दुष्काळ संपेल

cm
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आपला जलयुक्त शिवार हा कार्यक्रम स्वत: रस घेऊन पूर्ण करायला सुरूवात केली आहे. या कार्यक्रमाचे यश नेमके मोजायला लागलो तर आपल्याला तसे तीन चार महिने थांबावे लागेलच पण त्याचे दीर्घकालीन परिणामही येत्या वर्षाभरात जाणवणार आहेत. तेव्हा त्यासाठीही काही काळ थांबावे लागणार आहे. पण आताच जे काही अहवाल हाती येत आहेत ते चांगले संकेत देणारे आहेत. आपल्याकडे शेतातल्या विहिरी लवकर भरत नाहीत. जमिनीच्या खोलीवरून साधारणत: ऑगष्टमध्ये विहिरींचे पाणी चढायला लागते. पण ज्या भागात जलयुक्त शिवार योजना राबवली जात आहे त्या भागात चालू महिन्याच्या पूर्वार्धात पडलेल्या पावसानेच काही चांगले संकेत द्यायला सुरूवात केली असून काही ठिकाणी विहिरीच्या पुनर्भरणाचा परिणाम जाणवायला लागला आहे. सध्याच्या अनेक अर्थांनी खळबळजनक ठरत असलेल्या या काळात हा संकेत आणि त्यातून दिसून येणारी दुष्काळाच्या कायमच्या संपण्याची शक्यता निदान त्या विशिष्ट भागासाठी तरी उमेद वाढवणारी आहे.

सरकारला तसा काही धोका नाही पण सरकार म्हणावे तेवढे स्वस्थही नाही पण तरीही मुख्यमंत्र्यांनी अनेक प्रशासकीय सुधारणा करण्याचा सपाटा लावला आहे. काही लोकांना या सार्‍या सकारात्मक गोष्टी पचत नाहीत पण तो त्यांच्या पचनशक्तीचा दोष आहे. मुख्यमंत्र्यांनी मात्र महाराष्ट्राच्या अनेक प्रश्‍नांना दूरगामी परिणाम जाणवतील अशी उत्तरे शोधायला सक्रियतेने सुरूवात केली आहे. त्यातली जलयुक्त शिवार ही योजना नक्कीच वाखाणण्या जोगी आहे. महाराष्ट्रातल्या दुष्काळावर कायमची मात करण्याचा प्रयत्न यातून नक्कीच यशस्वी होईल असे दिसते. ही योजना सध्या तरी राज्याच्या साडेतीन हजार गावात राबवली जात आहे. आजवर दुष्काळ पडला की सरकार हातपाय हलवत असे. मग त्या दुष्काळावर कायमची आणि दूरगामी योजना आखणे तर दूरच. दुष्काळ पडला तरी लवकर त्याची दखल घ्यायची नाही. मग विरोधी पक्षांनी मोर्चे काढून दुष्काळावर थातुरमातुर उपाय केले जायचे. जनावरांच्या छावण्या, चारा डेपो, दुष्काळी कामे, कजार्र्ंना स्थगिती, टँकरने पाणी पुरवठा आणि शेतकर्‍यांना थोडीशी मदत अशी मलमपट्टी केली जायची. या सगळ्या मलमपट्टीत प्रचंड भष्टाचार होतो आणि या भ्रष्टाचारात सगळ्यांचेच हात ओले होत असत. अशा रितीने या लोकांचे आर्थिक हितसंबंधच दुष्काळी कामांत निर्माण झाले. त्यातून चारा छावणीत पैसा खाणार्‍यांची एक लॉबी तयार झाली तर दुसरी लॉबी केवळ शेणात वळवळ करायला लागली.

दुष्काळ म्हणजे प्रचंड पैसा खाण्याची संधी. म्हणूनच लोक म्हणायला लागले, दुष्काळ आवडे सर्वांना. सर्वांनाच ही मलमपट्टी प्रिय झाली. दुष्काळावर काही तरी मूलगामी उपाय योजिला पाहिजे व तो असा असला पाहिजे की नंतर कधीही दुष्काळ पडता कामा नये. काही कारणांनी पाऊस कमी पडला तरीही अवर्षण पडता कामा नये. यावर कोणी बोलायलाच तयार नाही. त्यामुळे दुष्काळ कायमचा हटवता येणे शक्य नाही असाच सर्वांचा समज झाला होता. मुख्यमंत्री ेदेवेन्द्र फडणवीस यांनी मात्र या समस्येवर कायमचा तोडगा काढता येतो यावर चिंतन केले होते. जगातल्या अनेक देशांनी दुष्काळ कायमचा हटवलेला आहे. त्यांचा आदर्श समोर ठेवून मुख्यमंत्र्यांनी आपल्या मनाशी जलयुक्त शिवार ही योजना निश्‍चित केलेली होती. मुख्यमंत्री होण्याच्या आतच त्यांनी मनाशी काही नक्की केले असल्यामुळे ते मुख्यमंत्री होताच लगेच त्यांनी ही योजना जाहीरही केली आणि ती ताबडतोब अंमलातही आणायला सुरूवात केली. त्यांनी तसे केले नसते तर त्यांच्या योजना आखण्यात एक वर्ष निघून गेले असते आणि योजनेची अंमलबजावणी एक वर्ष पुढे गेली असती. पण तसे झाले नाही आणि यंदाच्याच पावसाळ्यात जलयुक्त शिवारास प्रारंभ झाला.

आपल्या देशात शेताला पाणी देण्याचा उपद्व्याप पार उलटा केला जातो. शेतातले पाणी ओढ्याला मिळते, ओढ्यातून तेच पाणी नदीत जाते आणि नदीवर धरण बांधून तेच पाणी कालवे खोदून शेतात आणले जाते. मुळात धरणाचे शेताला मिळणारे पाणी शेतातलेच असते. आणि ते एवढे वळसे घालून बराच खर्च करून शेतात आणले जाते. त्यापेक्षा ते पाणी शेतातच नीट अडवले तर कितीतरी खर्च वाचेल आणि शेतातले पाणी मूलस्थानी जलसंधारणाच्या तत्त्वानुसार शेतात अडवून, जिरवून शेतातच वापरले जाईल. पाण्याच्या अशा व्यवस्थापनाने आपल्या शेतावरचे अवर्षणाचे संकट टळायला मदत होणार आहे असा विश्‍वास वाटायला लागला आहे. पहिल्याच नक्षत्रात हा अनुभव आल्याने केवळ शेतकरीच नाहीतर सर्वांच्याच मनात या योजनेविषयी आणि तिच्या परिणामाविषयी विश्‍वास जागा झाला आहे. ही योजना काही फार गुंतागुंतीची नाही, फार खर्चिकही नाही. आपल्या शिवारातले पाणी आपण स्वत:च आपल्या शेतात अडवून जिरवण्याची ही योजना आहे. ती राबवण्यासाठी फार सरकारी मदतीची याचना आणि प्रतीक्षा करण्याची गरज नाही. स्वत: शेतकरी तिचा अंमल करू शकतात. या योजनेने जनतेचा विश्‍वास जागा केला आहे आणि दुष्काळाच्या कायमच्या निवाराणाचा सकारात्मक विचार जागा झाला आहे.

Leave a Comment