विद्यार्थी कोणाचा ? शाळेचा की क्लासचा?

result
दहावीच्या निकालात चमकलेल्या विद्यार्थ्यांच्या बातम्या देताना काही माध्यमांत, ‘…… शाळेचा विद्यार्थी पहिला’ असा मथळा न देता ‘……. क्लासेसचा विद्यार्थी पहिला’ असे मथळे झळकताना दिसत आहेत. एखादा मुलगा एखाद्या शाळेचा असतो की क्लासचा असतो ? तो जादा अभ्यासासाठी क्लासला जात असतो आणि तो पहिल्यापासून एखाद्या शाळेचाच विद्यार्थी असतो. पण आता हे बदललेले मथळे शाळांचा अपमान करणारे आहेत. काही शाळा याच लायकीच्या आहेत हे खरे. कारण त्या वर्गात काहीच शिकवीत नाहीत आणि मुलांना सरळ सरळ क्लास लावण्याचा सल्ला देतात. बातमीत हा प्रकार सुरू असताना जाहीरातीत त्यापुढची मजल मारलेली दिसत आहे. महाविद्यालयांच्या तसेच शिकवणी वर्गांच्या जाहीरातींनी याबाबत कहर केला आहे. गेल्या काही वर्षात निकालांच्या बातम्यात आणि जाहीरातीतही शाळांना बेदखल करण्याचा हा नवा प्रवाह दिसायला लागला आहे.

गुणवत्ता यादीत आलेला एखादा मुलगा किंवा मुलगी कोणत्या तरी शाळेचा किंवा शाळेची असतेच त्यामुळे बातमीत ‘अमुक शाळेचा विद्यार्थी गुणवत्ता यादीत’ असा उल्लेख असतो. मात्र गुणवत्ता यादीत आलेला विद्यार्थी कोणत्या तरी क्लासेसचा असतोच. मग गेल्या काही वर्षात त्या मुलाच्या बातमीत कोठे तरी खाली तो कोणत्या क्लासचा विद्यार्थी आहे याचाही उल्लेख केला जायला लागला. असा उल्लेख त्या क्लासकडे अधिक विद्यार्थी आकृष्ट व्हावेत यासाठी उपयुक्त ठरतो. म्हणून त्या क्लासचे संचालक वृत्तपत्राच्या कार्यालयात जाऊन तिथल्या संपादक खात्यातल्या प्रमुखाला भेटून त्यांना बातमीत क्लासचा उल्लेख करावा अशी चाचरत चाचरत विनंती करीत असत. असा उल्लेख करणे हे अनुचित असते याची जाणीव असण्याचा तो काळ होता. कारण विद्यार्थी क्लासचा नसतो तर शाळेचा असतो आणि तो अधिक सरावासाठी एखाद्या क्लासला जात असतो. पूर्वी तर क्लास लावावा लागणे हे कमीपणाचे मानले जात होते. अशा क्लासेसवर बंदी असावी का अशीही चर्चा होत असे. एवढ्यावरही क्लास चालत असत आणि मुलाने काही पराक्रम केला असेल तर त्याचे श्रेय क्लासला न जाता शाळेला दिले जात असे. मात्र आजकाल वृत्तपत्रांतही व्यावसायिकता आली आहे. शेवटी क्लासेस हा त्यांचा जाहीरातदार वर्ग आहे. तेव्हा एखाद्या ओळीच्या उल्लेखाने काही न बिघडता आपला जाहीरातदार खुष होणार असेल तर त्या बातमीत क्लासचा उल्लेख करायला काय हरकत आहे असा विचार वृत्तपत्रे करायला लागली आहेत. त्यांनी क्लासची नावे टाकायला सुरूवात केली.

हा झाला बातमीचा मामला. पण जाहीरातीत काय लिहावे यावर संपादकांचा अंकुश नाही. म्हणून निकालादिवशी क्लासेसच्या जाहीराती देताना त्यात गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी आपल्याच क्लासचे आहेत असा ठळक उल्लेख यायला लागला. या जाहीराती क्लासेसच्या असल्याने त्यांनी त्या विद्यार्थ्यांच्या शाळांची नावे आपल्या जाहीरातीतून पुसूनच टाकली. काही वृत्तपत्रांत तर बातमीतच हा प्रकार घडायला लागला आहे. क्लासेसचे संचालक आता एवढे धीट झाले आहेत की ते बातमीतही शाळेचे नाव न देता क्लासचेच नाव द्यावे अशी सूचना करायला लागले आहेत. ज्या शाळेच्या शिक्षकांनी त्या मुलाच्या हाताला धरून त्याला अक्षरे गिरवायला शिकवण्या पासून शिक्षणाचे पाठ देऊन त्याला विद्यार्थी बनवले ती शाळा बेदखल झाली आणि परीक्षेपुरती घोकंपट्टी करून घेऊन त्या विद्यार्थ्याला निव्वळ परीक्षार्थी केले तो क्लास मात्र शिरजोर झाला आहे. हा खरा ‘शालांत’ होय. आता शाळेतला प्रवेश नाममात्र झाला आहे आणि क्लासच सर्व काही झाला आहेे. असेच जर आहे तर सरकारने शाळा बंद कराव्यात आणि क्लासेसना कितीही फी घेऊन मुलांना परीक्षेपुरते आणि मार्कापुरते शिकवण्याची अनुमती द्यावी म्हणजे मुले खूप मार्क मिळवतील आणि सरकारचा शाळांवर होणारा एवढा खर्चही वाचेल.

आता मुलांना क्लास आणि शाळा असा दोन्हींसाठी वेळ देता देता थकवा येतो तो या निर्णयाने टळेल. या स्थितीत त्याला आता शाळेला जाण्याची गरजच राहणार नाही. उगाच हजेरीसाठी शाळेत जाण्याची आफत त्याच्यावर येणार नाही. क्लासेसच्या चालकांनी शाळांना असे बेदखल करतानाच आपापसातही स्पर्धा सुरू केली आहे. गुणवत्तेत आलेल्या एका मुलीच्या बाबतीत विचित्र प्रकार घडला आहे. ती आपल्याच क्लासची विद्याथीं असल्याचा दावा चार क्लासेसनी केला आहे. तिच्या पराक्रमाचे श्रेय घेण्यास चार क्लासेसचे मालक पुढे आले आहेत. याही मुलीने आपण चारही क्लासेसमध्यें जात होतो असे लिहून दिले आहे. हा बिनधास्तपणा जाहीरात मॉडेललाही लाजवणारा आहे. शाळांचा असा उपमर्द होत असताना शाळा मात्र शांत बसल्या आहेत जणू काही शाळेतले शिक्षण निरर्थक ठरले असल्याची कबुलीच त्यांनी दिली आहे. आता यापुढे आणखी एक प्रकार पहायला मिळणार आहे. काही औषधी कंपन्या मुलांच्या मेंदूची ताकद वाढवणारी औषधे तयार करीत आहेत. तेव्हा आता गुणवता यादीत आलेला मुलगा किंवा मुलगी आपलेच औषध घेतल्याने यादीत आली असा दावा करणारी जाहीरात झळकू शकतेे. ब्रेन पॉवर वाढवणारे आणि मनाची एकाग्रता वाढवणारेही क्लासेस चालत आहेत. याही क्लासेसचे संचालक या स्पर्धेत उतरतील.

Leave a Comment