सोनियांनी सोडले मौनव्रत

sonia-gandhi
कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा मौन व्रताशी किती निकटचा संंबंध आहे हे सर्वांनाच माहीत आहे. त्या स्वत: जनरला नॉलेज आणि भाषा या दोन्हीच्या बाबतीत असलेल्या अनभिज्ञतेमुळे कायम स्वत:वर लादलेल्या मौनव्रतात असतातच पण त्यांनी मनमोहनसिंग यांना मौनव्रत स्वीकारायला भाग पाडून का होईना त्यांच्या बोलण्यावर बंधने घातली होती. एकंदरीत मौनव्रताशी एवढ्या जवळून संबंध असलेल्या कायम मौनव्रती सोनिया गांधी यांनी आता पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची मौनीबाबा म्हणून नालस्ती करण्यासाठी का होईना पण आपले मौनव्रत सोडले आहे. त्यातून त्यांचा आणि कॉंग्रेसचा मोदी यांची एक विशिष्ट प्रतिमा निर्माण करण्याचा घाट दिसत आहे. पक्षात आणि सरकारमध्ये बरेच काही सुरू असूनही ते गप्प बसले आहेत म्हणजे त्यांचे वर्चस्व संपले आहे असा प्रचार करण्याचा त्यांचा डाव आहे. म्हणून काही कॉंग्रेसी खासदार मोदी गप्प का बसले आहेत ? मोदी यांनी मौन व्रत का घेतले आहे ? असा सवाल सातत्याने करीत आहेत. सोनिया गांधी यांनी आता त्यांचेच अनुकरण करीत मोदी यांना मौनीबाबाची पदवी देऊन टाकली आहे.

मोदी यांनी मौन व्रत धारण केले आहे हे खरे आहे कारण त्यांना पंतप्रधानपदाच्या पातळीच्या प्रश्‍नांची दखल घेण्याची इच्छा आहे. सगळ्याच गावगन्ना प्रश्‍नांवर आपले तोंड उघडण्याची गरज त्यांना वाटत नाही. मात्र त्यांच्यावर सोनिया गांधी यांनी मौनी बाबा असल्याचा आरोप करावा यासारखा विनोद काय असेल ? एकवेळ दिग्विजयसिंग यांनी तसा आरोप केला तर तो खपून जाईल. कारण त्यांना वारंवार सांगूनही मौनव्रत स्वीकारता येत नाही. त्यांना सातत्याने काही तरी आवश्यक आणि अनावश्यकही बोलण्याची खोड जडली आहे तेव्हा त्यांनी मोदी यांना मौनी बाबा म्हटले असते तर तो विनोद ठरला नसता. सोनिया गांधी यांचे तसे नाही. त्यांना आवश्यक असेही काही बोलता येत नाही. अज्ञानापोटी का होईना पण त्यांना मौन व्रत धारण करावे लागते. मौनव्रत सोडून काही बोलायचे ठरवलेच तर सोनिया गांधी यांना चार दोन वाक्यांपेक्षा अधिक बोलताही येत नाही. तेव्हा अशा कायम मौनात राहणार्‍या सोनिया गांधी यांनी नरेन्द्र मोदी यांना मौनीबाबा म्हणणे ही मोठीच विसंगती आहे. त्यांच्यावर तसा आरोप करण्यासाठी सोनिया गांधी यांना आपले अनेक दिवसांपासूनचे मौनव्रत सोडावे लागले आहे. खरे तर माेदी बोलायला तयार आहेत. कॉंग्रेसच्या नेत्यांनी सुषमा स्वराज यांच्यावर जे काही आरोप केले आहेत त्यावर संसदेत चर्चा होऊ द्या असे मोदी यांनी म्हटले आहे. तेव्हा मोदी बोलायला तयार आहेतच पण संसदेत बोलायला तयार आहेत.

