पारधी समाजाची स्थिती

nanded
पारधी समाजाकडे आपण फार निष्ठुरतेने पहात असतो. मागे एकदा उस्मानाबाद जिल्ह्यात एका कॉंग्रेस नेत्याने गावकर्‍यांना सोबत घेऊन पारधी पेढी (वस्ती) वर हल्ला करून काही पारध्यांना मारले आणि काहींना जखमी केले. त्यांचा अपराध काही नव्हता. असलाच तर त्याबाबत पोलिसांत तक्रार करायला हवी होती पण या नेत्याने स्वत:च त्यांच्यावर हल्ला केला. यावर समाजाची प्रतिक्रिया फार वाईट होती. या घटनेचा कोणीही निषेध केला नाही. उलट पारध्यांवर हल्ला केलाय म्हणजे ठीकच आहे असे लोकांचे मत पडले कारण पारधी म्हणजे चोर्‍या करणारच असे त्यांनी गृहितच धरलेले होते. आपण हा या समाजावर अन्याय करतोय याची समाजातल्या धुरिणांना जाणीवही नव्हती मग त्याची खंत कशी असणार? आता नांदेड जिल्ह्याच्या किनवट येथे एका पारधी तरुणाने पोलीस ठाण्यासमोर स्वत:ला जाळून घेतले. त्यात त्याचा अंत झाला. या तरुणावर चोरीचा खोटा आळ घेण्यात आला होता. आपण निर्दोष आहोत असे परोपरीने सांगूनही पोलीस त्याला सातत्याने त्रास तर देत होतेच पण त्याच्या घरातल्या महिलांनाही मारहाण करीत होते.

या सार्‍या त्रासाला कंटाळून त्याने आत्मदहन केले. पोलिसांकडून केला जाणारा जाच त्याला असह्य झाला होता. जी व्यक्ती एवढे टोकाचे पाऊल उचलते तिची खरोखरीच कोंडी झालेली असते. काही कारण नसताना अशा कोंडीत पकडले असेल तर त्याला जगणे असह्य होते. तिच्यातून कशी सुटका करून घ्यावी हे त्याला सुचत नाही आणि शेवटी ती आपला प्राण पणाला लावते. अन्यायाचे निवारण करण्याचा कोणताच मार्ग यशस्वी होत नाही असे दिसायला लागले की माणसाला असा निर्वाणीचा मार्ग अवलंबावा लागतो. आत्मदहन करणारा हा तरुण पारधी समाजातला होता. या प्रकरणातली एवढी एक माहिती फार मोलाची आहे. हा मुलगा पारधी होता असे समजताच सामान्य माणसाची एक प्रतिक्रिया उमटते. पारधी समाजातला होता म्हणजे त्याने चोरी केलीच असणार. मग पोलिसांनी पकडले यात काय चूक? अशी ही प्रतिक्रिया असते. कारण समाजाने या जातीवर चोर असा शिक्का मारून टाकलेला आहे. हा समाज हा कलंक माथी घेऊनच जगत आहे. आपण पारधी समाजाला पटकन चोर ठरवून टाकतो पण आपल्याला त्यांच्या कथित चोर्‍या प्रत्यक्षात माहीत असतातच असे नाही. वृत्तपत्रांत तक्रारींच्या आधारे जे काही छापून येते त्यावर वरवर नजर टाकून आपण पूर्ण एका जातीलाच चोर ठरवून मोकळे होतो. याच भावनेतून असेल पण या किनवटच्या घटनेची फार संवेदनशीलतेने दखल घेतली गेलेली नाही.

