अनिवार हव्यास

chaggan
माणसाला सुखी व्हायला खरेच किती पैसा लागतो असा प्रश्‍न मनात दाटून यावा अशा घटना नित्यच घडताना दिसतात. काल तर अशा घटनांच्या बाबतीत हद्दच झाली. महाराष्ट्राचे माजी माहिती आयुक्त प्रदिप देशपांडे आणि छगन भुजबळ यांच्यासोबत भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आरोपी असलेल्या काही अधिकार्‍यांच्या मालमत्ता किती आहेत याचा शोध लागत आहे आणि या लोकांनी कोणाचेही डोळे विस्फारावेत एवढी संपत्ती बेकायदारित्या कमावली असल्याचे दिसायला लागले आहे. या सार्‍या विस्मयकारक शोधांत एक विसंगती आहे. या पैसे खाणार्‍या अधिकार्‍यांत राज्याचे माजी माहिती आयुक्त आहेत. माहिती आयुक्त हे पद भ्रष्टाचाराच्या निर्मुलनाशी निगडित आहे. पण या पदावर काम केलेला अधिकारीच एवढा भ्रष्ट निघाला आहे. आपली चेष्टा तर अशी आहे की, माहितीच्या अधिकाराचा कायदा होऊन आजच दहा वर्षे होत आहेत आणि आजच माहिती आयुक्तच पैसा खात असल्याचे उघड झाले आहे. हा सारा पैसा माणसाला खरेच सुखी करतो का असा प्रश्‍न मनाला डाचायला लागतो.

भारतीय लोकांना सुखी व्हायला पैसा लागत नाही. त्यांना श्रीमंत असण्यापेक्षा गरीब असलेलेच आवडते. त्यांना श्रीमंतीचा मोठा तिटकारा असतो असे समजले जाते. काही मर्यादेपर्यंत हे खरेही आहे. पण आपले तत्त्वज्ञान समृद्धीचा तिटकारा करते असे सरसहा म्हणता येणार नाही. आपल्याला दोन वेळचे खायलाही मिळू नये एवढेही आपण दरिद्री असता कामा नये आणि पैशातून अनाचार सुचावा एवढा पैसा उतूही जाता कामा नये. धनाचा अभावही असता कामा नये आणि त्याचा आपल्या जीवनावर प्रभावही असता कामा नये. सुखासाठी पैसा कमावता कमावता त्यातून उलट दु:खच निर्माण झाले असे तर होता कामा नये. मूलभूत गरजा भागाव्यात आणि सन्मानाने जगता यावे इतका पैसा मिळवायला हरकत नाही पण काही लोकसुखाच्या मृगजळामागे असे काही धावत असतात की त्यांना आपण नेमके काय करीत आहोत याचे भान रहात नाही. विशेषत: त्यांना अवैध पैसा मिळवण्याची जबरदस्त चटक लागलेली असते. त्यांना आपल्या आयुष्यात दारूच्या पहिल्या प्याल्यासारखी कोठे तरी आयत्या पैशांची लॉटरी लागते आणि ती खपून गेली की तिची अशी काही चटक लागते की, ते वरचेवर तिच्याच मागे बेभानपणाने पळायला लागतात. आपण नेमके काय करीत आहोत याचे त्यांना भान रहात नाही पण एक वेळ अशी येते की सारीच्या सारी संपत्ती उघड होऊन समाजासमोर तोंड दाखवायला जागा रहात नाही.

उंची गाद्यांवर सुखाने झोपता यावे म्हणून अर्जित केलेले हे धनच त्यांना तुरुंगाच्या फरशीवर झोपायला लावते. निदान त्या वेळी तरी त्यांना टॉलस्टॉयच्या गोष्टीतला, माणसाला शेवटी साडे तीन हात जमीनच लागत असते, हा बोध आठवतो की नाही असा प्रश्‍न पडतो. आठवला तरीही हा बोध त्यांना त्यांच्या उमेदीच्या वयात आठवला असता तर किती बरे झाले असते असे वाटल्यावाचून रहात नाही. आजच्या काळात लोक जगण्याचा हेतूच विसरले आहेत आणि आता फार प्रामाणिकपणाने जगण्यात अर्थ नाही अशीच सर्वांची भावना झाली आहे असे आपल्याला वाटते. पण काही वेळा काही लोक त्यागाचा असा काही आदर्श उभा करतात की, केवळ पैशाच्या मागे लागलेल्या लोकांच्या कानफाटात दिलीय असे वाटावे. एका मुस्लिम विद्यार्थिनीला गीता मुखपाठ केल्याबद्दल ११ लाख रुपयांचे बक्षिस मिळाले. या मुलीच्या घरची आर्थिक परिस्थिती काही फार चांगली नाही. निदान असे वैध मार्गाने मिळालेले ११ लाख रुपये सहजा सहजी नाकारावेत एवढी तरी चांगली नाहीच. पण तिने हे बक्षिस नाकारले आणि हा पैसा गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दिला जावा अशी इच्छा व्यक्त करून हे बक्षिस परत केले. ती कोट्यधीश नाही. आणि कोट्यधीश लोकही असे पैसा नाकारत नाहीत. तिने ते स्वीकारले असते तरी तिला कोणी चूक केलीय असे म्हटले नसते पण तिने ते पैसे नाकारले. ही घटना आपल्या डोळ्यात अंजन घालणारी आहे.

महाराष्ट्रात ज्या अधिकार्‍यांची मालमत्ता उघड झाली आहे. त्यांनी काही शे कोटी रुपये अवैध मार्गाने कमावले आहेत त्यातल्या काही अधिकार्‍यांंच्या घरात किलोत मोजता येईल एवढे सोने सापडले. त्यातल्या एकेकाने मुंबई, औरंगाबाद, ठाणे, पुणे अशा शहरांत एकाच वेळी काही सदनिका घेतलेल्या आढळल्या. शिवाय जमिनी, रोखे, मुदत ठेवींच्या पावत्या आणि नगदी रकमा असे कोट्यवधी रुपये त्यांच्या घरात मिळाले. माणसाला एक घर लागते. ते सुसज्ज असावे हे खरे पण एकाच माणसाला चार शहरात चार चार सदनिका कशाला लागतात ? त्यांच्या बायकांच्या अंगावर काही तोळ्यांचे सुवर्णालंकार असतील तर ते समजून घेता येईल पण एका बाईकडे एक किलो सोने असेल तर ती त्या प्रमाणात सुखी असेल का असा प्रश्‍न पडल्यावाचून रहात नाही. एवढ्या सदनिका आणि एवढे खुले भूखंड असूनही आणखी कोठ्यवधीची मालमत्ता कमावण्याचा त्यांचा हव्यास कमी झालेला नाही. माणसाला असा कितीही पैसा मिळाला तर तो सुखी होत नाही कारण सुख हा मनाचा धर्म असतो हे त्यांना कोण सांगणार?

Leave a Comment