काय खाताय विचार करा

food
मॅगीवर बंदी आली आणि आता कारवाई होणार आहे. मॅगीचे काय व्हायचे ते होऊ देत पण तिच्या निमित्ताने सरकार जागे झाले आहे आणि जनतेतही अन्न शुद्धतेविषयी जागृती निर्माण झाली आहे. रस्त्यावर विकले जाणारे खाद्य पदार्थ तपासले पाहिजेत असे आता सरकारी यंत्रणेला वाटायला लागले आहे. मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी मनपाच्या आरोग्य खात्याला तसे आदेश दिले आणि या खात्याने काही खाद्यपदार्थ तपासले असता तपासलेल्या नमुन्यातल्या ३० टक्के नमुन्यात इ कोला हा विषारी बॅक्टेरिया असल्याचे दिसून आले. तो फार घातक असतो आणि रस्त्यावर विकल्या जाणार्‍या खाद्यपदार्थात एवढा सर्रास आढळतो हे कळल्यावर सगळेच हादरले आहेत.

गंमतीचा भाग तर पुढेच आहे. हे बदमाष विक्रेते न्यायालयात गेले आणि न्यायालयाने त्यांच्यावर सुरू असलेल्या कारवाईला स्थगिती दिली. यामुळे त्यांचे मनोबल वाढणार आहे आणि त्यांच्यावर कारवाई करणारांचे मनोबल कमी होणार आहे. कधी नव्हे ती आरोग्य यंत्रणा कामाला लागली होती. तिने निर्भिडपणाने कारवाईही सुरू केली होती. पण रस्त्यावरच्या विक्रेत्यांना जरब बसलीच नाही. हे झाले रस्त्यावरच्या विक्रेत्यांचे. पण भाज्या आणि फळांचे नमुने कधी तपासले आहेत का? ते तपासल्यास तर सर्वांना धक्काच बसेल. आपल्या देशातल्या भाजी बाजारात येणार्‍या प्रत्येक भाजीत किंवा फळात काही ना काही तरी घातक द्रव्य सापडेलच इतके सर्रासपणे ते वापरले जात असते. भाज्यांचा रंग आकर्षक दिसावा म्हणून त्यांच्यावर काही रसायने मारली जातात तर फळे लवकर पिकून ताजी दिसावीत म्हणून त्यांच्यावर काही विषारी द्रव्याचे आवरण चढवले जाते.

एका पाहणीत असे आढळले आहे की, भारतातल्या कोणत्याही बाजारातले अन्न पदार्थांचे पाच नमुने गोळा करून तपासले की, त्यातला किमान एक नमुना तरी अन्न पदार्थांशी संबंधित कायद्यानुसार नापास होतो. हे झाले भाज्या आणि फळांचे. काही फळांचे रस किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ डब्यात बंद करून विकले जातात. हे पदार्थ टिकावेत म्हणून वापरली जाणारी रसायने फार घातक असतात. त्यांची कसून तपासणी कोणी करीत नाही. पण तशी केली तर या कामासाठी वापरल्या जावयाच्या रसायनांच्या संबंधातले नियम धुडकावून वाटेल ती द्रव्ये वापरलेली आढळतात. त्यातली काही द्रव्ये तर कर्करोगास कारणीभूत ठरणारी असतात. शिवाय हे अन्नपदार्थ पिकवताना वापरली जाणारी रासायनिक खते आणि जंतुनाशकेही अशीच घातक असल्याने हे अन्न पदार्थ धोकादायक आणि विषारी झालेले असतात.

Leave a Comment