
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने अल्पवयीन मुलांच्या नावाने सोशल नेटवर्किंग साइटवर अकाउंट उघडणे चूक असल्याचे मत व्यक्त केले आहे. अशा प्रकारची बेकायदा प्रोफाइल तत्काळ डीलिट करा, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. घटस्फोटाच्या एका प्रकरणात वडिलांनी मुलीचा ताबा मागण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे; मात्र मुलगी वडिलांबरोबर रमत नाही, असे कारण देऊन मुलीच्या आईने वडिलांच्या मागणीला विरोध केला आहे. मुलीच्या वडिलांनी सोशल नेटवर्किंग साइटवर मुलीच्या नावाने प्रोफाइल तयार केले आहे; मात्र मुलगी सध्या अल्पवयीन आहे. अठरा वर्षे वयापर्यंतच्या मुलांना सोशल नेटवर्किंग साइटवर अकाउंट उघडण्यास कायद्याने परवानगी नाही. त्यामुळे अशा प्रकारे पालक आपल्या अल्पवयीन मुलांच्या नावाने प्रोफाइल तयार करून ते वापरू शकत नाहीत. कायद्यानुसार परवानगी नसल्यामुळे असे प्रोफाइल बोगस समजले जातात, असे न्या. मृदुला भाटकर यांनी स्पष्ट केले. याशिवाय वडिलांनी पत्नीच्या नावानेही बोगस अकाउंट तयार केले आहे. ही दोन्ही अकाउंट तातडीने डीलिट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
