संसद म्हणजे काय ?

sansad
१९८० च्या दशकात जॉर्ज फर्नांडिस यांनी संसदेतल्या गोंधळाला कंटाळून मोठी वादग्रस्त टिप्पणी केली होती. ही संसद आहे की, मासळी बाजार आहे असा सवाल केला होता. त्यावर बराच गदारोळ झाला होता. तो काळ संजय गांधी सदनात असण्याचा होता. आता संसदेतला गांेंधळ हा नित्याचा प्रकार झाला आहे पण संसदेत अशा प्रकारचा गोंधळ घालण्याचा पायंडा संजय गांधी यांनी पाडला आहे हे कोणताही जुना माणूस सांगू शकेल. याच काळात अटल बिहारी वाजपेयी यांनी गोंधळाला वैतागून आपण आता या सभागृहात कधीच येणार असा पवित्रा घेतला होता. संसदेत गांंेंधळ होतच नसतो असे काही सांगता येत नाही. सत्ताधारी पक्ष विरोधकांंचे म्हणणे ऐकूनच घेत नसेल तर अस्वस्थ झालेले विरोधक गोंधळ घालतात. तो गोंधळ सदनातल्या सत्ताधार्‍यांच्या वर्तनामुळे ‘होत’ असतो. पण कॉंग्रेसने संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ ‘घालण्या’चे धोरण ठेवले आहे. असे नियोजन करून गोंधळ घालणे म्हणजे कामकाजात वाईट हेतूने अडथळे आणणे आहे. पण कॉंग्रेसने हाच मार्ग अवलंबण्याचे ठरवले आहे. या बाबतीतही कॉंग्रेसमध्ये एकमत नाही. कॉंग्रेस सांसदीय पक्षाच्या बैठकीत सोनिया गांधी यांनी आपल्या खासदारांना आक्रमक होण्याचा आदेश दिला. लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या कॉंग्रेस पक्षाने सत्ताधारी भाजपाचे सरकार अपयशी ठरले असल्याची भावना जनतेत निर्माण करण्यासाठी संसदेचा असा वापर करण्याचे ठरवले आहे.

भारतीय जनता पार्टीने कॉंग्रेस सत्तेवर असताना अशाच रितीने संसदेचा वापर केला होता आणि संसदेत गोंधळ घालून अनेकदा कामकाज बंद पाडले होते. आता कॉंग्रेसने त्याच प्रकाराची पुनरावृत्ती करीत भाजपाला संसदेत बदनाम करण्याची रणनीती आखली आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचा राजीनामा घ्यावा त्याशिवाय कामकाज होऊ देणार नाही अशी भूमिका घेऊन सुषमा स्वराज या भ्रष्ट आहेत ही गोष्ट लोकांच्या मनावर ठसवण्याचा कॉंग्रेसचा डाव आहे. एखादी खोटी गोष्ट वारंवार सांगितली की ती खरीच आहे असे लोकांना वाटते. त्यातच सुषमा स्वराज यांनी राजीनामा दिला की, आपल्यामुळे केन्द्रातल्या एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला असे श्रेय मिळवता येईल अशी कॉंग्रेसची कल्पना आहे. ते श्रेय मिळवण्यासाठी संसदेत गोंधळ घालायचा आणि कामकाजच होऊ द्यायचे नाही म्हणजे सरकारवर दबाव येईल असे कॉंग्रेस नेत्यांना वाटते. पण सरकारनेही बरीच तयारी केली आहे. भाजपा नेत्यांनी सदनात आणि बाहेर अनेक प्रकारांनी कॉंग्रेसच्या या अपप्रचाराला उत्तर देण्याची सिद्धता केली आहे.

सदनात कितीही गोंधळ घातला तरीही त्या दबावाला न जुमानता भाजपाने आधी चर्चा करा असे कॉंग्रेसच्या नेत्यांना बजावले आहे. खरे तर कॉंग्रेसचे सगळेच नेते गोंधळाच्या बाजूचे नाहीत. माजी मंत्री शशी थरूर यांनी वेगळे मत मांडले आहे. लोकसभेत आपली संख्या केवळ ४४ आहे ती सदनाचे कामकाज बंद पाडण्यास पुरेशी नाही तेव्हा गोंधळाच्या ऐवजी चर्चेचा मार्ग चोखाळावा आणि चर्चेत मुद्यांच्या आधारावर सत्ताधारी भाजपाला अडचणीत आणावे असे थरूर यांचे मत होते पण कॉंग्रेसच्या नेत्यांना आपण मुद्यांच्या आधारावर भाजपाला भारी पडू की नाही याबाबत आत्मविश्‍वास नाही. त्यामुळे बहुतेक कॉंग्रेस खासदारांनी गोंधळ घालण्यालाच दुजोरा दिला. आपण गोंधळ घालण्याचे काम छान करू शकतो याबाबत त्यांना विश्‍वास आहे. या बैठकीत शशी थरूर यांना कोणी दुजोरा दिला नाही पण बाहेर मात्र आणखी एक माजी मंत्री एम. एस. गिल यांनी त्यांची बाजू उचलून धरली. सदनात गोंधळ घालण्याऐवजी चर्चा केली आणि तिचे वार्तांकन झाले तर लोकांच्या समोर आपली बाजू येईल असे त्यांचेही मत होते. ते चर्चेच्या बाबतीत अधिक गंंभीर होते कारण या देशातली जनता आपल्याकडे आणि सरकारकडेही मोठ्या अपेक्षेने पहात आहे ितच्या मनात आपल्याविषयी अनादर निर्माण होईल असे काही करता कामा नये असे त्यांना वाटते. भाजपाने विरोधात असताना गोंधळ घातला म्हणून आपणही गोंधळच घालावा असे काही नाही असे मत त्यांनी मांडले.

कॉंग्रेसच्या नेत्यांना मात्र चर्चेत आपण कमी पडू अशी सारखी भीती वाटते. अर्थात ते चर्चेत तर कमी आहेतच पण आंदोलनाचेही काम त्यांना नीट जमत नाही. भाजपाला घेरताना आपल्या बाजूला सर्व विरोधी पक्षांना वळवण्याचे कसब कॉंग्रेसला दाखवता आले नाही. अर्थात या विरोधकांपैकी काही पक्षाच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांना भाजपा सरकारने कॉंग्रेस पासून दूर राहण्याचा सल्ला दिला असणार. हा सल्ला न मानल्यास भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली जातील असे सरकारने त्यांचे नाक दाबले आहे. कॉंग्रेसनेही सत्तेवर असताना याच प्रकाराने काही विरोधी पक्षांना आपल्या कच्छपी लावले होते. आता त्यांना भाजपाने दाबात घेतले आहे. सोनिया गांधी यांनी संसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी त्या परिसरातल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर धरणे धरण्याची घोषणा केली होती. तिच्यात राहुल गांधीही सामील होणार होते पण ऐनवेळी हे आंदोलन रद्द करण्यात आले. भाजपाला घेरण्याबाबतच्या धोरणांत कॉंग्रेसला सातत्य दाखवता येत नाही. भाजपाने आता प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे.

Leave a Comment