सोल्जर स्पिरीट

terrorist
एखाद्या गावात अतिरेकी शिरले तर त्यांचा बंदोबस्त करायला पोलीस किंवा निमलष्करी दलाच्या जवानांनीच पुढे आले पाहिजे अशी आपली कल्पना असते. अर्थात ती कल्पना पूर्णपणे चुकीची नाही कारण अतिरेक्यांशी लढायचे तर हातात शस्त्र हवेच. ते तर पोलिसांकडे किंवा जवानांकडेच असते. पण काही वेळा अशी वेळ येऊन ठेपते की, अतिरेक्याला पकडायला शस्त्रांची गरज असतेच असे नाही. तेव्हा सामान्य माणसेही धारिष्टाने पुढे येऊन त्याला पकडू शकतात. मात्र त्यांच्या मनात देशप्रेम पाहिजे आणि मनात सोल्जर स्पिरीट पाहिजे. देशावर संकट येते तेव्हा केवळ जवानांनीच आपल्या जीवाची बाजी लावली पाहिजे असे काही नाही. वेळ पडल्यास सामान्य माणसेही आपला जीव पणाला लावण्यास पुढे येतात. काल उधमपूरमध्ये असाच प्रकार घडला.

गावात दोन अतिरेकी शिरले आणि त्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार करून दोघांचे प्राण घेतले. जवानांनीही त्यांना चोख उत्तर देऊन त्यातल्या एकाला ठार केले. दुसरा अतिरेकी पळून जाण्याच्या तयारीत होता पण त्याला ते अशक्य असल्याचे लक्षात आले तेव्हा त्याने दोघा नागरिकांना ओलीस ठेवले आणि आपल्याला निघून जाण्याची संधी न दिल्यास आपण या दोघांना ठार करू अशी धमकी दिली. अशा वेळी ओलीस असलेले नागरिक घाबरून जातात आणि त्यांची सुटका करून घेण्यासाठी अतिरेक्यांना सोडून दिले जाते. पण कालच्या घटनेतल्या ओलीस नागरिकांनी त्याला पकडून दिले. आपण तर नि:शस्त्र होतो तेव्हा आपण काही करू शकणार नाही असे म्हणून ते रडत बसले नाहीत.

गेल्या काही दिवसांपासून एक अशुभसूचक गोष्ट जाणवत आहे. पाकिस्तानातून पाच सहा अतिरेकी पाठवले तरीही ते भारतातल्या एका गावाला वेठीस धरू शकतात अशी अतिरेक्यांची कल्पना झाली आहे. तसे दोन हल्ले त्यांनी केले आहेत. यापुढे असेच हल्ले करण्याची त्यांची योजना असेल तर आपणही आता तयार असले पाहिजे. चार दोन अतिरेकी आता गावाला वेठीस धरू शकणार नाहीत हे आपणही दाखवून दिले पाहिजे. त्यासाठी काही करावे लागत नाही. प्रत्येकाने यावेळी सोल्जर स्पिरीटने काम केले पाहिजे. मागे काश्मीर मध्ये एक तरुणीने दोघा अतिरेक्यांना एकटीनेच झोडपून काढून पळायला भाग पाडले होते. अशा वेळी केवळ एकच भीती असते ती म्हणजे जीव गमवायची. पण देशासाठी प्राण देण्याने काही नुकसान होत नाही उलट जीवनाचे सार्थक होते.:

Leave a Comment