सावधानतेची गरज

punjab2
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पंजाबच्या गुरूदासपूर जिल्ह्यात केलेल्या हल्ल्यामुळे आता विशेष सावधानतेची गरज निर्माण झाली आहे कारण त्यातून आता पंजाबात दहशतवादी कारवाया २० वर्षांनंतर पुन्हा सुरू होण्याची शक्यता दिसायला लागली आहे. पाकिस्तानने भारताच्या सुरक्षा व्यवस्थेला दिलेले हे आव्हानच आहे. गेल्या दोन तीन वर्षात भारत आणि पाकिस्तान यांच्यातली सीमा वेगाने धोकादायक बनताना दिसत आहेत. जम्म्ाू – काश्मीर सीमेवर पाकिस्तानच्या सैनिकांनी गोळीबार करणे आणि प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडणे हा प्रकार नित्याचा झाला आहे. भारताने आपल्या धोरणानुसार असा प्रकार कधी केला नाही आणि प्रत्युत्त्यर देण्यासाठी भारतीय जवानांनी सुमा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन गोळीबार केला आहे असे प्रकार कधी घडलेला नाही. मात्र पाकिस्तानच्या आगळिकीला भारताने नेहमीच चोख उत्तर दिले आहे. एका बाजूला हे प्रकार घडत असतानाच भारत आणि पाकिस्तान यांच्यात सातत्याने मैत्री संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न जारी आहेत. कारण शेवटी शांततामय सहजीवनानेच आपले प्रश्‍न सुटणार आहेत.

पाकिस्तानच्या नेत्यांना या गोष्टीची जाणीवही नाही आणि तेवढी दूरदृष्टीही नाही. आपला खरा प्रश्‍न गरिबी आहे आणि जगाच्या बरोबर येण्यासाठी आपल्याला आधी ही गरिबी हटवावी लागणार आहे. दोन देशांनी अजूनही विवेकाने वागून आपल्या आर्थिक प्रश्‍नांना प्राधान्य दिले पाहिजे हे पाकिस्तानच्या नादान नेत्यांना कळत नाही. पाकिस्तानचे शेपूट नेहमीसाठी वाकडेच आहे. गेल्या तीन चार महिन्यातले कटुता वाढवणारे सारे प्रकार घडूनही भारतीय जवानांनी पाकिस्तानी जवानांना रमजान ईदची मिठाई पाठवली पण ती त्यांनी नाकारली आणि नेमका त्याच दिवशी गोळीबार करून आपल्या प्रवृत्तीचेे दर्शन घडवले. एका बाजूला राजनैतिक पातळीवर मैत्रीसाठी चर्चा करून नाटक करायचे आणि दुसर्‍या बाजूला दहशतवादी कारवायांना फूस तसेच मदत द्यायची ही पाकिस्तानची चाल पाकिस्तानी नेत्यांना आज फार मुत्सद्दीपणाची वाटत असेल पण शेवटी ती त्यांना महागात पडणारी ठरणार आहे असे सारे जग त्यांना सांगत आहे पण त्यांच्या आणि पाकिस्तानातल्या अनेक लोकांच्या मनात भारताविषयीचा द्वेष ठासून भरला आहे. त्यापोटी पाकिस्तान सातत्याने दहशतवादाचा आसरा घेत आहे. या दोन देशांतले सारे संघर्ष प्रामुख्याने काश्मीर सीमेवर सुरू होते पण काल अचानकपणे त्यांनी पंजाबात घुसखोरी केली.

पंजाब गेल्या अनेक वर्षांपासून शांत होता पण काल पंजाबची सीमा ओलांडून अतिरेक्यांनी भारतीय हद्दीत प्रवेश करणे हे अनपेक्षित होते. काश्मीर सीमेवर पाकिस्तानी लष्कराने किंवा लष्कराच्या मदतीतून दहशतवाद्यांनी हल्ला केला तरी तो असा नव्हता. ते सीमेच्या पलीकडून गोळीबार करतात आणि पळून जातात. भारताने प्रत्युत्तर देताच त्यांच्या बंदुका थंड पडतात. पण पंजाबात काल गुरुदासपूर जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यालत ते आतपर्यंत घुसले आहेत आणि त्यांनी एका पोलीस चौकीवर ताबा मिळवून तिथून लोकांवर गोळीबार सुरू केला. ही पोलीस चौकी सरहद्दीपासून केवळ १० ते १२ किलो मीटर्स अंतरावर आहे. तिथून ते आत घुसले आणि त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून एक मारुती मोटार ताब्यात घेतली. तिचा वापर करून ते आत पर्यंत आले आणि त्यांनी पहाटे पहाटे एका बसवर गोळीबार करून तिच्यातील प्रवाशांना जखमी केले. नंतर त्यांनी आपल्या जवळच्या भारी शस्त्रे आणि दारूगोळ्यांसह पोलीस चौकीवर ताबा मिळवून तिथून गोळीबार करून जवळपास १० ते १५ लोकांना मारले. ही कारवाई मोठी धाडसी तर आहेच पण त्या भागातल्या सीमेवर पहारा देणार्‍या जवानांच्या पहार्‍यावर काही प्रश्‍न निर्माण करणारा आहे.

१९८० च्या दशकात पंजाबात मोठा नरमेध झाला, पूर्ण दशक त्यात गेले. वीस हजारावर लोक मारले गेले. या हिंसेचे परिणाम पंजाबला अनेक दिवस या हिंसाचाराची किंमत मोजावी लागली. त्यानंतर पंजाबशी लगत असलेल्या सीमेवर काटेरी तारांचे कुंपण करण्यात आले आणि बहुंताश सीमा ओलांडणे अवघड व्हावे असा बंदोबस्त करण्यात आला. भारताची शेजारी देशांशी लगत असलेली सीमा फार मोठीही आहे आणि असुरक्षितही आहे. पण या सीमेवरच्या काही भागांत हे कुंपण टाकण्यात आलेले नाही. काम बाकी आहे. त्याचा गैरफायदा घेऊन दहशतवादी आत आले असावेत असे दिसते. काहीही असो पण हा हल्ला म्हणजे २००८ सालच्या मुंबई हल्ल्याची छोटी पुनरावृत्तीच आहे. असे का घडले याचा शोध घेणयाची गरज आहे. पंजाबचे मुख्यमंत्री प्रतापसिंह बादल यांनी या हल्ल्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना हा सवाल उपस्थित केलाच. पंजाबची सीमा शांत आहे म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष झाले असेल तर ती आपल्या सुरक्षा यंत्रणेची चूक आहे. खरे तर या सीमेवर काही प्रमाणात धोका असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. एवढे असूनही हा हल्ला झालाच. आता आपले मंत्री पाकिस्तानला चोख उत्तर देण्याची घोषणा करतीलही पण एकंदर स्थितीच अशी आहे की असा घोषणा आणि वल्गना काही कामाच्या नाहीत. आपल्याला या हल्ल्यांचा मुकाबला राजकीय पातळीवरच करावा लागणार आहे.

Leave a Comment