विद्यार्थी ठरवणार मास्तर कोण

ftii
पुण्यातल्या फिल्म इन्स्टिट्यूटचे चेअरमन म्हणून गजेन्द्र चौहान यांची नियुक्ती होणार असल्याची बातमी बाहेर पडताच या संस्थेतल्या विद्यार्थ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. गजेन्द्र चौहान आणि त्यांच्यासोबत नेमण्यात आलेले दोन शिक्षक हे भाजपाचे समर्थक असल्यामुळे त्यांची नियुक्ती रद्द करावी अशी मागणी संपकरी विद्यार्थ्यांनी लावून धरली आहे. हे आंदोलन योग्य आहे की नाही आणि चौहान यांची अशी नेमणूक व्हावी की नाही यावर घनघोर चर्चा आणि वाद सुरू आहेत. या सार्‍या प्रकारामागे डाव्या चळवळीचा हात आहे ही गोष्ट आता लपून राहिलेली नाही. पुण्यातल्या या आंदोलनाला पाठींबा देण्यास जे पुढारी येऊन गेले त्यांची नावे ऐकल्यावर आणि या संपावर कसलीही टिप्पणी करण्यास नकार देणार्‍या नावांवर नजर टाकल्यास तर या संपाला डाव्या पक्षांचा पाठींबा आहे हे चटकन लक्षात येते. या प्रश्‍नावर पुण्यात आंदोलन चालणे हे एकवेळ समजून घेता येईल. तसे तर ते पुण्यात होणे हेही अनावश्यक आहे पण निदान आपण असे तर नक्कीच म्हणू शकतो की, पुण्यात आंदोलन होणे अस्थानी नाही पण, या प्रश्‍नावर उद्या दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात आंदोलन केले जाणार आहे.

हे विद्यापीठ डाव्या ( आणि वरचेवर कालबाह्य ठरून संपत आलेल्या ) विचारांच्या विद्यार्थी संघटनांचा अड्डा आहे हे सर्वांना माहीत आहे आणि या प्रश्‍नावर अन्य कोठेही आंदोलन न होता ते थेट या विद्यापीठात होत आहे याचा अर्थ या पुण्यातल्या आंदोलनाला साम्यवादी संघटनांची फूस आहे असा होतो. हे राजकारण बाजूला आपण मुळात या आंदोलनाच्या स्वरूपाचा विचार केला पाहिजे. कोणत्याही शाळेच्या वा महाविद्यालयाच्या प्राचार्यदावर कोणाची नेमणूक व्हावी यावर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आहे का आणि तसे आंदोलन करण्याचा त्यांना अधिकार असावा का? कोणीही या प्रश्‍नाचे उत्तर नकारार्थीच देईल पण डाव्याच्या मनातली मोदी सरकार विषयीची मळमळ कोणत्या थराला गेली आहे हे या प्रकारावरून दिसत आहे. मोदी सरकार भक्कम होत आहे आणि या सरकारने आपल्या देशातल्या अनेक पदांवर आपल्या समर्थकांची नेमणूक करायला सुरूवात केली आहे. आजवर अशाच प्रकारे डाव्या विचारवंतांची वर्णी लावली जात होती पण आता आपली ही सद्दी संपली आहे या जाणीवेने केवळ साम्यवादीच नाही तर सारे समाजवादी आणि कॉंग्रेस नेतेही अस्वस्थ झाले आहेत. समाजावर आजवर या परदेशी तत्त्वज्ञानावर पोसलेल्यांचा प्रभाव होता तो आता संपणार आहे आणि राष्ट्रवादी विचारांचा प्रभाव वाढणार आहे हे या सार्‍या डाव्यांचे दु:ख आहे. ते अशा निमित्ताने व्यक्त होत आहे.

Leave a Comment