जनता परिवारातली दुही

nitish-kumar
लालू प्रसाद, नितीशकुमार आणि मुलायमसिंग यादव यांनी एकत्र येऊन जनता परिवार निर्माण केला आणि बिहारच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला आव्हान देण्याचा पवित्रा घेतला पण या तिघांच्या मनात परस्परांबद्दल म्हणावे तेवढे प्रेम नाही. त्यामुळे या तिघांची ही युती कितपत टिकावू ठरेल याविषयी शंका व्यक्त होत आहेत. हा जनता परिवार एकत्र आल्याची घोषणा झाली तेव्हा लालूंनी आगामी मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमार यांचे नाव जाहीर केले. ते करताना बराच अंतर्गत संघर्ष झाला पण लालूप्रसादांनी काळाची गरज ओळखून समजूतदारपणा दाखवला. असे असले तरीही त्यांना आपल्या मनातली भावना लपवता आली नाही. प्रदीर्घ काळ वैर असलेल्या नितीश यांच्याशी युती कशी करणार असा सवाल केला असता ते म्हणाले, भाजपाशी सामना करण्यासाठी विषही प्यायला तयार आहे.

याचा अर्थ नितीशकुमार यांच्याशी युती करणे हे विष प्राशन करण्यासारखेच आहे. काल नितीशकुमार यांनी या टिप्पणीची परतफेड केली. त्यांच्या एका चाहत्याने विचारले, निवडणुकीत लालूंच्या पक्षाला अधिक जागा मिळाल्यास आपण काय करणार ? मुख्यमंत्री कोण होणार ? या प्रश्‍नाला उत्तर देताना नितीश यांनी आपल्या ट्विटरवर म्हटले, ‘बिहारचा विकास हा माझा अजेंडा आहे. मी एक चंदनाचे झाड आहे. चंदनाच्या झाडाला विषारी सापाने वेटोळे घातले तरी चंदनाचा गुणधर्म जात नाही.’ यावर काही टिप्पणीही करण्याची गरज नाही.

या गोष्टीवर नितीशकुमार यांनी बरीच सारवासारवी केली पण ती निव्वळ निरर्थक होती. बिहारमध्ये जनता परिवाराची सत्ता येणे लालूसाठी जास्त आवश्यक आहे म्हणून त्यांनी नितीशकुमार यांच्या या टिप्पणीवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. लालूंचा एक पाय तुरुंगात आहे म्हणून त्यांनी ही टिप्पणी सहन केली. आता अशाच संकटात असलेल्या मुलायमसिंग यांनी संसदेतल्या गोंधळात भाजपाच्या बाजूने आपले मत व्यक्त केले आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी या प्रकरणात राजीनामा देण्याची गरज नाही असे समाजवादी पक्षाने म्हटले आहे. जनता परिवार बिहारात भाजपाच्या विरोधात दंड थोपटत आहे. पण उत्तर प्रदेशात जनता परिवाराने भाजपाला अनुकूल भूमिका घेतली आहे. जनता परिवाराने एकत्र येण्याचा आणि भाजपाला आव्हान देण्याचा कितीही आव आणला तरीही या परिवारातले नेते भ्रष्ट आहेत आणि अनेक प्रकरणात अडकलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर चौकशीची तलवार नेहमीच टांगती असते आणि त्यानुसार ते परिवाराला कधीही सोडू शकतात.

Leave a Comment