किती हे राजकीय पक्ष ?

commission
भारतात राजकीय पक्षांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या देशात १८ पेक्षाही अधिक राजकीय पक्ष असल्याचे दिसून आले आहे. यातले सगळेच पक्ष मान्यता प्राप्त नाहीत. राजकीय पक्षांचे नोंदणीच्या बाबतीत दोन प्रकार असतात. प्रत्येक पक्षाला सरकारकडे आपल्या नावाची नोंदणी करावी लागते पण नोंदणी केलेल्या प्रत्येक पक्षाला सरकारची मान्यता असतेच असे नाही. मान्यताही दोन प्रकारच्या असतात. प्रादेशिक आणि राष्ट्रीय. एखादा पक्ष एखाद्या विशिष्ट राज्यापुरताच मर्यादित असेल आणि त्याला एखाद्या निवडणुकीत एकूण मतांच्या काही विशिष्ट टक्के मिळाली असतील तरच त्याला सरकारची मान्यता मिळू शकते. तोच प्रकार राष्ट्रीय पक्षाचा. देशभरात झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत एकापेक्षा अधिक राज्यांत ठरवून दिलेल्या टक्केवारीत मतदान झाले असेल तरच त्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली जाते.

राजकीय पक्षाला मान्यता असल्यास काही लाभ मिळतात. सरकारने नियंत्रित केलेल्या माध्यमातून त्यांना प्रचार करता येतो. त्यांना निश्‍चित निवडणूक चिन्ह मिळते. पक्ष मान्यता प्राप्त नसल्यास त्याला हे लाभ मिळत नाहीत. निवडणूक मात्र लढवता येते. देशात किती नोंदलेले पक्ष असावेत आणि किती मान्यताप्राप्त पक्ष असावेत या बाबत काही कायदा करण्यात आलेला नाही. कितीही पक्ष निवडणुकीत उतरू शकतात. कोणत्याही पक्षाचा उमेदवार असेना किंवा अपक्ष का उमेदवार असेना त्याला निवडणुकीचे नियम पाळावे लागतात आणि निवडणूक आयोगाने नेमून दिलेल्या मर्यादेतच खर्च करता येतो. त्यांना आचारसंहितेचेही पालन करावे लागते. पक्ष कितीही लहान असला तरी त्याला सगळे नियम आहेत आणि सगळ्या प्रकारचे स्वातंत्र्यही आहे.

देशात किती राजकीय पक्ष असावेत यावर काही बंधने नसली तरी लोकांना फार पक्ष अस्तित्वात असणे योग्य वाटत नाही. किंबहुना देशात दोनच राजकीय पक्ष असावेत आणि तेच चांगल्या लोकशाहीचे लक्षण आहे असेही काही लोकांचे म्हणणे असते. पण तसे मानण्याचे काही कारण नाही. जितक्या प्रकारचे विचार असतील तितक्या प्रकारचे राजकीय पक्ष देशात असायला काही हरकत नाही पण अलीकडे वाढत चाललेली पक्षांची संख्या चांगली नाही. काही लोक कसलेही विचाराचे अधिष्ठान नसताना पक्ष स्थापन करतात आणि आपले उमेदवार उभे करतात. त्यातल्या काही लोकांना आपला काळा पैसा पांढरा करायचा असतो. ते आपल्या जवळचा पैसा प्रत्यक्षात खर्च न करता निवडणुकीत खर्च झाला असे दाखवून तो पैसा व्यवहारात आणतात. शिवाय इतरही काही वाईट हेतूने पक्षा काढणारे लोक आहेत.

Leave a Comment