मुलीनी मारली बाजी

girls
मुली अभ्यासात पुढे असतात ही बाब आता प्रकर्षाने पुढे आली आहे. दरसाल दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल लागले की ही बाब स्पष्टपणे दिसून येते. या मागे कारणे काय आहेत ही गोष्ट वेगळ्या चर्चेची आहे. मुली मुलांपेक्षा कमी चंचल असतात आणि अभ्यास चांगला करण्यासाठी जी एकाग्रता लागते ती मुलींमध्ये मुलांपेक्षा जास्त असते. प्रसंगाचे गांभीर्य आणि आपल्या हितासाठी काय केले पाहिजे याची जाणीव या गोष्टी मुलांपेक्षा मुलींमध्ये कमी वयात विकसित होतात. स्पर्धात्मक परीक्षांतही मुलीच बाजी मारतात. आता या गोष्टी फार चर्चिल्याही जात नाहीत. पण मुली हुशार असतानाही त्यांनाच शिक्षणापासून वंचित ठेवण्यात येत होते. मुलगा आणि मुलगी यातल्या कोणाला शिक्षण द्यायचा असा काही प्रश्‍न घरात निर्माण झाला तर मुलीला घरात बसवून मुलाला शिकायला पाठवले जाते.

म्हणजे आपण आजवर मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवून देशातल्या गुणवत्तेची उपेक्षा करीत होतो. आता आता मुली जास्त शिकायला लागल्या आहेत आणि त्या विविध क्षेत्रात आघाडीवर येत आहेत. येत्या काही वर्षात मुली आणि पर्यायाने महिला मुलांपेक्षा पुढे असल्याचे दिसायला लागेल. कारण आता आता मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वेगाने वाढत चालले आहे. २००१ ते २०११ या काळात मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण ११६ टक्क्यांनी वाढले आहे तर मुलांचे हेच प्रमाण ६५ टक्के एवढे वाढले आहे. या टक्केवारी मुळे काही लोकांचा गैरसमज होण्याची शक्यता आहे. मुलांच्या शिक्षणाचे प्रमाण कमी वाढले आहे पण मुळात त्यांच्या या प्रमाणाला वाढण्याची संधीच नव्हती. मुले प्रवेशाच्या बाबतीत आधीच पुढे होती.

मुलींना शाळेत पाठवावे की नाही असा प्रश्‍न काही कुटुंंबात विचारला जात होता त्या कुटुंबात आता तो प्रश्‍न निकाली निघाला आहे. मुलींना मुलांइतकेच प्राधान्याने शाळेत घातले पाहिजे हे आता लोकांना कळायला लागले आहे. त्यामुळे मुलींचे शाळांत प्रवेश घेण्याचे प्रमाण एकदम वाढले आहे. आता या मुलीच मुलांशी स्पर्धा करायला सिद्ध झाल्या आहेत. मुलींना आधीही शाळा महाविद्यालयात घातले जात होते पण अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शाखांसारख्या खर्चिक शाखांकडे त्यांना संधी दिली जात नव्हती. आता याही शाखांना मुली येत आहेत आणि त्याही शाखांत त्यांचे प्रवेश घेण्याचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे. १९७० च्या दशकापर्यंत अभियांत्रिकी महाविद्यालयात मुली औषधालाही सापडत नसत पण आता या शाखेत प्रवेश घेण्याचे मुलींचे प्रमाण ३२६ टक्क्यांनी वाढले आहे तर मुलांचे प्रमाण १५० टक्क्यांनी वाढले आहे.

Leave a Comment