प्रेरक व्यक्तिमत्त्व

kalam
भारताच्या गेल्या १०० वर्षांच्या जडणघडणत सिंहाचा वाटा असलेल्या नेमक्या १०० लोकांची यादी केली तर त्या यादीत डॉ. अब्दुल कलाम हे नाव अग्रभागी होते. इतका त्यांचा या देशाचे शिल्प तयार करण्यात मोठा वाटा होता. त्यांनी आपल्या असामान्य संशोधन क्षमतेचा वापर करून भारताला क्षेपणास्त्रांच्या क्षेत्रात स्वावलंबी केले होते. भारतात अजूनही १०० टक्के लोकांना दोनदा खायला मिळत नाही. देशातली ८० टक्के जनता अंध:श्रद्धांच्या विळख्यात बद्ध आहे. अशा काळात डॉ. कलाम यांनी या देशात स्वत: विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर आधारलेली क्षेपणास्त्रे विकसित करून ती परदेशांना निर्यातही केली. सध्या जगातले सर्वात वेगवान क्षेपणास्त्र भारताकडे आहे. ब्रह्मोस हे त्याचे नाव. तेवढ्या वेगाचे क्षेपणास्त्र विकसित करणे अजून अमेरिकेलाही शक्य झालेले नाही म्हणून अमेरिकेतले तंत्रज्ञ अस्वस्थ आहेत. असे असामान्य प्रतिभेचे शास्त्रज्ञ आणि देशातले सर्वात लोकप्रिय राष्ट्रपती आपल्यातून गेले आहेत. डॉ, कलाम यांनी हे मोठे यश मिळवले होते आणि देशाच्या निवडक शिल्पकारांच्या यादीत आपले नाव कोरले होते पण त्यासाठी मोठा संघर्षही केला होता. कारण त्यांच्या कुटुंबाची पार्श्‍वभूमी या यशाला अनुकूल नव्हती. रामेश्‍वरच्या समुद्र किनार्‍यावरील एका अशा कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता ज्या कुटुंबाची गुजराण केवळ नाव वल्हवून होत होती. घरात कोणी पदवीधर तर सोडाच पण प्राथमिक शिक्षण घेतलेलाही कोणी नव्हता.

भारतात गरिबी उदंड आहे. गरीब आणि सामान्य कुटुंबातले असेच अनेक तरुण स्वत:चे भवितव्य घडवून देशाच्या कपाळावर आपले नाव कोरण्याची धडपड करीत आहेत. अशा लाखो तरुणांना अब्दुल कलाम हेच आपले रोल मॉडेल वाटत होते. एवढेच नाही तर डॉ. कलाम अशा तरुणांना सतत प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करीत असत. डॉ. कलाम यांची त्या निमित्ताने काढलेले उद्गार अशा तरुणांना वेदांतल्या मंत्रांइतके पवित्र वाटत असत. त्यांनी केवळ अशा होतकरू तरुणांनाच नाहीतर सार्‍या देशालाच प्रेरित केले होते. दारिद्य्राच्या शापातून बाहेर पडू पाहणारा हा देश गरिबीच्या शृंखला तर तोडू शकतोच पण तो जगातला सर्वात महान देश होऊ शकतो असा विश्‍वास त्यांनी जागविला होता. आपला देश कधी न कधी सुपर पॉवर बनावा हे कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न होते आणि हे स्वप्न डॉ. कलाम यांनी या देशाला दिले होते. मात्र डॉ. कलाम हे काही कोरडा आशीर्वाद देणारे कोणी महाराज नव्हते. त्यांनी आपला देश महाशक्ती कसा होऊ शकतो हे सिद्ध केले होते. तशी या देशाची क्षमता आहे हे त्यांनी दाखवून दिले होते.

त्यासाठी व्हिजन २०२० हा प्रबंध सिद्ध केला होता. तो तयार करण्यासाठी देशातल्या विविध क्षेत्रातल्या पाच हजारावर तंत्रज्ञांचे सहकार्य घेतले होते. १९९१ साली असा प्रबंध देेशासमोर ठेवून त्यांनी या देशातल्या नियोजनकर्त्यांना देशाच्या विकासाचा नकाशाच पेश केला होता. आपण आपल्या क्षमता कशा वापरल्या पाहिजेत यावर मार्गदर्शन केले होते. त्यांच्या या प्रतिपादनाने आपल्या देशातल्या जनतेचा आपल्या स्वत:वरचाच विश्‍वास वाढला होता. आपण काही तरी करू शकतो एवढेच नाही तर आपण आपल्या सोबत इतरही देशांत परिवर्तन घडवू शकतो याची शाश्‍वती डॉ. कलाम यांनी दिली होती. गेल्या २५ वर्षात भारतात घडलेल्या बदलात या प्रेरणेचा मोठा वाटा आहे हे कोणीही अमान्य करणार नाही. सार्‍या देशाला प्रेरित करण्याचे सामर्थ्य डॉ. कलाम यांच्यात होते. ते आता काळाच्या पडद्याआड गेले असले तरीही त्यांची ही प्रेरणा अमर झाली आहे. भारत सरकारने डॉ. कलाम यांना आधी पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे दोन किताब दिले होते. एखाद्या वैज्ञानिकाला यापेक्षा मोठा किताब तो काय देणार असे सरकारला वाटले. ते साहजिक होते पण हे दोन किताब मिळाल्यानंतर भारताने डॉ. कलाम यांंच्या नेतृत्वाखाली विज्ञान अाणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एवढी मोठी झेप घेतली की, सरकारला त्यांना भारत रत्न हा सर्वोच्च किताब द्यावा लागला.

अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रपतीपदासाठी डॉ. कलाम यांचे नाव पुढे केले. ही आपल्या लोकशाहीतली मोठी स्वागतार्ह घटना होती. राष्ट्रपती होण्यासाठी अनेक निवृत्त राजकीय नेते नटून बसले असताना वाजपेयी यांनी एका शास्त्रज्ञाला हा मान दिला. डॉ. कलाम यांंच्याविषयी सर्वांनाच आदर होता. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी डॉ. कलाम यांची उमेदवारी उचलून घेतली. आपल्या या पदावरच्या अविरोध निवडीला डॉ. कलाम यांनीही न्याय दिला. या पदावर असताना त्यांनी शेवटपर्यंत दरमहा केवळ एक रुपये एवढे लाक्षणिक वेतन घेऊन याही बाबतीत एक आदर्श उभा केला. त्यांचे नातेवाईक किंवा रामेश्‍वरचे लोक राष्ट्रपती भवन बघायला येत असत तेव्हा डॉ. कलाम त्यांच्यावर होणारा खर्च सरकारवर बसवू शकत होते पण त्यांनी तसे कधीही केले नाही अशा आपल्या पाहुण्यांचा खर्च ते स्वत:च्या खिशातून करीत असत. आपण राष्ट्रपती झालो तरीही शेवटी आपला स्वभाव आणि छंद शिक्षकी हाच आहे याचा विसर त्यांना कधी पडला नाही.

Leave a Comment