लोकांच्या हितासाठी ?

ramesh-kadam
सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रमेश कदम सध्या फरारी आहेत. त्यांना पंधरा दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यावर हल्ला करण्याच्या प्रकरणात त्यांच्या ६५ सहकार्‍यांसह अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना जामिनावर सोडण्यात आले आणि दर रविवारी पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याची अट घालण्यात आली. त्यानुसार त्यांनी रविवारी पोलीस ठाण्याला तोंड दाखवायला हवे होते पण ते आलेच नाहीत. याचा अर्थ ते फरारी आहेत. हजेरी चुकवल्यामुळे त्यांना आता अटक होऊ शकतेच पण त्यांनी म. फुले महामंडळाचा अध्यक्ष असताना केलल्या भ्रष्टाचाराबद्दलही त्यांना अटक होणे अपेक्षित आहे. एकंदरीत ते कायद्याचे उल्लंघन करून न्यायालयाची नाराजी ओढवून घेत आहेत आणि वरचेवर अडचणीत येत आहेत. फरारी होण्यापूर्वी त्यांनी चक्क पत्रकार परिषद घेतली आणि आपल्यावर बेकायदा कारवाई केली जात असल्याचा आरोप केला.

त्यांच्यावरची कारवाई ही बेकायदा असेल तर त्यांनी अशी पळापळ करण्याची काहीच गरज नाही. पण अशा प्रकारे सहानुभूती मिळवून आपल्यावरच्या कारवाईला सौम्य करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ते आमदार आहेत पण त्यांचे युक्तिवाद शेंबडा पोरगाही फेटाळून लावू शकतो एवढे तकलादू आणि पोरकटपणाचे आहेत. मोहोळच्या उड्डाण पुलाखाली काही लोकांनी अतिक्रमणे करू नयेत म्हणून शासनाने बॅरिकेडस उभारले होते. पण या आमदाराने ते आपल्या हाताने काढले. या मागे लहान व्यापार्‍यांचे कल्याण व्हावे असा आपला हेतू होता असे त्यांचे म्हणणे आहे. पण लोकांचे असे कल्याण करण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला आहे हे काही ते सांगत नाहीत. ते उद्या चालून सरकारी कोषागारातले पैसे लुटून गरीब जनतेला वाटतील आणि त्यावर कारवाई झाल्यास तिला बेकायदा म्हणतील कारण आपण लोकांच्या हितासाठी पैसे लुटले आहेत.

महामंडळाचा अध्यक्ष असताना त्यांनी असेच जनतेच्या हितासाठी कायदा बाह्य रितीने कर्जे वाटली. तीही आपण जनतेच्या कल्याणासाठी वाटली असल्याचा त्यांचा दावा आहेच पण आपण हे जनतेचे हित राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी दिलेल्या चिठ्ठ्यावरून केले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आता त्यांनी या जनहितकारा आमदारांची नावे जाहीर करावीत आणि त्यांच्या चिठ्ठ्या जपून ठेवल्या असतील तर त्याही जगासमोर आणाव्यात म्हणजे त्यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जनहिताचे काम कसे कसे केले आहे हेही जगाला समजेल.

Leave a Comment