अजितदादाको गुस्सा क्यों……….

ajit-pawar
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची पूजा करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी २० मिनिटे ताटकळवले म्हणून अजित पवार यांना इतका राग आला की, त्यांनी या अधिकार्‍याची मस्ती उतरवली पाहिजे असा दम भरला. आता अजित पवार सत्तेत नाहीत पण त्यांना अधिकार्‍यांना अशा धमक्या देण्याची सवय लागली आहे. त्यांनी सत्तेवर असताना अशाच दमदाट्या करून अधिकार्‍यांकडून आपल्या फायद्याची कामे करून घेतली आहेत. पण त्यांनी आता या जिल्हाधिकार्‍याची मस्ती उतरवण्याची भाषा केली आहे ती अतीशय चुकीच्या माहितीवर आधारलेली आहे. सध्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते सरकारला बदनाम करण्यासाठी अशाच खोट्या माहितीवर आधारलेली विधाने करायला लागले आहेत. हे जिल्हाधिकारी आत पूजा करीत होते त्यामुळे मुख्यमंत्र्यांना कासवाची पूजा करावी लागली असा शोध अजित पवार यांनी लावला आहे.

खरे तर विठ्ठलाच्या पूजेच्या आधी कासवाची पूजा करून तिथेच मुख्य पूजेचा संकल्प सोडला जात असतो. ती काही कासवाची पूजा असत नाही. पण अजित पवार यांना कोणा तरी तिय्यम दर्जाच्या कार्यकर्त्याने माहिती दिली आणि त्यांनी लगेच जिल्हाधिकार्‍याची मस्ती उतरवण्याची भाषा केली. हा सारा बेजबाबदारपणा आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यावर विधानसभेत खुलासा केला तेव्हा अजित पवार यांचे अज्ञानही उघड झाले. आपण केलेला आरोप चुकीचा आहे हे कळल्यावर त्या आरोपाबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याचाही उपचार पवारांनी पाळला नाही. त्यांना कसेही करून जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांना बदनाम करायचे आहे कारण त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांना कायद्याच्या कचाट्यात पकडले आहे.

हा आमदार भ्रष्टाचारात एवढा गुंतला आहे की त्याला आगामी किमान काही वर्षे तरी तुरुंगात जावे लागेल. त्याने आपल्या मतदारसंघात पोलीस ठाण्यात तर गोंधळ घातला आहेच पण अतिक्रमण करून दुकाने थाटणार्‍या लोकांसाठी प्रशासनाने उभारलेले अडथळे आपल्या हाताने काढले आहेत. त्याने अण्णा भाऊ साठे महामंडळात कोट्यवधींचा भ्रष्टाचार करून त्याच पैशात निवडणूक लढवली असा त्याच्यावर आरोप आहे. निवडून येण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मोटारी दिल्या. यातली एक मोटार आता राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी प्रामाणिकपणाने (?) पोलिसांत जमा केली आहे. अशा रितीने जिल्हाधिकार्‍यांची ही ‘मस्ती’ राष्ट्रवादीला महाग पडत आहे. म्हणून अजित पवार वैतागले आहेत.

Leave a Comment