मानवता स्वराज यांची

sushma-swaraj
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ललित मोदीला लंडनहून पोर्तुगालमध्ये जाण्याची अनुमती मिळावी यासाठी ब्रिटनच्या परराष्ट्र खात्याला पत्र दिले. ललित मोदी हे वॉंटेड आहेत आणि त्यांच्यावर वॉरंट निघालेले आहे. त्यांना पोर्तुगालमध्ये आपल्या कर्करोगग्रस्त पत्नीच्या शस्त्रक्रियेच्या वेळी हजर राहता यावे यासाठी तिकडे जावे लागणार होते. पण मनमोहनसिंग सरकारने तशी शिफारस करणे नाकारले होते. सुषमा स्वराज यांनी मात्र तशी शिफारस दिली. आजारी माणूस, त्यातच ती महिला आणि तिचा पती शस्त्रक्रियेच्या वेळी हजर राहिला पाहिजे हे सारे माणुसकीला धरून आहे. त्यामुळे आपण ही शिफारस केली. यात कसलाही स्वार्थ नाही. केवळ माणुसकी म्हणून हे केले गेले असे सुषमा स्वराज यांचेही म्हणणे आहे आणि भारतीय जनता पार्टीनेही तसाच युक्तिवाद करून सुषमा स्वराज यांची पाठराखण करून त्यांच्या राजीनाम्याची कॉंग्रेसकडून केली जाणारी मागणी फेटाळून लावली आहे.

या प्रश्‍नावर कॉंग्रेसच्या नेत्यांनी आवाज उठवला आहे आणि राजीनाम्याची मागणी केली आहे. पण अशा प्रश्‍नांवर नेहमीच कॉंग्रेसची पंचाईत होते कारण या पक्षाने देशावर ५० वर्षे राज्य केले आहे आणि असे आरोप कॉंग्रेसवर करता यावेत असे अनेक प्रसंग सांगता येतात. मुंबईवर हल्ला करणारा पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसाब याला तर माणुसकीच्या दृष्टीकोनातून सरकारनेच वकील दिला होता आणि त्याला तुरुंगात चांगले चुंगले खायला घातले होते. असे इतरही अनेक प्रकार या कॉंग्रेसच्या राजवटीत घडून गेले असल्याने त्यांना सुषमा स्वराज यांचा राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार नाही असे म्हणून भाजपाच्या नेत्यांनी कॉंग्रेसच्या नेत्यांची तोंडे बंद केली आहेत. पण भाजपाच्या नेत्यांनी सुषमा स्वराज यांची भलामण करावी अशी काही स्थिती नाही. त्यांनी राजीनामाच दिला पाहिजे असे काही नाही पण त्या म्हणाव्या तेवढ्या निर्दोष नाहीत. त्यांनी केलेली मदत निव्वळ माणुसकीमुळे केलेली नाही. एका इंग्रजी दैनिकाने स्वराज आणि ललित मोदी यांच्या कुटुंबांचे संबंध किती निकटचे आहेत याचे काही पुरावेच दिलेले आहेत. या संबंधाचा या माणुसकीला काहीच फायदा झाला नसेल असे सांगता येत नाही. त्यांना माणुसकीच दाखवायची असती तर ललित मोदीला पोर्तुगालमध्ये जाण्यास मदत करण्याऐवजी त्यांच्या कर्करोगग्रस्त पत्नीला लंडनमध्ये आणून तिची शस्त्रक्रिया लंडनमध्ये करता आली असती. ती पोर्तुगालपेक्षा चांगली झाली असती आणि सुषमा स्वराज यांच्यावर हे बालंट आलेच नसते. महत्वाचा मुद्दा म्हणजे असाच प्रसंग कॉंग्रेस नेत्यांच्या बाबतीत घडला असता तर भाजपाच्या नेत्यांनी किती आकांड तांडव केले असते? याचा अंदाज करण्यापेक्षा किती तरी प्रसंग आढवता येतील.

Leave a Comment