झाला दहावीचा निकाल

result
दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला आहे. ९० टक्क्यांच्या आसपास मुले उत्तीर्ण झाली आहेत. त्यांना मिळालेले गुणही भरपूर आहेत. नेहमीप्रमाणे मुलांपेक्षा मुली अधिक प्रमाणात यशस्वी झाल्या आहेत. निकालाची टक्केवारी, मुलांचे गुण आणि मुलींचे यश यांचा वेगळा विचार करावाच लागेल. कारण आपण वृत्तपत्रांत नेहमीच शिक्षणाच्या गुणवत्तेचा पंचनामा करणार्‍या बातम्या वाचत असतो. या बातम्यांत ही गुणवत्ता घसरल्याचे म्हटलेले असते. मग ती जर घसरली आहे तर मग दहावीला ९० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण कसे होतात ? एवढे विद्यार्थी उत्तीर्ण होणार असतील तर आपल्याला आनंदच झाला पाहिजे पण मग एरवी गुणवत्तेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण केले जाते ते का केले जाते ? या दोन गोष्टींचा मेळ बसत नाही. दहावीच्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा पास केली की त्याचे शालेय जीवन संपते आणि तो आता उच्च शिक्षणात जातो म्हणून ही परीक्षा महत्त्वाची समजली जाते पण त्या मानाने या निकालाचा होणारा गाजावाजा काही वेळा अनावश्यक वाटायला लागतो.

पूर्वी बहुसंख्य विद्यार्थ्यांचे शिक्षण दहावीतच थांबत असे. शिक्षण हे नोकरीसाठी असल्याचे मानले जायचे (अजूनही मानले जाते) आणि दहावी पास झाला की एखादी सरकारी नोकरी मिळून जायची. मग ज्या परीक्षेमुळे सरकारी नोकरीची तजवीज होते ती परीक्षा दिली आणि तिच्यात उत्तीर्ण झालो की, पुढचे शिक्षण घ्यायचे कशाला असा विचार लोक करीत असत. त्या काळात दहावी नंतर शिक्षकाची नोकरी मिळायची, बँकेतही नोकरी मिळायची आणि लिपीक होणे तर सहज शक्य व्हायचे. कोणी दहावीनंतर शिकण्याची महत्त्वाकांक्षा बाळगलीच तर ते फार अवघडही असायचे. उच्च शिक्षणाच्या सोयी फार नव्हत्या. १९६५ पर्यंत तरी जिल्ह्यात एखादे कॉलेज असायचे. आता या सोयी वाढल्या. पूर्वी मॅट्रिक ही बहुसंख्यक लोकांसाठी शिक्षणाची परमावधी होती. आता तशी स्थिती नाही. दहावी हा शिक्षणाचा टप्पा राहिला आहे पण तो निर्णायक नाही. त्यामुळे दहावी पास होण्याची फार काही नवलाई राहिलेली नाही. इ. स. २००० पर्यंत भारतात शिक्षणात गळतीही फार होती आणि गळतीतूनही दहावीपर्यंत टिकतील त्यातले फार कमी विद्यार्थी उच्च शिक्षणाला जात असत. म्हणजे पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणार्‍या १०० विद्यार्थ्यातील सात विद्यार्थी पदवीच्या शेवटच्या परीक्षेपर्यंत टिकत असत. अशा या कौतुकाच्या पदवीच्या शिक्षणाचा प्रारंभ दहावीनंतर होतो. दहावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी आपण आता कोणती पदवी घ्यायची याचा निर्णय करीत असतो. त्यामुळेही दहावीच्या परीक्षेला टर्निंग पॉईंट असे म्हणत असत.