एक दैवदुर्विलास असा की, ही महाराष्ट्राच्या सुसंस्कृतपणाला काळीमा फासणारी घटना कै. गोपीनाथ मुंडे यांच्या पहिल्या स्मृतिदिनालाच झाली आहे. या गोष्टीला एक महत्त्व आहे. ते कदाचित आपल्या स्मरणात नाही. पण महाराष्ट्रातल्या पोलीस खात्यात राज्यातल्या सात जातींचा उल्लेख माजी गुन्हेगार जाती असा करण्यात आला होता. ही नोंद सरकारची होती. एखाद्या व्यक्तीच्या करणीवरून तिच्या पूर्ण जातीलाच चोर आणि गुन्हेगार ठरवता कामा नये असे म्हणत असतो पण महाराष्ट्रातले पुरोगामी सरकार सात जातींना काहीही अपराध न करता माजी गुन्हेगार जाती मसे सर्रास म्हणत होते. या जातीत एखादा मुलगा किंवा मुलगी जन्माला आली की त्यांच्या कपाळावर गुन्हेगार असा शिक्का बसत होता. गोपीनाथ मुंडे भाजपा-सेना युतीच्या सरकारमध्ये गृहमंत्री असताना त्यांनी हा शिक्का पुसला होता. त्यांनी १९९६ साली तसा आदेश काढला होता. महाराष्ट्राचे पोलीस यापुढे कोणालाही जन्मल्याबरोबर गुन्हेगार समजणार नाही आणि कोणत्याही जातींचा उल्लेख गुन्हेगार जात असा करणार नाही असे त्यांनी जाहीर केले होते.

तेव्हापासून या जातींचा माजी गुन्हेगार जाती असा उल्लेख होणे बंद झाले होते. सरकारच्या दप्तरातली ही नोंद बंद झाली तरीही जनतेच्या मनातली भावना गेली नव्हती. म्हणून पोलीसही त्याचा गैरफायदा घेतात. नाहीतरी लोक प्रत्येक पारध्याला चोरच समजतात. काही कारण नसतानाही पोलिसांनी एखाद्या पारधी तरुणाला अटक केली तरीही समाज त्याने चोरी केलेली असणारच असे समजून चालतो. अशी अटक अन्याय्य असली तरीही समाजातून तिचा निषेध होत नाही. कसलीही प्रतिक्रिया उमटत नाही. पोलीस त्याचा गैरफायदा घेतात. एखाद्या चोरीत आरोपी सापडत नसले की माध्यमांत प्रतिक्रिया उमटते. आरोपी सापडत नाहीत म्हणून संंबंधित लोकही नाराजी व्यक्त करायला लागतात. पोलिसांना खरे आरोपी सापडत नसतात. पण जनतेतून प्रकटणारे नाराजीचे सूर सौम्य करण्यासाठी पोलीस पारधी तरुणाचा वापर करतात. कोणा तरी पारधी तरुणांना आत टाकून आरोपी पकडले असल्याचा देखावा उभा करतात आणि जनतेतला नाराजीचा सूर कमी होतो. ते पकडलेले निरपराध पारधी तरुण काही करू शकत नाहीत कारण त्यांच्यावर दबाव टाकण्यात येतो. त्यांच्याच समाजातल्या त्यांच्या प्रतिस्पध्यार्र्ंचा वापर करून त्यांच्यावर संशय व्यक्त करण्यास या प्रतिस्पर्ध्यांना भाग पाडलेले असते.

एखाद्या खर्‍या किंवा खोट्या, बनावट आरोपातून सूट देण्याचे आमिष त्यांना दाखवलेले असते. असे शह आणि काटशहाचे तंत्र वापरून पोलीस पारधी समाजाला कायम गुन्हेगारीच्या क्षेत्रात अडकवून ठेवतात. अशा लोकांची त्यांना गरज असत. पारधी समाज या चक्रातून बाहेर पडण्याची कोशीश करीत असतो. करीत आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याची धडपड करीत आहेत. त्यासाठी त्यांनी संघटनाही स्थापन केलेल्या आहेत. पण पोलिसांना ते नको आहे कारण त्यांना हकनाक अटक करायला कोणीतर हवे असते. म्हणून पोलीस अशा लोकांना खोट्या आरोपांत गुंतवून त्यांना बाहेर पडण्यास मज्जाव करीत असतात. पोलिसांची ही प्रवृत्ती आणि या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याची इच्छा यात कोंडी झालेल्या या तरुणाने शेवटी आपला जीव गमावला आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातला हा सर्वात घृणास्पद दिवस आहे. सरकारने या प्रकाराचे गांभीर्य ओळखले पाहिजे.

Leave a Comment