
मालवणी येथील विषारी दारूच्या बळींची संख्या शंभरापार गेली आहे. अशी दुर्घटना घडली की, दारूबंदी आणि देशी दारू यावर अनेक अंगांनी चर्चा होत राहते. काही लोक दारूबंदीची कुचेष्टा करीत असतात. कारण त्यांच्या मते दारूला पूर्ण बंदी करणे हे अव्यवहार्य आहे. शिवाय जगातच सर्वांची राहणी आणि जगण्याची शैली बदलत आहे. अशा स्थितीत सगळीकडे दारू हे व्यसन नव्हे अशी भावना बळावत आहे आणि आपणच केवळ दारूच्या बंदीचा आग्रह धरला तर ते विसंगत ठरेल. अशी दारूबंदी नीट अंमलातही येत नाही. कायद्याने आणि कागदावर बंदी राहते पण व्यवहारात कोठून ना कोठून दारू मिळत राहते. अशी दारूबंदी हा हास्यास्पद प्रकार ठरतो. दारूबंदीच्या विरोधकांचे असे मत आहे.
विषारी दारूचे बळी
दारूवर कायद्याने बंदी घातली तरी ती बेकायदा रित्या का होईना पण तयार होत राहते आणि लोकही चोरून ती पितात. मग लोक जर तिला सोडायलाच तयार नाहीत तर तिच्यावर सक्तीने बंदी घालण्यापेक्षा तिला खुली केलेली काय वाईट ? हे मत काही निर्विवाद नाही. काही लोकांना नक्कीच असे वाटते की, दारूबंदी लागू झाली म्हणजे ती शंभर टक्के यशस्वी होणार नाही हे खरे पण बंदी असल्यावर निदान काही लोक तरी तिच्यापासून दूर राहतील. आज दारूबंदी नसल्यामुळे सारे काही खुले आहे आणि ती सहज उपलब्ध होत असल्याने अनेक लोक सहजतेने तिच्या आहारी जातात. बंदी नसल्याने तिला उलट प्रतिष्ठा मिळाली आहे.
दारू बंदी लादली तर बेकायदा दारू तयार होते असे काही लोकांचे म्हणणे असते पण दारूबंदी नसली तरीही बेकायदा दारू तयार होतेच असे मालवणीसारख्या प्रकारांनी दाखवून दिले आहे. देशी दारू उघडपणे मिळत असतानाही बेकायदा दारू अशी का तयार व्हावी असा प्रश्न आहे. देशी दारू उघडपणे दुकानात मिळत असतानाही काही लोक तिच्याऐवजी अशी बेकायदा दारू पीत असतात कारण काही गरीब लोकांना दुकानातली स्वस्त दारूही परवडत नाही. म्हणून मग काही लोक त्यांचे समर्थनही करीत असतात. कष्ट करून थकलेले हे गरीब लोक नाइलाज म्हणून ही बेकायदा दारू पीतात आणि त्यांना काही पर्याय नसतो असे त्यांचे समर्थन असते. पण असे समर्थन योग्य नाही. दारू प्राशन करण्यात काही चूक आहे हे या लोकांना कोणी सांगायलाच तयार नाही. तसे सांगण्यात काही तरी चूक आहे असेच समजले जायला लागले आहे. संस्काराचा लोप झाला आहे. दारू पीणे गरजेचे मानले जात आहे.