आता तसेही होत नाही. अकरावीला कोणत्याही वर्गात जाऊन मुलांना नंतर कोणतेही व्यावसायिक अभ्यासक्रम घेता येतात. म्हणजे त्याही दृष्टीने दहावीला काही महत्त्व राहिलेले नाही. केन्द्र सरकारने जाहीर केलेल्या सहाव्या वेतन आयोगाने सरकारी नोकरीसाठीची किमान पात्रता आता बारावी ही असेल असे जाहीर केले आहे. म्हणजे नोकरीच्या क्षेेत्रातही आता दहावीला काही किंमत राहिलेली नाही. आता दहावीची परीक्षा बोर्ड घेते. नववी पर्यंतच्या परीक्षा आपल्या शाळेत होतात तशी दहावीची होत नाही आणि महाराष्ट्रभर ही परीक्षा सारखीच असते म्हणून तिचा निकाल असा मोठ्या प्रमाणावर जाहीर होतो. आता गुणवत्ता यादी वगैरे जाहीर केली जात नाही. नाहीतर पूर्वी त्यालाही फार महत्त्व असायचे. अशी यादी जाहीर होत नसल्याने या परीक्षेचा फारसा बभ्रा करण्याचे काही कारण उरलेले नाही. दहावीची परीक्षा आता शालेय अभ्यासक्रमातली नववीपर्यंतच्या अन्य परीक्षांप्रमाणेच एक परीक्षा आहे असे मानायला काही हरकत नाही. हे अशासाठी सांगितले की या परीक्षेत किती गुण मिळाले, उत्तीर्ण झालात की नाही याला तसे फार महत्त्व नाही हे लक्षात यावे.

नाही म्हणायला अकरावीत मुलांनी कोणत्या शाखेला प्रवेश घ्यावा याचा निर्णय काही प्रमाणात या परीक्षेनंतर होतो. अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि तत्सम शास्त्रीय ज्ञानाचा आधार असलेल्या शाखांना जाऊ इच्छिणारांना अकरावीत शास्त्र शाखेलाच प्रवेश घ्यावा लागतो. पण संगणक शिक्षण, व्यवस्थापन शास्त्र, पत्रकारिता या अभ्यासक्रमांना जाण्यासाठी आणि शासकीय सेवेसाठीच्या स्पर्धात्मक परीक्षा देण्याची इच्छा असणारांसाठी अकरावीत कोणत्याही शाखेत प्रवेश घेतला तरी चालतो. त्यांना अकरावीत प्रवेश घेताना फार काही विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागतोच असे नाही. म्हणजे फार कमी विद्यार्थ्यांसाठी हा टर्निंग पॉइंट ठरतो. असे असले तरी आता विद्यार्थ्यांनी, शास्त्र शाखेला जाण्यातच आपल्या जीवनाचे खरे सार्थक आहे या कल्पनेतून बाहेर येण्याची गरज आहे. या बाबतीत गेल्या दहा वर्षात फार मोठे परिवर्तन झालेले दिसत आहे. इंजिनियरिंग आणि वैद्यकीय शाखांकडे लोकांचा मोठा ओढा होता. कारण मुलगा इंजिनियर किंवा डॉक्टर होणे हे मोठ्या प्रतिष्ठेचे मानले जात असे. त्या काळातही अनेक शिक्षण तज्ज्ञ आणि व्यवसाय मार्गदर्शकांनी या बाबत सावधानतेचे इशारे दिले होते. या दोन शाखांकडील मुलांचा आणि पालकांचा अनावश्यक ओढा अनैसर्गिक आहे असे त्या काळात या तज्ज्ञांनी म्हटले होते. अर्थात त्या काळात लोकांना ते कळले नाही. आता मात्र अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या जागा मोकळ्या पडायला लागल्या आहेत आणि डॉक्टर होण्यात प्रतिष्ठा असली तरी या व्यवसायात स्थिर होण्यास फार विलंब लागतो हे जाणवायला लागले आहे. उच्च शिक्षणाचा निर्णय घेताना अशा चुकीच्या कल्पनांना थारा न देता वास्तवाचा विचार करायला पाहिजे.

Leave a Comment