कॉंग्रेसचे नेते मात्र संसदेत बोलायला तयार नाहीत. ते संसदेच्या बाहेर आपल्या मनाला येईल तसे आरोप करीत सुटले आहेत. असे बाहेर केलेल्या आरोपांत तर्कशुद्धता किती याचा शोध कोणी घेत नाही. बाहेर जो काही असतो तो प्रचाराचा धुरळा असतो. तसा तो उडवून दिला की, भाजपावालेही कॉंग्रेसवाल्यांसारखेच असा भास निर्माण करता येतो. कॉंग्रेसला तेच हवे आहे. प्रचाराचा धुरळा उडवून देणे आणि मंत्र्यांचे राजीनामे घेतले ती आपला मोठा विजय झाला असल्याचे चित्र निर्माण करता येते असे त्यांचे डावपेच आहेत, संसदेत चर्चा करायला गेले की, आरोप पुराव्यानिशी करावे लागतात आणि ते पुरावे बनावट असतील तर त्यांना उत्तर देण्याची संधी सत्ताधार्‍यांना मिळते. आरोपात तथ्य नसेल तर आरोप करणारे कॉंग्रेसवाले उघडे पडतात. तेच कॉंग्रेसला नको आहे. चर्चा नको, पुरावे नकोत, मंत्र्यांना आपले म्हणणे सादर करण्याची संधी नको आधी राजीनामे हवेत. म्हणजे केवळ आरोपांची राळ उडवून देऊन त्यांना राजीनामे मिळवल्याचे श्रेय हवे आहे. ते त्यांना मिळत नाही कारण भाजपा नेते काही वेडे नाहीत.

महाराष्ट्राच्या विधानसभेत असा प्रकार घडला आहे. पंकजा मुंडे आणि काही मंत्र्यांना सदनाबाहेर बदनाम करण्याचा प्रयत्न कॉंगे्रसच्या नेत्यांनी केला पण मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस त्यांना बळी पडले नाहीत. सदनात काय ती चर्चा झाली पाहिजे असा कणखर पवित्रा त्यांनी घेतला. प्रत्यक्षात चर्चा झाली तेव्हा पंकजा मुंडे यांच्यावर झालेले आरोप पोरकटपणाचे आहेत असे लक्षात आले आणि त्यांचा राजीनामा न घेण्याचा निर्णय किती योग्य आहे हे सर्वांनाच कळले. सुषमा स्वराज आदिंवर होत असलेले आरोप असेच बालीशपणाचे आहेत. म्हणून संसदेत त्यांवर चर्चा झाली तर आपलेच बालीशपण उघड होईल अशी भीती त्यांना वाटते. म्हणूनच चर्चा वगैरे काही नको सरळ राजीनामेच हवेत असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. आपण कोणावर तरी आरोप करतो आणि त्या आरोपांवर त्याला आपले म्हणणे सादर करण्याची संधीच देत नाही हा कुठला न्याय आहे ? त्यांना ती संधी द्या, त्यावर कॉंग्रेसचे मत काय आहे हे सांगा पण तसे काही करण्याची त्यांची तयारीच नाही. हे एक प्रकारचे त्यांचे मौनव्रतच आहे. पण उलट ते पंतप्रधानांवरच मौनव्रताचा आरोप करीत आहेत. आपण स्वत: सातत्याने चर्चेपासून पळ काढायचा आणि सरकारला तसेच पंतप्रधानांना मौनीबाबा म्हणायचे हा सोनिया गांधी यांचा ढोंगीपणा आहे. असा ढोंगीपणा करण्याऐवजी त्यांनी सुषमा स्वराज यांचा राजीनामा का मागत आहेत याचे पुरावे संसदेसमोर ठेवावेत आणि चर्चा करून त्यांचा राजीनामा का आवश्यक आहे हे पटवून द्यावे पण सोनिया गांधी यांना संसदेत बोलता येत नाही.

Leave a Comment