सोन्याचे अर्थकारण

gold1
सोन्याची झळाळी कमी झाली आहे. म्हणजे ती कधी काळी होती. सोन्याचे भाव कोसळतात पण ते त्या आधी टिपेला पोचलेले असतात. भारतात सोन्याच्या भावात नेहमीच एक विचित्र स्थिती दिसते. ती म्हणजे सोने स्वस्त होओ की महाग होओ या दोन्ही स्थितीत सोन्याची खरेदी होतच असते. सोने कडाडले की आता कोण ते खरेदी करणार असा प्रश्‍न विचारला जातो पण कडाडल्यावर तर जास्तच खरेदी होते. सोने महागले तरी आणि स्वस्त झाले तरीही भारतात सोन्याच्या बाजाराचा निर्देेशांक नेहमीच वधारलेला असतो. कारण सोने स्वस्त झाले की भारतीय लोक ते खरेदी करीत सुटतात. कारण त्यामागे त्यांचे एक गणित असते. सोने कधीना कधी महागणार आहे. तेव्हा ते स्वस्त आहे तोपर्यंत खरेदी करून ठेवावे आणि मग महागले की ते विकून त्यातून नफा कमवावा असा त्यांचा विचार असतो. म्हणून स्वस्तातल्या सोन्याची खरेदी करायला भारतीय बाजारात ग्राहकांची झुंबड असते. उलट महाग झाले की त्याची तशीच काहीशी प्रतिक्रिया असते. ज्या अर्थी सोने महाग झाले आहे त्या अर्थी सोने महाग होऊ शकते असे सिद्ध होते. मग ते असेच महाग होत जाणार असेल तर आता आपल्याकडे आहेत ते पैसे सोन्यात गुंतवावेत आणि पुढे मागे ते आणखी महाग होईल तेव्हा ते विकावे असा हिशेब करून महागातले सोने खरेदी करण्यासाठीही त्यांची गर्दीच होत असते.

एवढ्या सार्‍या गर्दीत सोनेे ही अनुत्पादक गुंतवणूक आहे आणि आपल्या देशातली संपत्ती प्रामुख्याने त्यात गुंतली असल्याने आपल्या देशाच्या विकासाला खिळ बसली आहे हा आर्थिक विचार कोणीच करीत नाही. सोने हे आपल्या श्रीमंतीचे लक्षण आहे पण तेच आपल्या गरिबीचे कारणही आहे हे सत्य आहे. तेव्हा आता सोने स्वस्त झाले असल्याने भारतात त्याच्या खरेदीला गती येणार आहे आणि ती गती आल्याने सोने आपोआपच महागही होणार आहे. काल सोन्याच्या भावाने गेल्या पाच वर्षातला नीचांक गाठला. हा भाव आता २५ हजाराच्या खाली आला आहे. भारतात सोने हा लोकांसाठी मोठाच गुंतवणूक पर्याय असतो. जमीन, शेअर्स, ठेवी आणि सोने हे गुंतवणूक पर्याय साधारणत: लोक वापरतात. सोन्याची खरेदी लग्नसराईत वाढते. लोक या निमित्ताने आपली मोठी पुंजी बाजारात सोन्याच्या खरेदीसाठी उतरवतात. त्यावेळी बाजारात सोने काहींसे भाव खायला लागते. पण एरवीही असे काही स्थानिक कारण नसतानाही सोने भाव तरी खाते किंवा त्याची झळाळी तरी संपते. तेव्हा त्याची कारणे बाहेर शोधावी लागतात.

भारत हा जगातला सोन्याचा सर्वात मोठा ग्राहक मानला जातो. कारण भारतात व्यक्तिगत सोने जगात सर्वात जास्त आहे. अन्य कोणत्याच देशात सोन्याचा असा दागिन्यांसाठी एवढा मोठा वापर केला जात नाही. काही देशांत सोन्याच्या ऐवजी हिरे वापरलेही जातात आणि काही श्रीमंत लोक हिरे खरेदी करून त्यात आपली संपत्ती गुंतवून ठेवतात. भारताची अशी ख्याती असली तरी भारतातल्या लोकांएवढे भारत सरकार काही श्रीमंत नाही. सोन्याच्या सरकारी साठ्याच्या बाबतीत भारताचा काही जगात पहिला क्रमांक नाही. चीनचे सरकार सोन्याचा मोठा साठा बाळगून आहे. अमेरिकाही या बाबतीत अर्थातच आघाडीवर आहे. त्यामुळे या दोन देशांच्या रिझर्व्ह बँका सोन्याची खरेदी किंवा विक्री करायला लागतात तेव्हा सोन्याच्या बाजारात चढ किंवा उतार व्हायला लागतात. चीनने गेली तीन वर्षे मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करण्याचा सपाटा लावला होता. म्हणजे सोन्याच्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी वाढली होती. वाढलेल्या मागणीने सोने महागले होते. पण काल चीनने आपल्या जवळचे सोने विकायला सुरूवात केली. चीनच्या सरकारचे सोने अधुन मधुन विक्रीला येते. पण काल नेहमीपेक्षा साधारणत: ३० पट जादा सोने त्याने विक्रीस काढले. बाजारात एवढे प्रचंड सोने विक्रीला आल्यावर साहजिकच जागतिक बाजारातले सोन्याचे दर कोसळले.

चीनचा सोन्याचा साठा वाढलेला होता तो त्याला कमी करायचा होता. गेल्या आठवड्यापर्यंत तो त्याच्या परकीय चलनाच्या गंगाजळीच्या १.८६ पट होता तो आता सोने विक्रीला काढल्याने १.६५ पट राहिला आहे. म्हणजे चीनने ही विक्री आपल्या परकीय चलनाच्या साठयाचे सोन्याशी असलेले प्रमाण जतन करण्यासाठी केली आहे. असे जर आहे तर चीनने गेले काही महिने एवढे सोने खरेदी तरी कशाला केले होते याचा काही बोध होत नाही. त्याचा बोध होत नसला तरीही चीनच्या या खरेदीचा परिणाम होऊन सोने महागले आणि आता अशीच विक्री केल्यामुळे हे भाव कोसळलेही आहेत. चीनच्या या विक्रीला डॉलरच्या तेजीची जोड मिळाली. जगातला एक मोठा गुंतवणूक पर्याय असलेल्या डॉलरची किंमत वधारली. डॉलरची किंमत वाढली की जगातल्या अनेक देशातले ग्राहक डॉलरमध्ये गुंतवणूक करायला लागतात. डॉलरची मागणी वाढते आणि त्या प्रमाणात सोन्याची मागणी कमी होऊन त्याची किंमत कमी होते. सार्‍या जगातच सोने, डॉलर, जमीन, शेअर्स या गुंतवणूक पर्यायांत अशी चढउतार होत असते आणि त्या त्या पर्यायातली चढउतार अन्य पर्यायांवर परिणाम करीत असते. भारतात मात्र सोन्याचा व्यवहार काहींसा चक्रावून टाकणारा असतो. त्यातूनच आता सोन्याची मागणी आणि किंमत वाढायला लागणार आहे.

Leave a Comment