संघ आणि मांसाहार

rss
लोकशाहीत सर्वांना आपली मते मांडण्याचा अधिकार असतो. त्यातले काही मतप्रदर्शन हे चुकीचे असेल तर काही वस्तुनिष्ठ असेल. पण चुकीचे समजले जाणारे मत मांडण्याचा त्या व्यक्तीला अधिकार असल्याचे मानले जाते. एखाद्या व्यक्तीबाबत किंवा संघटनेबाबत एखादी व्यक्ती काही तरी मत मांडते. ते चुकीचे असेल तर संबंधित लोक खुलासा करतात पण मुळातले मत आणि खुलासा या दोन्ही गोष्टी कोणी समोरासमोर ठेवून पडताळून पहात नसते आणि खुलाशातून सत्य वाटणारी बाजू प्रभावीपणे समोर येईलच असे नाही. आली तरी ती ऐकणारांना आणि वाचणारांना ती पटेलच असेही नाही. असा हा मतांचा गलबला सुरू असतो आणि त्या त्या संस्थेची किंवा व्यक्तीची जी बाजू प्रभावीपणे समोर येईल तिच्यावरच तिची प्रतिमा अवलंबून असते. तिलाच पब्लिक परसेप्शन असे म्हटले जाते.

कोणाची तरी काही माहिती सातत्याने समोर येत रहाते तिच्या आधारे संचित प्रतिमा तयार होते. ती सत्यच असते असे नाही पण ती असते हे मात्र खरे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना अशा प्रतिमा निर्मितीच्या खेळांना फार बळी पडते. पूर्वी तर संघाचे नेते प्रसिद्धीपासून दूर रहात असत पण त्यातून अनेक गैरसमज निर्माण होत असत. आताही संघाचे हे सारे ब्राह्मणच असतात असे सातत्याने सांगितले जाते आणि ते सारे शाकाहारीच असणार अशी प्रतिमा उगाच तयार होत रहाते. अर्थात अशा चर्चेचा खुलासा करण्याची काही सोय नसल्याने त्यातून निर्माण होणार्‍या गैरसमजाचे निराकरण करणेही घडत नाही.

या प्रकारामुळेच एखादा कोणी तरी संघाशी संबंधित असलेला लेखक काहीतरी लिहितो आणि लोकांना आश्‍चर्य वाटते. आता एका लेखकाने संघाचे कोणते सरसंघचालक मांसाहारी होते याची माहिती दिली आहे. अर्थात संघाचे नेते शाकाहारीच असणार अशी मनात प्रतिमा असलेल्या लोकांसाठी ही माहिती म्हणजे गौप्यस्फोट ठरतो. पण संघाच्या कोणत्याही नेत्याने आपण शाकाहारीच आहोत असा काही दावा केलेला नसल्याने या माहितीत कसलाही गौप्यस्फोट होत नसतो पण समाजात प्रतिमा निर्माण होण्याच्या प्रक्रियेने तो गौप्यस्फोट वाटत रहातो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना चातुर्वण्य मानणारी आहे असा एक समज निर्माण झाला आहे आणि ज्यांनी संघाला संपवण्याचे कंकण हाती बांधले आहे असे लोक हा समज अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करीत राहतात. संघ किंवा संघ परिवाराच्या कोणत्याही संघटनेशी ज्याचा संबंध येतो तो चातुर्वण्यवादी असतोच असे ठोकून दिले जाते पण संघात कोठेही चातुर्वण्याचे समर्थन केले जात नाही. प्रतिमा मात्र तशी तयार केली जाते.

Leave a Comment