विकासात तारतम्य हवे

asthma
भारतातल्या चार मोठ्या शहरात करण्यात आलेल्या लहान मुलांच्या आरोग्याच्या पाहणीत ३० टक्क्यांपेक्षाही अधिक विद्यार्थी श्‍वसनाच्या कसल्या ना कसल्या विकाराची शिकार झाले असल्याचे दिसून आले असून या निष्कषार्र्ंना अनेक ैदैनिकांनी प्रसिद्धी दिली आहे. हे पाहणीचे निष्कर्ष फारच धक्कादायक ठरले आहेत. आजवर आपण ग्रामीण भागातल्या आणि त्यातल्या त्यात आदिवासी भागातल्या मुलांमधील कुपोषण आणि अनारोग्य या विषयीची आकडेवारी पहात आणि ऐकत आलो होतो. त्याचबरोबर आपल्याला शहरातल्या मुलांच्या आरोग्याच्या संदर्भात काही विसंगत माहितीही कळत होती. कारण कुपोषणाचा प्रश्‍न केवळ ग्रामीण आणि आदिवासी भागातल्या मुलांशीच संबंधित नाही. शहरांतल्या गरीब वस्त्यांतही कुपोषित बालकांची संख्या मोठी आहे. झोपडपट्ट्यांतही पोटापुरते अन्न न मिळणार्‍या मुलांची संख्या मोठी आहे. बाल मृत्यूचे प्रमाणही लक्षणीय आहे मात्र ही समस्या दिसत असतानाच शहरांतल्या काही संपन्न कुटुंबांत मुलांच्या अतीपोषणाच्या काही समस्या निर्माण झालेल्या दिसत आहेत. गरिबांच्या मुलांची समस्या कमी अन्नाची तर श्रीमंतांच्या मुलांची समस्या जादा अन्नाची.

जादा अन्न मिळणे काही वाईट नाही. त्याचा फायदाच होत असतो. पण या निमित्ताने दोन मुद्दे महत्त्वाचे ठरतात.एक म्हणजे श्रीमंत मुलांना जादा खायला मिळत असले तरीही ते जादा अन्न पचवण्याची क्षमता त्यांच्यात नसते. कारण त्यांची जगण्याची रीत अन्न पचवण्यास अनुकूल नसते. टीव्ही. आणि इंटरनेट यामुळे ही मुले मोकळ्या मैदानावर खेळायला जात नाहीत. शाळेत जायला आणि शाळेतून येण्यासाठी त्यांना वाहने उपलब्ध असतात. त्यांना कोठेही चालावे लागत नाही. शरीराला हालचाली होत नसल्याने त्यांना खायला मिळणारे अन्न पचत नाही. त्यातूनच पौगंडावस्थेच्या पूर्वीच्या अवस्थेत त्यांचे वजन खूप वाढलेले असते. १२ वर्षांच्या मुलाचे वजन १०० किलो असते. यातून शहरातल्या या मुलांसाठी वैद्यकीय उपचाराची एक स्वतंत्र शाखा सुरू झाली आहे. या वयात या मुलांना मधुमेह होतो. त्यांना बालवयातच चष्मा लागलेला असतो. या मुलांना चॉकलेट खूप खायला मिळत असल्याने त्यांच्यापैकी ५० टक्के मुलांचे ६० टक्के दात बालवयातच किडलेले असतात. हे सारे त्रास जादा खायला मिळण्याचे आहेत. मुलांच्या जीवनावर असे हे समृद्धीचे परिणाम होत असतानाच शहरातल्या वातावरणाचेही काही परिणाम मुलांवर होत असतात. कारण शहरातले पर्यावरण उद्योगांमुळे बिघडलेले आणि प्रदूषण वाढलेले असते.

या पर्यावरणाचा परिणाम मुलांच्या श्‍वसनयंत्रणेवर झालेला असल्याचे आता उघड झाले आहे. हा परिणाम हवेमुळे झालेला असल्याने त्यात गरीब-श्रीमंत असा भेद नाही. शहरातली बिघडलेली हवा यातल्या सगळ्याच मुलांच्या शरीरात ओढली जात असते. याबाबत शहरी आणि ग्रामीण असा भेद नक्कीच आहे कारण शहराच्या मानाने खेड्यात वाहनांची संख्या कमी असते. खेड्यातले वातावरण शहरांच्या तुलनेत कमी प्रदूषित असते. मुलांच्या मेंदूच्या वाढीशीही या वातावरणाचा संबंध असतो. ज्या मुलाच्या श्‍वासातून मेंदूला भरपूर प्राणवायू मिळतो त्या मुलाचा मेंदू तल्लख असतो आणि त्याची आकलन शक्तीही चांगली असते. शहरातल्या मुलांना हा प्राणवायू कमी मिळतो कारण त्याच्या श्‍वासातून आत घेतल्या जाणार्‍या हवेत प्राणवायूचे प्रमाण कमी आणि अन्य घातक वायूंचे प्रमाण जास्त असते. म्हणून आकलन शक्तीत खेड्यातली मुलेही अधिक चांगली असतात. त्यातल्या त्यात आदिवासी मुलांची आकलन शक्ती चांगली असते. खेड्यातल्या मुलांना बालवयात चष्मा लागण्याचे प्रमाण कमी असते. किंबहुना तिथल्या शाळांत चष्मे लावलेली मुलेही अभावानेच आढळतात. शहरे ही आता प्रदूषणाची आगारे झाली आहेत. त्याचे हे सारे परिणाम आता जाणवायला लागले आहेत.

औद्योगिकदृष्ट्या प्रगत शहरातली मुले निकामी होत आहेत. आजवर असा समज होता की शहरातली मुले म्हणजे हुशार आणि खेड्यातली मुले म्हणजे टाकावू. पण हा समज आता खोटा ठरला आहे. अनेक ठिकाणी अशी तुलना करण्याचे काही अनुभव येतात तेव्हा ही बाब प्रकर्षाने दिसते आणि ग्रामीण भागातल्या लोकांना आनंद होतो. अर्थात तो साहजिक आहे पण मुले मग ती शहरातली असोत की खेड्यातली असोत ती अशी लहान वयातच रोगट होत असतील तर ती एकुणात देशाची हानी आहेे. म्हणून या अध:पाताचे शास्त्रशुद्ध विश्‍लेषण होण्याची गरज आहे. शहरातल्या प्रदूषणाने आपल्या भावी पिढीचे असे नुकसान होत असेल तर मग आपण आपल्या देशात औद्योगिकीकरणाची मोठीच किंमत चुकती करीत आहोत असे म्हणावे लागेल. प्रगती व्हावी पण ती अशी भरून न येणारी हानी होऊन होऊ नये असे काही लोक म्हणतही असतात. अशा निष्कर्षावर चर्चा होते तेव्हा अनेक पर्यावरणवादी लोक विकासाच्या प्रक्रियेवर सारा दोष झटकून विकासच नको असेही म्हणायला लागतात. पण ही खरेच विकासाची किंमत आहे का ? याचा नीट विचार झाला पाहिजे. खरे तर ही काही विकासाची अपरिहार्य किंमत नाही. अविचारीपणाने केल्या जाणार्‍या विकासाची ती किंमत आहे. तेव्हा विकास घडवताना पर्यावरणाचे नुकसान होता कामा नये याबाबत आपण दक्ष राहिलो तर असे परिणाम टाळताही येेतात. तेव्हा विकासाला विवेकाची जोड दिली जाणे गरजेचे आहे.

Leave a Comment