योगाचे दिव्य दर्शन

yoga
योग दिवसाचा कार्यक्रम भारतात मोठ्या प्रमाणावर झालाच पण तो जगातल्या १७७ देशात झाला, योगाची जगाला किती गरज आहे हे आता सर्वांना समजायला काही हरकत नाही. योग दिनाचा कार्यक्रम असा काही मोठ्या प्रमाणावर साजरा होईल असा विचारही कोणी फार पूर्वीच काय पण गेल्या वर्षीही केला नसेल, मोदी यांचे सरकार काही करू शकणार नाही अशी अपेक्षा करणारांना हा योग दिनाचा झपाटा पचनी पडणारा नाही. त्यामुुळे त्यांनी काही शंका उपस्थित करून आपल्या मनाचे समाधान करून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अशा रितीने योगासने शिकवणे योग्य आहे का अशी काहींची शंका आहे पण तिच्यात काही अर्थ नाही. कारण योग ही काही गूढ विद्या नाही. तो सार्वजनिक रित्याच शिकवला जात असतो. आपण नेहमी असे म्हणतो की, योग ही भारतीय कला असली तरी आज तिचा महिमा भारतापेक्षा यूरोप आणि अमेरिकेतल्याच लोकांना अधिक जाणवायला लागला आहे. आज अमेरिकेत आठ कोटी लोक नित्य योगाभ्यास करीत असतात. भारतात असे आठ लाख तरी लोक सापडतील का ?

भारतातल्याही अनेकांना योगाभ्यास करण्याची इच्छा असते पण तो असतो कसा हेच माहीत नसते. अशा लोकांना काला योगाभ्यास म्हणजे काय याची प्राथमिक तरी कल्पना आली आहे. केवळ भारतीयच नाही तर जगातल्याही अनेकांना ही काल समजले आहे. योगाचे महत्त्व करोडो लोकांपर्यंत पोचवायचे असेल तर ते अशा सामूहिक कार्यक्रमातूनच समजावून सांगितले पाहिजे. गेल्या ५० वर्षात अशाच मार्गाने हे यशस्वीपणे सांगितले गेले आहे. तसा अनुभव आपल्या गाठीला आहे. मग काही विद्वान लोकांना हे योग्य वाटत नाही हा आपला किंवा योगाचा दोष नसून त्यांच्या मनोवृत्तीचा दोष आहे. या लोकांना या सार्‍या प्रयासाचा आवाकाच कळेनासा झाला आहे. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचा कोणताही कार्यक्रम असा काही भव्य प्रमाणावर होत असतो की, त्यांच्या विरोधकांचे धाबे दणाणून जातात आणि त्यांना कसला विरोध म्हणून करता येत नाही. त्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन असे काही दणकेबाज केले होते की त्यांना विरोध करणारांनी तशी काही कल्पनाही केली नसेल. शिवाय सारे आयोेजन अशा काही शिस्तीत केले की विरोधकांची वाचाच बंद व्हावी. राजपथावर केलेल्या योग दिनाच्या प्रात्यक्षिकात मोदी स्वत: सहभागी झाले आणि त्यांनी योगासने केली.

रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी दोन दिवसांपूर्वी मोदींना स्वत:ला आसने करता येतात का असा सवाल केला होता आणि काही माध्यमांनी जणू त्यातून फार मोठा वाद निर्माण होणार आहे असे वातावरण तयार केले होते पण मोदी स्वत: या प्रात्यक्षिकांत सहभागी झाले आणि त्यांनी आपल्याला आसने येतात हे पुतीन यांना दाखवून दिले. मोदी आसने करताना सरईतपणे करीत होते. राजचा सराव असल्याशिवाय एवढ्या सराईतपणाने आसने करता येत नाहीत. त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक पैलू केवळ देशालाच नाही तर सार्‍या जगाला दिसला. भारतात तर करोडो लोक सामूहिक योगाभ्यासात सहभागी झालेच पण जगातल्या १७७ देशात हा योग दिन हजारोंच्या सहभागाने साजरा झाला. योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे तर औद्योगिकरणाने तणाव ही देणगी दिलेली आहे. जगाला तणावावर योग हा उपाय असल्याचा साक्षात्कार झाला आहे. अशा रितीने जगातल्या म्हणजेच मानवतेच्या सर्वात मोठ्या समस्येवर भारतातली हे देणगी उपाय ठरू शकत असेल तर तिचा असा महोत्सव साजरा करून जगाला या देणगीचे महत्त्व जाणवून देण्यात काहीही चूक नाही. ही गोष्ट मोदी यांच्या लक्षात आली.

त्यावर अनेकांनी तिरकस टोमणे मारण्याचा प्रयत्न केला. पण मोदी शांत राहिले. मोदी मोठा हुशार माणूस आहे आणि त्याला कोणत्या वेळी काय करायचे हे चांगलेच समजते अशीही टिप्पणी कोणी केली. याचा अर्थ योग दिन ही मोदींची राजकीय खेळी आहे असा होतो पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, आजवरच्या कोणत्याही पंतप्रधानांना ही कथित राजकीय खेळी खेळता आलेली नाही. ती मोदींनाच सुचते कारण त्यांच्या मनात योग आहे. आपण जगाला काय देऊ शकतो याचा त्यांच्या मनात नेहमीच विचार असतो. आजवरचे पंतप्रधान आपल्याच देशाला आणि आपल्या संस्कृतीला जगाच्या तुलनेत कमी समजत आले आहेत. आपल्या देशात एकंदरीतच आपल्या परंपरा आणि संस्कृती यांच्या संबंधाने न्यूनगंडाची भावना आहे. खरे तर ती असण्याचे काही कारण नाही. कारण १८९३ साली स्वामी विवेकानंदांनी ही भावना धुडकावून देऊन अमेरिकेच्या लोकांना हे बजावले होते की, अमेरिकेचा शोध कोलंबसाने लावला असला तरीही या अमेरिकेला धर्म शिकवण्याचे काम आम्ही करणार आहोत. आपल्यात ती क्षमता आहे हे आपण वारंवार दाखवूनही देत आलो आहोत. पण न्यूनगंडाची बेडी तोडून आपल्या उज्ज्वल परंपरांचा आविष्कार जगभरात घडवण्याचे काम नरेन्द्र मोदी यांनी केले आहे,

Leave a Comment