भुजबळ गोत्यात

bhujbal
राष्ट्रवादीचे झुुंजार नेते छगन भुजबळ यांच्या भ्रष्टाचाराचा गवगवा बर्‍याच दिवसांपासून होत होता पण ते सत्तेत असल्यामुळे त्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी होत नव्हती. त्यांच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणार्‍यांनी सरकारकडे वारंवार निवेदने पाठवली पण सरकारच भुजबळांचे असल्याने या निवेदनांना सरकारने केराची टोपली दाखवली. आता एवढेच नाही तर त्यांच्या विरोधात तक्रारी करणारांनाच आव्हाने दिली. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी एकदा भुजबळांनी मुंबई जवळ १०० कोटीची मालमत्ता कमावली असल्याचा आरोप केला होता. तेव्हा भुजबळांनी सोमय्यांनाच वेड्यात काढले आणि सोमय्या यांनी आपली सारी मालमत्ता एक कोटीत घ्यावी आपण ती सारी त्यांना स्वस्तात द्यायला तयार आहोत असे त्यांनाच आव्हान दिले. सोमय्या काही ती मालमत्ता खरेदी करायला जाणार नाहीत हे भुजबळांना चांगलेच माहीत होते. पण आपण धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहोत असा आव आणण्याची ही एक रीत असते. या काळात शरद पवार यांनीही भुजबळांच्या वतिने प्रतिवाद केला होता आणि सोमय्यांचा उल्लेख अतीशय तुच्छतेने केला होता.

आपल्या हातातून सत्ता कधीच जाणार नाही आणि आपण कितीही भ्रष्टाचार केला तरीही आपले काही वाकडे होणार नाही अशी अनाठायी खात्रीच या अशा वागण्यामागे असते. आता मात्र केवळ भुजबळच नाहीतर सगळ्याच राष्ट्रवादी नेत्यांचे धाबे दणाणले आहे. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी राजकारणातला भ्रष्टाचार संपवण्याचा निर्धार केला असून त्या दृष्टीने त्यांचे एक दमदार पाऊल पडले आहे यात काही शंका नाही. भुजबळ यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने धाडी टाकल्या आहेत. त्यांची घरे किती ठिकाणी आहेत आणि कार्यालये कोठे कोठे आहेत तसेच त्यांच्या किंमती किती आहेत याची माहिती आता जनतेला होत आहे. हे सारे प्रकरण अचंबा वाटावे असे आहे. अशाही अवस्थेत भुजबळ आपण मंत्रीपदाचा वापर करून एकही पैशाचा अपहार केला नाही असा दावा करीत असतील तर त्यांच्या निर्ढावलेपणाला वंदनच करावे लागेल. आजवर त्यांनी तेच केले. पण एकदा न्यायालयाने हे प्रकरण मनावर घेताच भुजबळ अडचणीत यायला सुरूवात झाली. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलीक यांनी उलट भारतीय जनता पार्टीवरच आरोप केला आहे आणि भुजबळ यांच्यावरची कारवाई सूडभावनेने केली जात असल्याचे म्हटले आहे.

मुळात भाजपाच्या नाही तर आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी भुजबळांच्या या काळ्या संपत्तीला पहिल्यांदा वाचा फोडली आणि नंतर किरीट सोमय्या त्यात प्रविष्ट झाले. हे सारे माहीत असूनही नवाब मलीक भुजबळांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेत आहेत. याचे कारण काय असावे ? भ्रष्टाचारात गुंंतलेल्या नेत्यांची आणि त्यांच्या पक्षांची ही एक कार्यपद्धती असते. भरपूर पैसा खायचा, सत्तेचा वापर करून तो पचवायचा, सत्ता नसल्याने कारवाई झालीच तर असे काही राजकीय वातावरण निर्माण करायचे की मुळात काही कारवाईच होता कामा नये. १९७० च्या दशकातल्या आणीबाणीला आता ४० वर्षे पूर्ण होत आहेत. तेव्हा हरियाणाचे मुख्यमंत्री असलेले बन्सीलाल यांनी राज्यात असाच प्रचंड भ्रष्टाचार केला होता. आपण आता चौकशीतून सुटत नाही अशी खात्री पटल्यावर ते हादरले. देशात असे काही तरी घडावे की आपली चौकशीच होऊ नये असे त्यांना वाटायला लागले. ही संधी त्यांना आणीबाणीने आणून दिली. भ्रष्टाचाराने कोंडी झालेले नेते अशाच मार्गांचा अवलंब करीत असतात. आता भुजबळ सुटणे शक्य नाही याची खात्री पटल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसने असाच मार्ग अवलंबायचे ठरवले आहे.

ही कारवाई सूड भावनेने होत आहे, हा बहुजनांचे आंदोलन चिरडण्याचा डाव आहे असे अनावश्यक मुद्दे समोर मांडून ही चौकशीच होता कामा नये असे काही करण्याचा हा प्रयत्न आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून नवाब मलीक यांनी या वादात कॉंगे्रस पक्षालाही ओढण्याचा प्रयत्न केला आहे. खरे तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला असे काही करण्याची गरज नाही कारण त्यामुळे या पक्षाचे हसे होणार आहे पण हसे झाले तरीही त्यावाचून काही पर्याय नाही. पक्ष भुजबळांच्या मागे उभा नाही असे दिसले तर भुजबळ चिडतील आणि राष्ट्रवादीतल्या अन्यही मंत्र्यांवरील आरोपांचे पुरावे जाहीर करतील. आता आता भुजबळांच्या पाठोपाठ तटकरे आणि अजित पवारही उभेच आहेत. भुजबळ चिडले तर या दोघांना त्रासदायक ठरतील. राष्ट्रवादी कॉंग्रेसची ही भीती खरीच आहे. कालच माहितीच्या अधिकारात काम करणार्‍या एका कार्यकर्त्याने थेट शरद पवार यांच्या बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या जमीन संपादनात भ्रष्टाचार झाला असल्याचे जाहीर केले आहे आणि या प्रकरणात आपण न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे. हा पक्ष भुजबळांच्या मागे उभा राहो की न राहो पण आता भुजबळ काही कारवाईतून सुटत नाहीत. त्यांच्यानंतर सुनील तटकरे यांचा क्रम लागणे अपरिहार्य आहे. कालच उच्च न्यायालयाने भुजबळांप्रमाणेच तटकरे यांच्याही चौकशीचा अहवाल आपल्यासमोर आणण्याचा आदेश सरकारला दिला आहे. अजित पवारांचीही चौकशी सुरूच आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष किती भ्रष्ट आहे याचे पुरावेच आता पुढे येत आहेत.

Leave a Comment