गरिबांचे कैवारी समजतात आणि गरिबांचे कल्याण करण्याचे अर्थकारण आणच करू शकतो असा त्यांचा दावा असतो. ते खरे असेल तर ते सिद्ध करण्याची संधी त्यांना बंगालमध्ये एक दोन नाही तर ३५ वर्षे मिळाली होती. त्यांनी आपले अर्थकारण तिथे सिद्ध करायला हवे होते. विशेषत: सार्‍या जगात तसेच भारत आणि चीन या दोन महाकाय देशांत समाजवादी अर्थकारणाची पिछेहाट होत असताना आणि भांडवलशाही उदयाला येत असताना साम्यवादांनी ही मुक्त अर्थव्यवस्था गरिबांच्या कल्याणाची नाही हे आपल्या धोरणांतून दाखवून द्यायला हवे होते पण त्यांनी ३५ वषार्र्ंत बंगालला कंगाल केले आहे.

Leave a Comment