बुवाबाजीची कमाल

radhe-maa
आपल्या समाजात बुवाबाजीला फार ऊत आला आहे. लोक जसे जास्त शिकायला लागतील तसे या बुवा आणि नकली संतांचे प्रस्थ कमी कमी होत जाईल अशी आशा व्यक्त केली जात होती पण शिक्षणाचे प्रमाण वाढूनही बुवाबाजी काही कमी होताना दिसत नाही. उलट सुशिक्षित लोक अशा बुवांच्या जास्तच नादी लागत आहेत. असे प्रकार पाहिले की, आपल्या शिक्षणाचा हेतू विफल होत असल्याची जाणीव व्हायला लागते. सध्या ममतामयी राधे मॉं या बाईची ख्याती सर्वांसमोर आली आहे. ही बाई बोरीवलीत राहते आणि तिच्या ममताभरल्या शब्दात लोकांना आशीर्वाद देत असते. तिच्या आशीर्वादाने आपले कल्याण होते असे लोकांना वाटते आणि तसे काही ऐकले की लोकांची रीघ लागते. आपले कल्याण आपल्या कष्टातून होत असते पण आता लोकांना कष्टाविना कल्याण हवे आहे आणि अशा लोकांच्याच रांगा अशा ढोंगी लोकांकडे लागत असतात.

राधे मॉं हिच्यावर एका हुंडाछळाचा गुन्हा दाखल झाला आहे आणि त्या निमित्ताने ती वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. या वादाने तिच्या काही भक्तांना व्यथित केले आहे आणि त्यांनी मॉंचे समर्थन करण्याचा प्रयत्न चालविला आहे. तिच्यावरचा आरोप खोटा आहे आणि न्यायालयात ते सिद्ध होईलच असा या भक्तांचा विश्‍वास आहे. एकवेळ आपण ही गोष्ट मान्यही करू. ही राधे मॉं निर्दोष आहे असे आज गृहितही धरायला काही हरकत नाही कारण नाहीतरी हुंड्यासाठी छळ केल्याच्या खटल्यात आरोपींना फार कमी प्रमाणात शिक्षा होत असतात. असे असले तरीही मॉं हे काय प्रकरण आहे. तिच्या भक्तांचे असे म्हणणे आहे की मॉँच्या एका कटाक्षाने आपल्या सर्वांचे कल्याण झाले आहे.

आपण तिच्यावरचा खटला विसरून जाऊ आणि कटाक्षाने कल्यास कसे होत असते हे तपासून पाहू. या कल्याणाला कसलाही विज्ञानाचा आधार नाही. काही लोक अध्यात्माचा आधार घेऊन अशा प्रकारांचे शास्त्रीय समर्थन करण्याचा प्रयत्न करतात पण अध्यात्माचाही आधार याला नाही. आपल्या देशातले हे लोकांचे वेडेचार पाहिल्यावर स्वामी विवेकानंदांनी चिडून आणि वैतागून असे विचारले होते की, हा देश आहे की वेड्यांचे इस्पितळ आहे ? आपल्या देशात मॉँ, महाराज, अशा पदव्या घेऊन कोणीही लोकांच्या कल्याणाच्या गोष्टी बोलायला लागले की लोक वेड्यासारखे त्याच्या मागे धावायला लागतात. खरा धर्म म्हणजे काय हे त्यांना कळतच नाही. अध्यात्म, दैवी सामर्थ्य, तप:श्‍चर्या अशा शब्दांनी लोकांची फसगत होते. लोकांचे प्रबोधन होण्याची फार गरज आहे.

Leave a Comment