पाकिस्तानची बनवाबनवी

terrorist1
काल उधमपूर मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेला एक अतिरेकी आपल्या हातात जिवंत सापडला. पाकिस्तान अशा हल्ल्याशी आपला काही संंबंध नसल्याचा कांगावा करते. तशी संधीही त्याला मिळते कारण भारताने त्याच्यावर असा आरोप करावा असे काही पुरावेच हाती लागत नाहीत पण एखादा अतिरेकी हाती जिवंतपणे लागतो आणि त्याचा ठाव ठिकाणा उघड होतो तेव्हा पर पाकिस्तानच्या मुस्काडात बसल्यासारखे होते. अशा वेळी पाकिस्तानची बोलती बंद व्हायला पाहिजे पण पाकिस्तान सारखा निर्लज्ज देश या जगात नाही. एवढा पुरावा सापडला असूनही पाकिस्तान हात वर करण्याचा पवित्रा घेते. आताही तसा घेतलाच आहे. भारताच्या हाती लागलेला हा नावेद नावाचा अतिरेकी पाकिस्तानी नाही अशी मखलाशी पाक सरकारने केली आहे. पण पाकिस्तानातल्या वृत्तपत्रांनी सरकारलाच उघडे पाडले आहे आणि उधमपूर हल्ल्याच्या बातम्या देताना हा नावेद पाकिस्तानचा राहिवासी असल्याचे त्या बातम्यांत म्हटले. मागे कसाब सापडला तेव्हा पाक सरकारने असाच खेळ केला होता पण तो फार दिवस चालला नाही.

काही पत्रकारांनी कसाबच्या घरापर्यंत जाऊन त्याची ओळख पटवली. तशी आता वेळ आली नाही. पाकिस्तानातल्या वृत्तपत्रांनीच आपल्या सरकारला उघडे पाडले. एवढी नामुष्की पाकिस्तानी सरकारवर आजवर कधी आली नसेल. भारतात सीमेपलीकडून होणारे अतिरेकी हल्ले पाकिस्तानच्या प्रोत्साहनानेच होतात हे काही सांगण्याची गरज नव्हती पण या नावेद नावाच्या विशीतल्या अतिरेक्यांनी त्याचा सज्जड पुरावाच सादर केला. सुपारी घेऊन खून खराबा करणारा कोणी मवाली कधी आपल्या दुष्कृत्यांची कबुली देत नसतो. त्याला कोणीतरी उघडे पाडावे लागते. तसे पाकिस्तानचेही होतेे. भ्याड हल्ले करायचे आणि नंतर हात वर करायचे हा पाकिस्तानचा उद्योग गेल्या तीन दशकांपासून सुरू आहे. पण दोनच दिवसांपूर्वी २६/११ च्या हल्ल्याची चौकशी करणार्‍या पाकिस्तानातल्या अधिकार्‍यांनीच त्या हल्ल्यामागे पाकिस्तानचाच हात होता हे जगासमोर जाहीरपणे कबूल केले आणि काल त्याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली. असा दहशतवादी हाती सापडला की पाकिस्तानची अवस्था चोरी करताना रेड हँड पकडलेल्या भुरट्या चोरासारखी होते. हाती लागलेल्या या नावेदने आपला सारा पत्ता आणि कुटुंबाची माहितीही सांगितली आहे. आता भारताच्या हातात पाकिस्तानला जगासमोर उघडे पाडण्याची ती एक संधी आयती चालून आली आहे.

कालचा हा सारा प्रकार गुरुदासपूरच्या प्रकारानंतर केवळ दहा ते बारा दिवसातच झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे उधमपूरमध्ये सापडलेले हे दोघे गेल्या दहा बारा दिवसांपासून भारतात भटकत होते. याचा अर्थ असा होतो की भारतात मुंबई हल्ल्याप्रमाणे गोंधळ घालण्याच कारस्थान रचून पाकिस्तानने अनेक अतिरेकी भारतात पाठवलेले आहेत. याच दरम्यान मिळालेल्या एका माहितीनुसार असे नऊ अतिरेकी दिल्ली शहरापर्यंत पोचले आहेत. आपल्याला आता फार सावध राहण्याची गरज आहे. हाती लागलेल्या नावेद च्या जबाबात आता बरीच नवी माहिती मिळायला लागेल आणि तिच्यावरून सारे कारस्थान उघड होईल. पाकिस्तानच्या या नव्या चालीमुळे पाकिस्तानातले काही तरुण डोकी फिरवून भारतात पाठवले जातील आणि ते काही प्रमाणात गोंधळ घालतील असे दिसायला लागले आहे. पण शेवटी त्यांना पकडले जाईलच ना ! मग पाकिस्तानला त्यातून काय मिळणार आहे ? अशा कारवायांत पाकिस्तानचा फायदा काय ? खरे तर तसा काहीच फायदा नाही. पण आंतरराष्ट्रीय राजकारणात पाकिस्तानची ही नवी चाल केवळ काश्मीर प्रश्‍न तेवत ठेवण्यासाठीच उपयोगाची आहे.

आपल्या देशातले चार दोन तरुण मारले जातील, थोडा खर्च होईल पण ही मुले जो जबाब देतील त्यात ती मुले आपण काश्मीर मधील अत्याचाराचा बदला घेण्यासाठी हे काम केले आहे असे आवर्जुन सांगतील. पाकिस्तानला तेच साधायचे आहे. कारण तसे केल्याने काश्मीरमध्ये काही तरी अन्याय चालला आहे आणि तिथली जनता भारतात सुखी नाही असे भासवण्यात यश येते. तोच पाकिस्तानचा हेतू आहे. खरे तर पाकिस्तानला काश्मीरशी काही देणे घेणे नाही. पण काश्मीर प्रश्‍न तेवत ठेवण्यात त्याचा स्वार्थ आहे तसेच त्याच्यापेक्षा चीन आणि अमेरिकेचा स्वार्थ जास्त आहे आणि त्यांची मदत पाकिस्तानला मिळत आहे. तिच्या बदल्यात पाकिस्तान भारतात अशा कारवाया करते. चीनला हे हवे आहे. म्हणूनच चीनने पाकिस्तानला मदत केलेली आहे. संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानला अतिरेकी राष्ट्र म्हणून घोषित करण्याचा ठराव चीनने रोखला आहे तो याचसाठी रोखला आहे. पाकिस्तान यापुढच्या काळात अशाच कारवाया वाढवत राहणार आहे. अशा वेळी आपण काय केले पाहिजे हे उधमपूरच्या दोघा नागरिकांनी दाखवून दिले आहे. अशा नागरिकांची संघटना स्थापन करण्यात आली आहे आणि त्यांना अतिरेक्यांशी सामना करण्याचे प्राथमिक धडे दिलेले आहेत. अशीच दले सार्‍या सीमावर्ती राज्यांत स्थापन झाली पाहिजेत.

Leave a Comment