आणीबाणी आणि अडवाणी

advani
आणीबाणीला ४० वर्षे पूर्ण होत आहेत. येत्या २६ जूनला हा वर्धापनदिन साजरा होईल. या निमित्ताने एका इंग्रजी दैनिकाने माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची मुलाखत छापली आहे. भारतात एकदा आणीबाणी येऊन गेली आणि तिच्यामागे इंदिरा गांधी यांची अमर्याद सत्तापीपासा लपलेली होती. त्या आणीबाणीच्या पर्वात लालकृष्ण अडवाणी हे जनसंघाचे ज्येष्ठ नेते होते. तेव्हाचा सारा घटनाक्रम जाणतेपणाने पाहिलेल्या नेत्यांत ते आहेत. कारण इंदिरा गांधी यांचा उदय, त्यांची कारकीर्द, त्यांचे लोकप्रियतेच्या शिखरावर चढणे आणि शेवटी आणीबाणी लादणे या सार्‍या प्रक्रियेचे ते साक्षीदार आहेत. त्यातले बहुसंख्य नेते आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्यामुळे या पर्वाविषयी अडवाणी काय बोलतात याला महत्त्व येेणे साहजिक आहे. अर्थात ते महत्त्व आहे म्हणून अडवाणी जे बोलले त्यात तथ्य आहे असे काही म्हणता येत नाही.

देशात पुन्हा आणीबाणी लागू होणारच नाही याची शाश्‍वती देता येत नाही कारण तसे होऊ नये अशी तरतूद अजूनही आपण घटनेत केलेली नाही असे अडवाणी यांचे म्हणणे आहे. एका बाजूला ही कमतरता आणि दुसर्‍या बाजूला नेतृत्वात तशी मनोवृत्तीही दिसत आहे म्हणून दुसर्‍या आणीबाणीची शक्यता नाकारता येत नाही असे त्यांनी सूचित केले आहे. अडवाणी आपल्या या मुलाखतीत सारे काही सूचकच बोलले आहेत. त्यांनी भारतीय घटनेतल्या त्या कमतरतेचा नेमकेपणाने कलम सांगून उल्लेखही केलेला नाही आणि नेतृत्वातली तशी प्रवृत्ती म्हणून त्यांनी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या नावाचाही स्पष्ट उल्लेख केलेला नाही. तसा तो करायला काही हरकत नव्हती. त्यांना तसे नेतृत्व म्हणून मोदींकडेच बोट दाखवायचे असते तर त्याला काही आडकाठी नव्हती. अजून काही देशात दुसरी आणीबाणी लागू झालेली नाही.

अडवाणी यांनी मोदींच्या विरोधात अप्रत्यक्ष असे काही वक्तव्य केले की, आधीच मोदी द्वेषाचे पलिते हाती घेऊन नाचणार्‍या भूतांना चेव येतो. म्हणूनच अडवाणी यांनी मोदींचे नाव घेतले नसले तरी अशा काही राजकीय विश्‍लेषकांनी अडवाणी यांनी मोदींनाच हा इशारा दिला आहे असा निष्कर्ष काढला आहे. पण गेल्या काही वर्षातली अडवाणी यांची मन:स्थिती विचारात घेतली तर आपल्याला अडवाणी यांनी असे प्रलाप का काढले आहेत याचा बोध होतो. वाजपेयी पंतप्रधान असतानाच्या काळातही ते अशीच काही सूचक विधाने करून पक्षात आपला एक वेगळा गट असल्याचे दाखवून देत असत. त्यांची पंतप्रधान होण्याची मनिषा अर्धवट राहिली असल्याने ते नाराज आहेत. ही नाराजी अशी प्रकट होत असते.

Leave a Comment