न जन्मलेल्या कळ्यांना न्याय

aboration
भारतात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या मुलींच्या गर्भपाताच्या घटनांची व्याप्ती फार वाढली होती. अजूनही ती कमी झालीय असे नाही पण दोन तीन वर्षांपूर्वी यावर फारच गदारोळ माजला होता. कारण या प्रवृत्तीमुळे लोकसंख्येतला मुलांच्या आणि मुलींच्या प्रमाणाचा समतोल केवळ जाणवतच होता असे नाही तर तो समाजात अनेक नवे नवे प्रश्‍न निर्माण करायला लागला होता. हे प्रमाण राखले गेले नाही तर हे प्रश्‍न अधिकच गंभीर होणार हे दिसायला लागले होते. सोनोग्राफी करून गर्भाचे लिंगनिदान करणे आणि ती मुलगी असेल तर गर्भपात करणे हे प्रकार सर्रास सुरू असल्याने सरकारने यावर काही तरी कडक उपाय योजावेत असा दबावही येत होता. कारण ही प्रवृत्ती एवढा नंगानाच घालत असतानाही कोणाला शिक्षा होत नव्हती. भारतात गेल्या दहा वीस वर्षात तीन कोटी मुली गर्भातच जिरवून टाकण्यात आल्या होत्या. हा कायद्याने गुन्हा आहे. दहा वर्षात तीन कोटी गुन्हे घडले होते पण तीन कोटी आरोपी काही पकडले गेले नव्हते. तीन कोटी काय पण तीनही आरोपी सापडले नव्हते.

सरकार काही करू शकत नाही. डॉक्टरांनी तर लाजच सोडलेली. समाजात तर कसलीच जागृती नाही. अशा स्थितीत कोणी तरी अशा नराधम डॉक्टरांवर लक्ष ठेवून त्यांना पकडून देणे आणि त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून संबंधितांना शिक्षा होईल असे पाहणे याशिवाय काही मार्ग दिसत नव्हता. सातार्‍याच्या सामाजिक कार्यकर्त्या ऍड. वर्षा देशपांडे यांनी या संबंधात बरेच काम केले आहे. त्यांनी अनेक डॉक्टरांवर स्वत: धाडी टाकल्या आहेत आणि त्यांना पकडून दिले आहे. शेवटी ते काही त्यांचे काम नाही. त्या एखादे प्रकरण हाताळू शकतात. सर्वांवर लक्ष ठेवणे हे तर पोलिसांचे आणि आरोग्य खात्याचे काम. मात्र वर्षा देशपांडे यांनी बीड जिल्ह्यातल्या अशा प्रकरणात लक्ष घातले. कारण बीड जिल्हा याबाबत फार बदनाम झाला होता. या जिल्ह्यातले हजारो शेतमजूर वर्षातले सात ते आठ महिने ऊस तोड कामगार म्हणून राज्याच्या ऊस उत्पादक पट्टयात जातात. त्यांच्या या भटक्या जीवनाने त्यांच्या जीवनात निर्माण झालेल्या विविध समस्यांनी असे गर्भपात ही त्यांच्यासाठी अपरिहार्यता ठरली होती. त्यामुळे राज्यातला तो सर्वाधिक स्त्रीभ्रुण हत्या होणारा जिल्हा झाला होता. अशी स्थिती असल्यावर पैसा कसेही करून पैसाच कमावण्यास चटावलेल्या डॉक्टरांना हा जिल्हा म्हणजे कुरण वाटला नसेल तरच नवल. म्हणूनच या जिल्ह्यात अशा डॉक्टरांचे मोठेच पीक आले होते.

बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ येथे सुदाम आणि सरस्वती मुुंडे हे डॉक्टर दांपत्य खाटकालाही लाजवेल अशा निर्दयीपणाने गर्भपात करतात असे सर्वांनाच माहीत झाले होते. आपल्या देशात असे अनेक गुन्हे सर्रास घडतात आणि लोक ते पहात असतात. लोकांनी अशी प्रेक्षकाची भूमिका घेऊ नये. मला काय त्याचे ही भूमिका सोडून द्यावी असे कितीही म्हटले तरी आपल्या देशातले लोक काही अशा गोष्टींच्या विरोधात आवाज उठवत नाहीत. लोकांचे एकवेळ मान्य पण पोलिसांनीही अशीच भूमिका घेतली होती ही बाब फार चिंताजनक होती. शिवाय असे गर्भपात रोखणे हे ज्यांचे कर्तव्य आहे ते सरकारी कर्मचारी तर त्याहून अधिक उदासीन होते. मग काय सुदाम आणि सरस्वती या दोघांना एवढा चेव आला की त्यांनी कोणाचीच भीड भाड ठेवायची नाही असे ठरवले. उघडउघडपणाने काम सुरू ठेवले. त्यातून मोठा पैसा कमावला आणि पैशातून शेत घेऊन तिथे पाडलेले गर्भ टाकायला सुरूवात केली. कोवळ गर्भ खायला त्यांनी खास कुत्र्यांची पलटण पाळली.

माणूस पैशाच्या मागे लागला की, त्याला आपण नेमके काय करीत आहोत याचे भान रहात नाही. मुंडे दांपत्याचे असेच झाले. एका महिलेला गर्भपात करताना तिचा मृत्यू ्रझाला. त्यातच वर्षा देशपांडे यांनी त्यांच्या भोवती फास आवळत आणला. त्यातून भरल्या गेलेल्या खटल्यात या दोघाही डॉक्टर पती पत्नीला चार वर्षे सक्त मजुरीची शिक्षा झाली आहे. अशा प्रकरणातली अजून एक शोकांतिका अशी की, या नराधमांना खालच्या न्यायालयात अशी शिक्षा सुनावली गेली असली तरीही त्यांना वरच्या वरच्या कोर्टात जाण्याचा मार्ग मोकळा असतो आणि त्यासाठी वकिलांची पलटण उभी करण्याइतपत पैसा ते बाळगून असतात. आता मुंडे दांपत्य याच मार्गाचा अवलंब करून काळकाढूपणा करतील यात काही शंका नाही. अर्थात त्यांच्या विरोधातले पुरावे एवढे ठोस आहेत की, त्यांना वर अपीले करूनही काही लाभ होणार नाही. या प्रकरणात त्यांना शिक्षा झाल्याचा कोणालाही आनंदच होईल पण एका गोष्टीची खंत वाटते की मुंडे यांना झालेली शिक्षा ही लाक्षणिक आहे. त्यांना शिक्षा झाली याचा अर्थ अशा व्यवहारात गुंतलेल्या सगळ्याच डॉक्टरांना किंवा किमान पक्षी बहुसंख्य डॉक्टरांना अशीच शिक्षा होईल असे नाही. याही लाक्षणिक प्रकरणात वर्षा देशपांडे यांनी पुढाकार घेतला म्हणून ही शिक्षा झाली पण प्रत्येक डॉक्टरांवर काही त्या लक्ष ठेवणार नाहीत. हे काम ज्यांचे आहे ती सरकारी कर्मचारी काय करीत आहेत? ते जागे होत नाहीत तोपर्यंत एखाद्या मुंडेला शिक्षा होणार आणि बहुसंख्य डॉक्टर मोकाटच राहणार.

Leave a Comment